तहसीलदार हिंगे यांची बदली – दिपककुमार गुप्ता यांचे एक दिवसीय उपोषण फळाला

जळगाव : महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा द्यावा, जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यावर कारवाई व्हावी अशा मागण्यांसंदर्भात माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यासह विजय दोधा पाटील, डॉ सरोज पाटील, शिवराम पाटील यांनी आज एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केले.

तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या बदलीचे आदेश आल्यामुळे एक प्रकारे दीपककुमार गुप्ता यांचे उपोषण फळाला आल्याचे म्हटले जात आहे. वैशाली हिंगे यांची उप सचिव सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार या पदावर बदली झाली आहे.

कोणतीही तक्रार नसलेल्या तसेच कार्यकाळ पुर्ण न झालेल्या ४० उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या महसूलमंत्री थोरात यांनी केल्या. त्या बदल्या नागपूर मॅट न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्या आहेत. वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्व्हंटस रेग्युलेशन आणि ट्रान्सफर कायदा २००५ चे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

महसूलमंत्री थोरात यांच्या सहीने झालेल्या बदल्यांच्या विरुद्ध नागपूर प्रशासकीय विभागातील ४ उप जिल्हाधिकारी व ८ तहसीलदारांनी मॅट न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली होती.

नागपूर मॅट न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागपूर महसूल विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या करण्यात आलेल्या बदल्या या बेकायदेशीर आहेत. या बदल्या नागरी सेवा मंडळाने तयार केलेल्या रितसर यादीनुसार नाही. या बदल्या करु नये असे स्पष्टपणे नागरी सेवा मंडळाने महसूल विभागाला स्पष्टपणे कळवले होते.
तरी देखील महसुल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी या बदल्या केल्याच कशा? त्यासाठी कोणता आधार घेण्यात आला होता? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी उपस्थित केला.

जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे सन २०१३ मधे भुसावळ तहसीलदार पदावर असताना त्यांनी शिंदी येथील इनामी जमीनीची विल्हेवाट करण्यासाठी १९लाख ५७ हजार ५०० रुपये नजराणा बुडवला. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिका-यांचे आधिकार परस्पर वापरल्याची तक्रार भुसावळच्या प्रांताधिका-यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. हा नजराणा बुडवला की गटवला? असा प्रश्न दीपककुमार गुप्ता यांनी विचारला असून त्याचे उत्तर महसुलमंत्र्यांनी दिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

नजराना बुडवणा-या तसेच शिधापत्रिकेत अपहार केल्याची तक्रार असणा-या तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यावर कारवाईची मागणी देखील दीपककुमार गुप्ता यांनी केली होती.

याशिवाय महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातील विविध मुद्द्यांवर दीपककुमार गुप्ता यांनी शासनाचे लक्ष एक दिवसीय उपोषणाच्या माध्यमातून वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तहसीलदार वैशाली हिंगे यांची बदली झाली असल्याचे वृत्त समोर आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here