मुक्ताईनगरच्या बॉर्डरवर झाला सुपारी मर्डर;तिनच दिवसात उभा झाला तपासाचा गर्डर

D.O.Patil

जळगाव: मुक्ताईनगर तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो.

या तालुक्यात कु-हा काकोडा हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील व जागृत गाव समजले जाते. या गावातील लोक राजकीय दृष्ट्या जागरुक आणि जागृत आहेत. राजकारण म्हटले म्हणजे वर्चस्ववाद हा ओघाने येतच असतो. वर्चस्ववादासह अस्तित्वाच्या लढाईत कधी कधी खालच्या पातळीवरील राजकारण देखील केले जाते. राजकारणाच्या लढाईत कुणीतरी कुणाकडून दुखावला जात असतो. सुडाच्या राजकारणात धनशक्तीच्या बळावर आपले इप्सित साध्य करण्यासाठी कोण कधी व कोणती खेळी करेल याचा भरोसा देता येत नाही. 

मुक्ताईनगर तालुक्याच्या कु-हा काकोडा या गावातील दिनकर ओंकार पाटील अर्थात डी.ओ.पाटील हे काही वर्षापुर्वी राष्ट्रवादी पक्षात होते. राष्ट्रवादी पक्षात असतांना ते पंचायत समीतीचे सभापती झाले होते. ट्रॅक्टरच्या व्यवसायातील डी.ओ.पाटील आताच्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसवर त्यांचे चरणस्पर्श करुन भाजपात डेरेदाखल झाले होते. या विधानसभा निवडणूक काळात त्यांनी जोरदार भाषणबाजी करुन व्यासपीठ गाजवले होते. त्यांच्या या भाषणबाजीची नाथाभाऊंनी चांगल्या प्रकारे दखल घेत दाद दिली होती.

पंचायत समितीचे माजी सभापती असलेले डी.ओ.पाटील व संतोष अजाबराव पाटील हे दोघे एकमेकांचे समर्थक व मित्र होते. एके दिवशी डी.ओ.पाटील समर्थक संतोष अजाबराव पाटील याने गावातील विलास महाजन याच्या वडीलांना जुन्या वादातून मारहाण केली होती. आपल्या वडीलांना झालेल्या मारहाणीमुळे विलास महाजन याचा संतोष पाटील याच्यावर राग होता. त्या रागातून विलास महाजन याने गावातील मानकर नामक व्यक्तीच्या माध्यमातून संतोष पाटील याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे म्हटले जाते. सुड भावनेतून झालेल्या या प्रकारामुळे विलास महाजन आणी संतोष पाटील यांच्यात वैमनस्य निर्माण झाल्याचे म्हटले जाते.  

याशिवाय डी.ओ.पाटील व गावातील तेजराव पाटील यांच्यातील वैमनस्य देखील सर्वांना चांगल्या प्रकारे माहित होते. डी.ओ.पाटील आणी तेजराव पाटील हे दोघे एकमेकांचे विरोधक होते. डी.ओ.पाटील व संतोष पाटील हे समर्थक तर या दोघांचे विरोधक तेजराव पाटील व विलास महाजन असे चित्र निर्माण झाले होते. दोघा समर्थकांचे विरोधक असलेले तेजराव पाटील आणि विलास महाजन हे दोन दुखी: आत्मा एकत्र आले होते. दोघांनी मिळून डी.ओ.पाटील व संतोष पाटील यांचा काटा काढण्याचे ठरवले होते. त्या दृष्टीने दोघे कामाला लागले होते.

डी.ओ.पाटील व संतोष पाटील यांचा काटा काढण्यासाठी कुणाची मदत घ्यावी यासाठी तेजराव पाटील आणि विलास महाजन यांनी किलरचा शोध सुरु केला. कु-हा काकोडा गावातील चिकन विक्रेता साबीर सैय्यद याची मदत घेण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्याच्याकडून अथवा त्याच्या मध्यस्तीने या दोघांचा कायमचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने त्यांनी त्याच्याशी बोलणी सुरु केली. याकामी किलरचा शोध घेवून मध्यस्ताची भुमीका निभावण्यास साबीर शेख तयार झाला. दुस-या गावातील एखाद्या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणाची मदत घेण्यासाठी साबीर शेख सरसावला.  

