दुचाकीस्वाराचा कारमधील प्रवाश्यांवर हल्ला

जळगाव : साईड का दिली नाही, खाली उतर तुला आता दाखवतो असे म्हणत दुचाकीस्वाराने कारचालकासह कारमधील महिला सदस्यांसह पाचही जणांना जखमी केले. भर दुपारी शहरातील डी मार्ट नजीक झालेल्या घटनेत तात्काळ पोलिस पथक दाखल झाले व दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले.

विठ्ठल पेठ भागातील रहिवासी योगेश साळुंखे यांचे वडील सुरेश साळुंखे यांच्यावर नाशिक येथे मणक्याच्या ऑपरेशनकामी वैद्यकीय उपचार सुरु आहेत. नियोजीत तारखेवर वैद्यकीय तपासणीकामी सुरेश साळुंखे हे त्यांच्या परिवारातील सदस्यांसह कारने नाशिक येथे जात होते. दुपारी दिड वाजेच्या सुमारास इच्छादेवी ते डी मार्ट दरम्यान कारने मार्गक्रमण करत असतांना एका दुचाकीचालकाने त्यांच्या कारच्या पुढे त्याच्या ताब्यातील दुचाकी आडवी लावली. कारचालक अरुण साळुंखे यांना त्याने म्हटले की “तु मला इच्छादेवी मंदीरापासून साईड का दिली नाही? तु खाली उतर आता मी दाखवतो” असे म्हणत शिवीगाळ करु लागला.

त्याने हातातील रॉडने कारमधे बसलेल्या महिला सदस्यांसह सर्वांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीचालक ऐकून वा समजून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याने लोखंडी रॉडने सुरेश साळूंखे व अरुण साळुंखे या दोन्ही भावांच्या डोक्यावर मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. कारमधील लताबाई साळुंखे यांच्या डाव्या हाताच्या बोटास या हल्ल्यात दुखापत झाली. दरम्यान एक इसम तेथे आला. त्याने योगेश साळुंखे यांच्या हाताच्या कोपरावर दगड मारुन दुखापत केली व उर्मीलाबाई साळुंखे यांचा हात पिरगाळला.

या घटनेदरम्यान रस्त्यावर गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरिक्षक विशाल सोनवणे, पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, किशोर बडगुजर, पो.हे.कॉ. अल्ताफ पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेत एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणण्यत आले. या प्रकरणी हेमंत संतोष चौधरी व जगदीश संतोष चौधरी (दोन्ही रा. आदर्श नगर मोहाडी फाट्याजवळ मकरा पार्क शेजारी जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न.119/21 भा.द.वि. 326, 341, 504, 506,34 नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास पो.हे.कॉ. नितीन पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here