पत्नीने घेतले विष – पतीची फेसबुक लाईव्ह रेल्वेखाली आत्महत्या

पत्नीने घेतले विष - पतीची फेसबुक लाईव्ह रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : विष प्राशन केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीने असोदा रेल्वे गेट नजीक आल्यानंतर या घटनेबाबत फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर लागलीच धावत्या रेल्वेखाली स्वतः ला झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी सकाळी ९.२० वाजता घडली. कांचन प्रमोद शेटे (२८) असे विष प्राशन करणाऱ्या पत्नीचे तर प्रमोद तुकाराम शेटे (३२) रा.कांचन नगर असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. दरम्यान, कांचन हिने नेमकी आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे हे अजून स्पष्ट नाही. तिच्या नातलगांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद व कांचन हे कांचन नगर परिसरात दोन मुलींसह रहात होते. पत्नी-पत्नीत नेहमीच वादविवाद होत असे. मंगळवारी सकाळी दोघांत वाद झाला. त्यात कांचन हिने संतापात विषप्राशन केले तर प्रमोदने तसाच घरातून पळ काढत असोदा रेल्वेगेट गाठले.

त्याठिकाणी फेसबुक लाईव्ह करत खांब क्र.४२२/२ ते ४२२/४ दरम्यान भुसावळकडून येणाऱ्या कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली जीव देत आत्महत्या केली. यात प्रमोद याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहे.रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे विखुरले होते. मुंडके असलेले धड व कमरेपासून पाय असलेले धड उडाले होते. या घटनेची माहिती समजताच शनी पेठ पोलीस स्टेशनचे हवालदार मनोज इंद्रेकर, किरण वानखेडे व होमगार्ड विजय पाटील यांनी लागलीच घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा तसेच मृतदेहाचे दोन्ही तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले गेले.

दुसरीकडे कांचन हिला नातेवाईकांनी देवकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी रुग्णालयात जावून घटनेची माहिती जाणून घेतली. प्रमोद याने मित्राला ऑडिओ मेसेज केल्यामुळे घटना उघडकीस झाली. घटनेपूर्वी प्रमोदने सकाळी सात वाजता सोबत काम करणाऱ्या एका मित्राला ऑडीओ मेसेज केला. काही वेळाने त्या मित्राने प्रमोदच्या नातेवाईकांचे घर गाठले. तेथून प्रमोदची सासू सुरेखा राजेंद्र वाणी, शालक व मेहुणी यांनी प्रमोदचे घर गाठले.त्यांना कांचन मयत अवस्थेत आढळून आली. त्यांची दोन्ही लहान मुले झोपलेली होती. कांचनला मयत बघून आई, भाऊ व बहिणीने हंबरडा फोडल्याने झोपलेली मुले उठून बसली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here