तेजराव पाटील व विलास महाजन यांना किलर शोधून देण्यासाठी सरसावलेल्या साबीर शेख याच्या नजरेसमोर परिचीत असलेल्या निलेश गुरचळ याचे नाव आले. निलेश गुरचळ हा बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील रहिवासी होता. कु-हा काकोडा हे त्याच्या मामाचे गाव होते. त्यामुळे त्याची साबीर शेख सोबत मैत्री होती.

बोदवड तालुक्याच्या नाडगाव येथील निलेश इश्वर गुरचळ हा अल्पशिक्षीत तरुण होता. नववीपर्यंत शिक्षण झालेला विवाहीत निलेश मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत होता. आर्थिक अडचणीमुळे निलेशने बोदवड, नाडगाव व जळगाव जामोद येथील काही परिचीत मित्रांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ही रक्कम जवळपास एक लाखाच्या जवळपास होती. ती रक्कम निलेशला संबंधितांना परत करायची होती.

मे महिन्यात कु-हाकाकोडा येथील त्याचा मित्र साबीर सय्यद हा नाडगांव येथे आला होता. त्यावेळी निलेशने त्याला पाच हजार रुपये मागितले होते. त्यावर साबीरने त्याला काही दिवसांनी देतो असे म्हटले होते. काही दिवसांनी साबीर पुन्हा निलेशकडे आला. यावेळी साबीरने निलेश यास म्हटले की एक काम आहे, करशील का? या कामाचे आपल्या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतील. त्यावर निलेशने त्याला प्रतीप्रश्न केला की काय काम आहे? त्यावर उत्तरादाखल साबीरने निलेशला म्हटले की दोन जण आहेत. त्यांचे हात पाय तोडायचे आहे. तुझे समोरच्या पार्टीसोबत बोलणे करुन देतो. त्यांना तु रक्कम वाढवून सांग. एवढे बोलून प्रस्ताव ठेवून त्या दिवशी साबीर तेथून निघून गेला.

पुन्हा चार दिवसांनी साबीरचे निलेशकडे नाडगावला आगमन झाले. आज तुझी समोरच्या पार्टीसोबत भेट घालून देतो असे साबीरने निलेश यास म्हटले. साबीरने निलेशला त्याच्या दुचाकीने रात्रीच्या वेळी कु-हा काकोडा गावी एका इमारतीच्या गच्चीवर आणले. साबीरने निलेशला इमारतीच्या गच्चीवर थांबण्यास सांगितले. समोरच्या पार्टीला घेवून येतो असे म्हणत साबीर तेथून निघून गेला.

काही वेळाने तेथे साबीरसोबत दोन जण आले. त्या दोघांची साबीरने निलेशसोबत ओळख करुन दिली. त्या दोघांपैकी एकाचे नाव तेजराव पाटील व दुस-याचे नाव विलास महाजन असल्याचे निलेश यास सांगण्यात आले.

निलेश हा मालेगाव येथील फरार आरोपी असल्याचे सांगत साबीरने त्याची दोघांना ओळख करुन दिली. एकमेकांसोबत ओळख परिचय झाल्यानंतर साबीरने मुख्य विषयाला सुरुवात केली.

साबीरने निलेश यास सांगितले की, तेजराव पाटील आणि विलास महाजन यांचे काम आहे. एका शेतात दोन लोक झोपतात, त्यांचे हात पाय तोडायचे आहेत. आता तुझ्या कामाच्या मोबदल्यात रकमेचे तु दोघांशी बोलून घे. त्यावर चर्चेअंती तेजराव पाटील यांनी निलेश यास ज्या दोन लोकांचे हात पाय तोडायचे आहेत त्यांची नावे सांगितली नाही.

ज्यांना मारायचे आहे त्यांचे फोटो दाखवण्यासाठी तेजराव पाटील याने साबीर यास सांगितले. साबीरने निलेश यास त्याच्या मोबाईलमधील डी.ओ.पाटील यांचा गृपमधील फोटो झूम करुन दाखवला. त्याच रात्री साबीरने निलेश यास त्याच्या दुचाकीने नाडगाव येथे घरी सोडून दिले. त्यावेळी साबीरने निलेश यास विचारणा केली की काम केव्हा करायचे आहे ते सांग, काम झाल्यावर तुझे पैसे मी तुला घरी आणून देईन असे साबीरने निलेश यास सांगितले. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. 

