तरुणीच्या नावाने बनवले बनावट फेसबुक खाते – पोलिसांच्या अटकेत दिसले त्याला पोलिस खाते


जळगाव : तरुणीचा मोबाईल चोरी केल्यानंतर तिच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करुन तिच्या नावाने इतर तरुणींसोबत चॅट करणारा पोलिसांनी अटक करताच चाट पडला.

चोपडा तालुक्यातील एका तरुणीचा तिच्या राहत्या घरातून मोबाईल कुणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेला होता. या घटनेनंतर तिचा असे निदर्शनास आले की तिचा फोटो वापरुन कुणीतरी तिच्या नावाने बनावट फेसबुक खाते ऑपरेट करत आहे. बनावट फेसबुक वर आपला फोटो बघून त्या तरुणीला धक्काच बसला होता. तिच्या चोरी झालेल्या मोबाईल मधील फोटो फेसबुक व इन्स्टाग्राम या साईटवर वापरले जात होते. आपणच ती तरुणी असल्याचे भासवून कुणीतरी तरुण हा उपदव्याप करत होता.

या प्रकरणी त्या तरुणीच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस या गुन्ह्याचा तपास करत होते. पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु होता.

तांत्रीक माहितीच्या आधारे तपास पुढे सरकत असतांना माहिती मिळाली की चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील प्रशांत जगन वारडे (26) हा तरुण हे प्रकार करत आहे.
पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. सचिन सोनवणे, अरविंद वानखेडे यांनी आरोपीचा शोध घेत त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

कसुन चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला सॅंमसंग कंपनीचा मोबाईल व इतर सिमकार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सायबर पोलिस पथकाने त्याला अटक केली असून मिळालेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपीविरुद्ध चोपडा व गुजरात राज्यातील सुरत येथे गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here