लुटीचा साक्षीदार बालकाचा गळा आवळून खून ?

काल्पनिक छायाचित्र

नाशिक : येथील सामनगाव रस्त्यावरील एका नऊ वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. लुटीच्या गुन्ह्यात साक्षीदार असल्यामुळे या बालकाचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे समजते. खून केल्यानंतर बालकाचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील एका नदीकाठी फेकून देत मारेक-यांनी पळ काढल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गाडेकर मळा परिसरातील रहिवासी रामजी लालबाबू यादव (9) या मुलाला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाने भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने नाशिकरोडला ओमनी कारमधून नेले. नाशिकरोड परिसरात त्या युवकाचा दुसरा साथीदार कारमध्ये बसला. दोघांनी रामजीला खाऊचे प्रलोभन देत कारमधे बसवून ठेवले.

दरम्यान वाटेत सिन्नरफाटा येथे सिन्नरकडे जाणाऱ्या एका प्रवाशाला देखील त्यांनी कारमध्ये बसवले. पुढे ओमनी सिन्नरला नेण्याएवजी त्यांनी सामनगाव एकलहरा या दिशेने पुढे नेली.

रामजीच्या घराजवळ राहणारा युवक रात्री घरी आल्यावर त्याला रामजीच्या आईवडीलांनी आपला मुलगा कुठे आहे अशी विचारणा केली. तुमचा फोन आला त्यावेळी मी त्याला घराजवळ आणून सोडले होते असे त्याने सांगितले.

आपल्या मुलाच्या शोधार्थ हवालदिल झालेल्या रामजीच्या पालकांनी नाशिक रोड पोलिस स्टेशनला धाव घेत आपली व्यथा कथन केली. सिन्नर पोलिसांच्या मदतीने दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु असल्याचे समजते.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ओमनी वाहनातील प्रवासी विजय अनिल आव्हाड (केपानगर सिन्नर) यास दोघांनी मिळून वाटेत मारहाण केली होती. चाकूच्या धाकावर त्याच्या ताब्यातील मोबाईल व चार हजार रुपये हिसकावण्यात आले होते. त्याच्या हातावर चाकूने वार करण्यात आले होते. या सर्व घटनेचा साक्षीदार नऊ वर्षाचा बालक रामजी असल्याचे समजते. रामजी या घटनेचा साक्षीदार राहू नये म्हणून त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. रामजीचा मृतदेह सिन्नर पोलिस स्टेशन हद्दीतील डुबेरे गावाच्या नदीकिनारी फेकून दिल्याचा पोलिसांना संशय असून दोघांची चौकशी सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here