11 जून रोजी दुपारी निलेश घरी असतांना साबीर त्याला भेटण्यासाठी आला. अजून आपले काम झालेले नाही. मला तेजराव पाटील यांच्याकडून सातत्याने विचारणा होत असल्याचे साबीरने निलेश यास म्हटले.लवकरच दोन ते तिन दिवसात काम करतो असे निलेशने साबीर यास सांगितले. दरम्यान ज्यांनी ज्यांनी निलेश यास कर्ज दिले होते त्यांचे निलेश यास सतत फोन येत होते. त्यामुळे लवकरात लवकर या कामातून पैसे मिळवण्यासाठी निलेश कामाला लागला.

npc-santosh-nagare

त्यामुळे घरातील पत्री छताला खोचुन ठेवलेला सुरा निलेशने बाहेर काढला. झाडाच्या काड्या तोडून तोडून त्या सु-याची धार बोथट झालेली होती. सु-याला धार लावण्यासाठी सुरा शर्टात लपवून तो लोहाराकडे गेला. त्यावेळी लोहार घरी नव्हता. त्यामुळे निलेश घरी परत आला. सु-याला धार लावण्यासाठी काही पर्याय मिळतो का याचा तो शोध घेवू लागला. सु-याला धार लावण्यासाठी त्याने गावातून भाड्याने ग्राईंडर आणले. घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने सु-याला धार लावून घेतली.

त्याच वेळी दुपारच्या वेळी साबीर पुन्हा त्याच्या समोर हजर झाला. आपल्याला तेजराव पाटील आणि विलास महाजन सारखे सारखे काम केव्हा होणार आहे? याची विचारणा करत असल्याचे त्याने निलेशला सांगितले.

आपण त्याच कामासाठी सु-याला धार लावत असल्याचे निलेशने साबीर यास सांगितले व सुरा देखील दाखवला. तेजराव पाटील आणि विलास महाजन या दोघांना दाखवण्यासाठी साबीरने त्या धारदार सु-याचा फोटो मोबाईलमधे काढून घेतला. तुला आताच्या आता तेजराव पाटील आणि विलास महाजन या दोघांनी बोलावले असल्याचे साबिरने त्याला सांगितले. साबीर घाई करत असल्यामुळे निलेशने तो सुरा आणि ग्राईंडर पलंगाखाली लपवून त्याच्यासोबत जाण्याची तयारी केली.

devasing-tayade-pc

साबीर आपल्या मागेच लागल्याचे बघून निलेशने त्याचा मित्र गणेश पवार यास मोटार सायकलची व्यवस्था करण्यास सांगितले. गणेश पवार याने त्याच्या दुस-या मित्राची मोटार सायकल त्याला आणून दिली. दरम्यान गावातील सप्तश्रृंगी मातेच्या मंदीराजवळ साबीर व निलेश उभे होते. त्या ठिकाणी निलेश यास गावातील कार्तिक जाधव भेटला. निलेशने कार्तिक यास बाजुला नेत कु-हा येथे जाण्याचे प्रयोजन सांगितले.

या कामात निलेशने त्याचा मित्र कार्तिक यास देखील सहभागी करुन घेतले. निलेशने कार्तिक यास सांगीतले की आपल्याला साबिर सोबत कु-हा येथे जावून आज दोघा जणांच्या हत्येची फायनल बोलणी करुन घ्यायची आहे. दोघा जणांना मारायचे नियोजन आहे. मात्र त्यातील एक जण माझा मित्र असावा अशी मला शंका येत आहे. त्यामुळे मी त्याला मारणार नाही. मी फक्त डी.ओ.पाटील यांना मारणार आहे. त्या एकाच जणाला मारण्याची बोलणी आपण करुन घेवू आणि पैशांचे देखील बोलून घेवू.

