सांगली जिल्ह्यात भाजपाच्या खासदार व आमदार गटात ढिशुम…ढिशुम

सांगली : मंदिरात चप्पल घातल्याच्या कारणावरुन खा. संजयकाका पाटील आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्या गटात जोरदार हाणामारी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

शांताबाई मारुती मासाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. मासाळवाडी येथे सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गणेश भुते यांच्यासह पाचजण मंदिरात चप्पल घालून आले होते. याबाबत आटपाडी व मासाळवाडी येथे भाजपाचे खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटात मंगळवारी जोरदार बेदम हाणामारीचा प्रकार झाला होता.

दोन्ही नेते भाजपाचे आहेत. भाजपाच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची वाहने यावेळी फोडण्यात आली. याप्रकरणी पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर तसेच मुंबई येथील आयकर विभागाचे सह आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह बारा जणांवर आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हानंद पुंडलिक पडळकर (झरे), गणेश भुते (भिंगेवाडी), नवनाथ मारुती सरगर (झरे), अनिल सूर्यवंशी (गोदिरा), विठ्ठ्ल पाटील (वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), पैलवान सत्यजित पाटील (विटा) या आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांवर, तसेच डॉ. सचिन बीरा मोटे (विभूतवाडी), विनायक ऊर्फ बापूराव मारुती मासाळ, राहुल मारुती मासाळ (दोघेही रा. मासाळवाडी), अक्षय सुदाम अर्जुन (अर्जुनवाडी), राजू पांडुरंग अर्जुन (झरे), नारायण पांडुरंग खरजे (विभुतवाडी) या खासदार पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here