खोटी साक्ष देणा-या फितुर तक्रारदारास सश्रम कारावास

जळगाव : लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईच्या खटल्यात तक्रारदाराने न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे खटल्यातील दोघे निर्दोष सुटले. फितुर झालेल्या तसेच खोटी साक्ष देणा-या तक्रारदाराविरुद्ध योग्य ती कारवाई होण्याकामी लाचलुचपत विभागामार्फत अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी फितुर तक्रारदारास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशाल पंडीत सोनवणे रा. भिमनगर, बोदवड असे शिक्षा सुनावलेल्या तक्रारदाराचे नाव आहे.

विशाल पंडीत सोनवणे यांना आधारकार्ड काढायचे होते. त्याकामी ते अधिकृत महा ई – सेवा केंद्र जामनेर रोड बोदवड येथे गेले होते. त्यावेळी त्यांना तेथील ऑपरेटर निलेश देशमुख व चंद्रकांत नामदेव महाजन यांनी आधारकार्ड काढण्याकामी 160 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी विशाल सोनवणे यांनी एसीबी जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीकडून रितसर सापळा कारवाई करण्यात आली होती. दोघा आरोपींवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भुसावळ यांच्याकडे विशेष केस क्रमांक 12/15 नुसार खटला दाखल करण्यात आला होता.

या खटल्याच्या कामकाजाच्या वेळी विशाल पंडीत सोनवणे यांची साक्ष झाली होती. त्यांनी खोटी साक्ष दिल्यामुळे 13 जानेवारी 2020 रोजी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. फितुर तक्रारदाराविरुद्ध योग्य ती कारवाई होण्याकामी खटला चालवण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या वतीने भुसावळ येथील सरकारी अभियोक्ता विजय खडसे यांना विनंती करण्यात आली होती. 11 फेब्रुवारी रोजी सदर खटला दाखल करण्यात आला. न्या. एस.बी. भंसाली यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज पुर्ण झाले. न्यायालयाने फितुर तक्रारदार विशाल सोनवणे यास दोषी ठरवण्यात आले. त्यास 2 महिने सश्रम कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here