निलेशने कार्तिक जाधव यास डबलसिट बसवून घेतले. साबीर त्याच्या मोटार सायकलने पुढे जात असतांना निलेश व कार्तिक दुस-या मोटार सायकलवर त्याच्या मागे होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वाटेत धामणगाव फाट्यावर सर्व जण थांबले. काही वेळात तेजराव पाटील यास चर्चेसाठी येथे घेवून येतो असे साबीरने दोघांना सांगीतले व तेथेच थांबण्यास सांगितले. दोघांना थांबण्यास सांगून साबीर तेथून निघून गेला. काही वेळात साबीर व तेजराव पाटील असे दोघे जण वेगवेगळ्या मोटार सायकलने तेथे आले.

तेजराव पाटील याने निलेश यास म्हटले की आपल्या कामाला फार उशीर होत आहे. आपले काम लवकरात लवकर झाले पाहिजे. आपण बाहेरगावी गेल्यामुळे काम होवू शकले नाही असे म्हणत निलेशने वेळ मारुन दिली. यावेळी बोलतांना निलेशने स्पष्ट केले की मी फक्त डी.ओ.पाटील यांना मारेन. त्यावर तेजरावने निलेश यास सांगितले की डी.ओ.पाटील यांचा हात कापला तर तुला तिस हजार रुपये देईन.

जिवे ठार केले तर सव्वा लाख रुपये देईन. त्यावर निलेशचा सोबती कार्तिक याने तेजराव पाटील यास म्हटले की मी डी.ओ.पाटील यास जिवानिशी मारतो मला तुम्ही पाच लाख रुपये द्या. त्यावर तेजराव पाटील त्याला म्हणाला की एवढे पैसे देण्याइतपत तो मोठा माणूस नाही. मी जास्तीत जास्त दीड लाख रुपये देईन. त्यावर कार्तिक त्यास म्हणाला की जावू द्या आता तिन लाखात फायनल करा, आम्ही काम करतो.

अखेर तेजराव पाटील याने अडीच लाखात काम करण्यास सांगितले व काम झाल्यावर बक्षिस म्हणून एक लाख रुपये देण्याचे कबुल केले. याशिवाय पोलिस स्टेशनचे काम बघून घेईन असे सांगितले.

अखेर अडीच लाख रुपयात काम करण्याचे दोघांनी कबुल केले. लवकरच एक ते दोन दिवसात डी.ओ.पाटील यांना ठार करण्याचे ठरले. काम होताच साबीरला पैसे घेण्यासाठी माझ्याकडे पाठवा असे तेजराव पाटीलने दोघांना सांगितले. एवढे बोलणे झाल्यावर साबीर आणि तेजराव हे दोघे माघारी निघून गेले.

15 जून रोजी घरात कुणी नसल्याचे बघून निलेशने पुन्हा एक वेळा ग्राईंडर मशीन व सुरा बाहेर काढला. सु-याला अर्ध्या तासात चांगली धार लावून घेतली. सु-यासोबत चाकू व सरोटयाला देखील त्याने व्यवस्थित धार लावून घेतली. तिघा वस्तूंना धार लावून झाल्यावर सर्व हत्यारे आणि ग्राईंडर मशीन पुन्हा लपवून ठेवले.

दुस-या दिवशी 16 जून रोजी निलेश आणि कार्तिक जाधव असे दोन्ही जण रेल्वे स्टेशनकडे जात होते. वाटेत त्यांना अमोल लवंगे नावाचा मित्र भेटला. निलेशने त्याला देखील आपल्यासोबत सामील करुन घेतले. ठरल्यानुसार रात्री तिघे जण एकत्र जमले.

निलेश सर्व तयारीनिशी घरुन आला होता. निलेशने कार्तिकची जिन्स पॅंट, जॅकेट व बुट घालून आला होता. सोबत त्याने धारदार सुरा जॅकेटमधे लपवून ठेवला होता. ठरल्यानुसार रात्री साडे आठ वाजता अमोल लवंगे त्याची मोटार सायकल घेवून आला.

