“गुगल पे” च्या माध्यमातून घरफोडीचा गुन्हा उघडकीस

काल्पनिक छायाचित्र

मीरारोड : बंद असलेल्या घरावर नजर ठेवून त्याचे कुलुप उघडण्यासाठी चावी तयार करणा-यास बोलावण्यात आले. मात्र चावी तयार झाली नाही म्हणून लॉक तोडून त्यातील चार लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले. चावी तयार करण-या कारागिरास चोराने गुगल पे च्या माध्यमातून दिलेले पन्नास रुपये पोलिसांच्या तपासकामी उपयोगी पडले. यातील दोघा आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी फरार आहे.

मीरारोड परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकर चौकातील घर मालक कामधंद्यानिमीत्त कुवैत येथे असतात. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील चार लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने तसेच काही कागदपत्रे चोरी केले होते.

सदर घटना २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी मीरारोड पोलिसांनी घर मालकासोबत संपर्क केल्यानंतर गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. चोरी गेलेला मुद्देमाल जास्त असल्यामुळे गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाला तपासादरम्यान समजले की चोरी झालेल्या घराचे कुलूप तोडण्यासाठी एक चावी तयार करणारा कारागीर बोलावण्यात आला होता. पोलिस पथकाने शोध घेवून तो चावीवाला शोधून काढला.

त्या चावीवाल्यास देण्यास चोराकडे पैसे नसल्यामुळे त्याने पन्नास रुपये गुगल पे च्या माध्यमातून जमा केले होते. चावीवाल्याकडे गुगल पे चे खाते नसल्यामुळे त्याने त्याच्या शेजारी बसणा-या चर्मकाराच्या खात्यात ते पन्नास रुपये जमा करण्यास लॉक तोडणा-या सांगितले होते.

पोलिस पथकाने त्या चर्मकारास बोलावून त्याच्या बॅंक खात्याची माहिती घेतली. त्या चर्मकाराच्या बॅंक खात्याची माहिती पोलिस पथकाला चोराकडे अर्थात खातेधारकापर्यंत घेवून गेली.

अशा प्रकारे गुगल पे च्या माध्यमातून जमा केलेले पन्नास रुपये चोराला भोवले व पोलिसांचे काम सोपे झाले.

चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलासह इस्माईल इर्शाद अहमद शेख (२२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी राहुल चौहान नेपाळला पळून जाण्यात यशस्वी झाला.

बंद घराची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवण्यात आली होती त्याच्या परिचयातील अल्पवयीन मुलाने इतरांच्या मदतीने ही घरफोडी केली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here