उदयनराजेंच्या घरातून चांदीची बंदुक चोरणाऱ्यास अटक

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या घरातून दोन किलो वजनाची शोभिवंत बंदूक चोरून नेणाऱ्या युवकास शाहुपुरी पोलिसांनी अटक केली आहे.अजून काही शोभेच्या वस्तू त्याने चोरल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक पोपट सुतार (२६) रा. माची पेठ सातारा असे अटकेतील युवकाचे नाव आहे. शाहुपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोमवारी दुपारच्या वेळी राजवाडा परिसरात गस्तीवर होते.

त्यावेळी त्यांना दीपक सुतार यांच्याकडे चांदीची बंदुक आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस स्टेशनला आणले. त्याच्याकडे ही बंदूक कुठून व कशी आली याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने अगोदर माझ्या एका मित्राने दिल्याचे तो म्हणाला.मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचा खाक्या बघताच त्याने ती दोन किलोची चांदीची शोभेची बंदूक खासदार उदयनराजे भोसले यांच्या घरातून चोरल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याच्यासह अजून कुणी साथीदार होते का याचा शोध घेतला. इतर चांदीच्या वस्तू त्याने चोरल्या असण्याची शक्यता गृहीत धरुन पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून मात्र यापूर्वी ही बंदुक चोरीस गेल्याची तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here