मोटार सायकल चालक अमोल लवंगे याने त्याच्या मागे कार्तिक व शेवटी निलेश यास बसवले. तिघे जण ट्रिपल सिट धामणगाव फाट्यामार्गे कु-हा काकोडा गावाच्या दिशेने निघाले.  वाटेत निलेशने मोटार सायकल उभी करण्यास सांगितले. मोटार सायकलच्या नंबर प्लेटला चुना लावून नंबर मुद्दाम अस्पष्ट केला. 16 जूनच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तिघे जण कु-हा येथे पोहोचले. 17 जूनची पहाट डी.ओ.पाटील बघणार नसल्याचे विधीलिखीत होते. त्यांच्या मागावर असलेले मारेकरी कु-हा काकोडा गावात आले होते.

निलेशने अमोलच्या मोबाईलवरुन गावातील मित्र आकाश पवारच्या मोबाइलवर कॉल केला. त्याला कॉल करुन साबीर यास कॉन्फरन्स वर घेण्यास सांगीतले. अशा प्रकारे निलेशने अमोलचा फोन वापरुन आकाश पवार मार्फत साबीर सोबत संपर्क साधला.

फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास निलेशला भेटण्यासाठी साबीर आला. भेटी दरम्यान साबीरने निलेश यास मोबाईल मधे फिकट निळा रंग दाखवला. याच रंगाचा शर्ट आज डी.ओ.पाटील यांनी घातला असल्याचे निलेश यास सांगण्यात आले. डि.ओ.पाटील हे ट्रॅक्टरच्या व्यवसायात असल्याने व दररोज द्वारका किसन पेट्रोल पंपावर रात्री अपरात्री झोपण्यास जातात हे साबीर यास माहित होते.

पेट्रोल पंप परिसरात तिघांनी त्या रात्री रेकी केली. आस्था नगरी, चिकनचे दुकान अशा भागात फिरुन ही रेकी करण्यात आली. त्यावेळी पेट्रोल पंपावर तिन जण बसलेले होते. अशा प्रकारे सर्व पाहणी केल्यानंतर निलेश व त्याचे सोबत असलेले कार्तिक व अमोल मोटार सायकलने पुढे एका पत्र्याच्या शेडजवळ रात्री 11.30 वाजेपर्यंत बसून राहिले. दरम्यान अमोल व कार्तिक हे दोघे तेथेच जमीनीवर झोपून गेले.

निलेश मात्र फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवून होता. एकाच जागी बसून कंटाळा येत असल्यामुळे तो अधून मधून बिडी ओढत होता. अशा प्रकारे लांबूनच निलेश पेट्रोल पंपावर लक्ष ठेवून बसला होता.

रात्री अडीच वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील तिघे जण झोपले. पंपावरील तिघे जण झोपल्याचे बघून निलेशने कार्तिक व अमोल या दोघांना झोपेतून उठवले. आता 17 जून ही तारीख सुरु झालेली होती. हळूच अमोलने मोटार सायकल सुरु केली. तिघे ट्रिपल सिट बसले. कार्तिक मध्यभागी व निलेश सर्वात मागे बसला. आपल्याला कुणी बघत तर नाही ना याची चाचपणी करण्यासाठी तिघांनी परिसरातील चिकनच्या दुकानाजवळ जावून फेरफटका मारला. चिकनच्या दुकानाजवळ गेल्यानंतर आपल्या आजूबाजूला कुणीही नसल्याची तिघांना खात्री झाली.   

चिकनच्या दुकानाच्या पुढे काही अंतरावर अमोलने मोटार सायकल बंद केली. अंधारात एका ठिकाणी मोटार सायकल उभी केल्यानंतर अमोल तेथेच थांबला. गरज पडल्यास मदतीसाठी दगडफेक करण्याची गरज भासल्यास कार्तिक हातात दगड घेत रस्त्यावर उभा राहिला. निलेश हळू हळू चोरपावलांनी पेट्रोल पंपाच्या दिशेने चालू लागला. फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम अर्थात डी.ओ.पाटील हे निलेशचे टार्गेट होते.

पेट्रोल पंपावर एकुण तिन जण झोपलेले होते. त्यातील बरोबर फिकट निळा रंग असलेला शर्ट परिधान केलेला इसम ओळखून निलेशने जॅकेट मधून सुरा बाहेर काढला. अवघ्या सोळा सेकंदात होत्याचे नव्हते झाले. या सोळा सेकंदाच्या कालावधीत निलेशने जॅकेट मधून सुरा बाहेर काढून पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या गळ्यावर दोन वेळा जोरदार वार केले.

गाढ झोपेत असलेल्या डी.ओ.पाटील यांनी एका क्षणात आपला जिव सोडला. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. डी.ओ.पाटील आता वाचणार नाही असे लक्षात येताच निलेश हातातील सु-यासह धावत धावत अमोल उभ्या असलेल्या मोटार सायकलजवळ आला.निलेश धावत येताच कार्तिकने हातातील दगड बाजुला फेकून देत तात्काळ किक मारुन मोटार सायकल सुरु केली. काही सेकंदात गाडीच्या सिटवर मध्यभागी अमोल व शेवटी निलेश बसला.

तिघे जण ट्रिपलसिट धुपेश्वर मार्गे नाडगाव येथे सकाळी सव्वापाच वाजता पोहोचले. अमोल यास त्याच्या घरी सोडून देत दोघेही निलेशच्या घरी आले. निलेशने जॅकेट, चेह-याला बांधलेला रुमाल,परिधान केलेली जिन्स पॅंट कार्तिकच्या मदतीने जाळून टाकली. कार्तिकने घरातील चाकू, सरोटा व निलेशजवळ असलेला सुरा काळ्या कपड्यात बांधून आयटीआय कॉलेजसमोर असलेल्या विहीरीच्या पाण्यात फेकून दिला.

त्यानंतर कार्तिक जाधव इंदोर येथे पळून गेला.या हत्येची वार्ता परिसरात पसरण्यास वेळ लागला नाही.माहिती मिळताच मुक्ताईनगर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी देवीदास पिंगळे, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पो.नि. सुरेश शिंदे असे सर्व जण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

या निर्दयी घटनेची माहिती समजताच जळगाव येथून स्वत: पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम असे आपाआपल्या सहकारी कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले. एका राजकीय व्यक्तीचा निर्घृण झाल्यामुळे कु-हा काकोडा गावात व परिसरात शोककळा पसरली होती.

कु-हा काकोडा हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे तसेच हा खून राजकीय व्यक्तीचा असल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली. गावकीच्या राजकारणात अ‍ॅट्रॉसिटीचा वापर केल्यामुळे मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांचा 17 जूनच्या पहाटे खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या गुन्हयातील तपासात क्रमाक्रमाने ग्रा.प.सदस्य तेजराव पाटील, विलास महाजन, सैय्यद साबीर सैय्यद शफी यांच्यासह बोदवड तालुक्यातील निलेश गुरचळ व अमोल लवंगे यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली.या खूनाची सुपारी अडीच लाख रुपयात देण्यात आली असली तरी यापैकी एक रुपयादेखील मारेक-यांपर्यंत पोहोचली नसल्याचे समजते.

या गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी देवीदास पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पो.नि. सुरेश शिंदे, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाने. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक कैलास बारसके, निलेश साळुंके, पोलीस नाईक संतोष नागरे, सहाय्यक फौजदार माधवराव पाटील, माणिक निकम , पोलीस नाईक संदीप खंडारे, दिलीप चिंचोरे. प्रवीण वाघ, श्रीकांत, नितीन चौधरी,देवसिंग तायडे, अनिल सोनवणे, संजय लाटे, कांतीलाल केदारे, अविनाश पाटील, गणेश चौधरी, सुरेश पाटील, मोतीलाल बोरसे, लतीफ तडवी,संतोष कात्रे, फॉरेन्सिक टीम जळगावचे विकास वाघ, योगेश वराडे आदींनी अथक परिश्रम घेतले. या गुन्हयाच्या तपासकामी सायबर शाखेची यंत्रणाच मुक्ताईनगर येथे नेण्यात आली होती.

मुक्ताईनगर पासून कु-हा काकोडा सुमारे 35 कि.मी. अंतरावर आहे. त्यापुढील 5 कि.मी. अंतरावरील वढोदा गावाच्या नाल्यापासून विदर्भाची हद्द सुरु होते. या भागात गुप्त धनाचे आमीष दाखवून लुटणारे महाभाग आहेत. तसेच पैशांचा पाऊस पाडणारे भोंदू भगत असल्याचे सांगतात. त्याशिवाय “नागमणी’ देवून  धनसंपत्ती – मालामाल करणा-या बहाद्दरांच्या टोळ्यांचा वावर असतोच.

अशा पद्धतीचे काही गुन्हे गेल्या विस वर्षात रेकॉर्डला आहेत. या खेरीज एखाद्याची हत्या करण्याच्या मागे जी तिन कारणे सांगितली जातात ती म्हणजे जर, जरा व जमीन अर्थात संपत्ती, शेतजमीन व स्त्री. यापैकी कोणते एखादे कारण असावे का? अशा दिशेने पोलिसांनी प्रथमदर्शनी तपास सुरु केला होता. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज मधे आरोपी कैद झाला होताच. त्याचा मागोवा घेण्यासाठी जळगाव जामोद, बुरहानपुर आदी भागात शोध घेण्यात आला. जेथे खून त्या मुक्ताईनगर गावापासून मुक्ताईनगर, मलकापूर, बुरहानपूर प्रत्येकी 35 कि.मी. अंतरावर आहेत.

त्यामुळे मारेकरी कोण आणि त्याचे लागेबांधे कुठवर असावे याचा शोध सुरु झाला. पुढील तपासात गावातील चिकन विक्रेता सय्यद साबीर याच्यावर प.स.चे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या हत्येची धुरा देण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर पुढील तपासाला गती मिळाली. अवघ्या तीन दिवसात पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सुरेश शिंदे व त्यांच्या सहका-यांनी या गुन्हयाचा छ्डा लावला.

कु-हा काकोडा गावात ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून तालुक्यात व जिल्हयाच्या राजकारणात मुसंडी मारुन प्रस्थापितांचा स्पर्धक होण्याची क्षमता असणा-यांना गावपातळीवरच कसे गारद केले जाते त्याचा कु-हाकाकोडावासीयांना चांगलाच अनुभव असल्याचे सांगितले जाते. सुमारे तिस वर्षापुर्वी कु-हाकाकोडा गावात रामसिंग राजपूत (पाटील) नावाचे सरपंच होते. माणूस तसा बराच लोकप्रिय होता.

त्यांच्याविरुद्ध देखील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायद्याच्या तरतुदी नुसार त्याकाळात जामीन मिळवण्याचा मार्ग दुर्धर असला तरी प्रयत्न तर करायलाच हवा म्हणून रामसिंग यांनी त्यांच्या समजूतीप्रमाणे जळगावकडे धाव घेतली होती. घरदार सोडून पोलिसांच्या धाकाने ते लपत फिरले. विशेष म्हणजे पोलिस देखील एखाद्या दरोडेखोराचा माग घ्यावा त्या पद्धतीने त्यांच्या मागावर पिच्छा पुरवत होते.

सरपंच पदावरील व्यक्तीला त्या काळात घरदार सोडून चारसहा महिन्यांचा वनवास घडला. उच्च न्यायालयाने देखील अटकपुर्व जामीन फेटाळल्याने शेवटी मुक्ताईनगर पोलिसांपुढे हजर व्हावे लागल्याचा किस्सा कित्येकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे कु-हा काकोडा भागात अ‍ॅट्रॉसिटीची प्रचंड दहशत असून त्याचा गैरवापर करणा-यांबद्दल प्रचंड चिड  असल्याचे देखील सांगितले जाते.

केवळ मुक्ताईनगरच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील राजकीय प्रस्थापित नेतेगण-पदाधिकारी राजकीय प्रतिष्ठा तयारच होवू नये यासाठी जी आयुधे वापरतात त्यात एखाद्या गरिब दलिताला हाताशी धरुन अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा सर्रास गैरवापर करण्याचा प्रकार केला जातो. 

गावपातळीवरील कोणत्या कार्यकर्त्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचू द्यायचे आणि कुणाला आमदारकीच्या स्पर्धेतून बाद करण्यासाठी संधी नाकारुन खाली फेकायचे हा राज्याच्या राजकारणातील घातक खेळ प्रत्येक जिल्हयात खेळला जातो. त्यास जळगाव आणि कु-हा काकोडा देखील अपवाद नाही हाच एक धडा सध्याच्या खून प्रकरणातून कुणी शिकेल काय? 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here