जळगावच्या दुहेरी खूनाचा अखेर सुटला गुंता

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील स्वामी समर्थ शाळेच्या मागे गेल्या 21 व 22 एप्रिलच्या दरम्यान रात्रीच्या वेळी मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशा पाटील या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. घटनेदरम्यान आशा पाटील यांच्या अंगावरील दागिने जबरीने चोरुन नेण्यात आले होते. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध भाग 5 गु.र.न. 302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांचे सहकारी करत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे जवळपास सात ते आठ पथक या तपासकामी रात्रंदिवस परिश्रम घेत होते. या तपासकामी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुन्हेगारांची तपासणी कसुन सुरु होती. सर्व तपासाअंती संशयीत देविदास नामदेव श्रीनाथ (40) रा.गुरुदत्त कॉलनी, कुसुंबा ता.जि.जळगाव मुळ रा.सुदामानगर शेगाव ता.खामगाव जि.बुलढाणा, अरुणाबाई गजानन वारंगणे (30) रा.कुसुंबा ता.जि.जळगाव सुधाकर रामलाल पाटील (45) रा. चिंचखेडा तपवन गावठाण नं. 2 ता.जामनेर यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्हयाची सखोल चौकशी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार अरुणाबाईने मयत आशाबाईकडून कडून व्याजाने पैसे घेतले होते. सुधाकर पाटील हा सुध्दा आर्थिक अडचणीत होता. आशाबाईकडे मोठया प्रमाणात रोख रक्कम व सोन्याचे दागिने रहात होते. अरुणाबाईसह सुधाकर पाटील यांनी मिळून आशाबाईला मारण्याचा व तिच्याकडील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटण्याचा सुरुवातीला कट रचण्यात आला.

सुधाकर पाटील याने गळफास देण्यासाठी दोरी व कटर देविदास व अरुणाबाई यांचे कडेस ठरल्यानुसार दिली. त्यानंतर देवीदास व अरुणाबाई असे दोघे जण सुरुवातीला आशाबाई व मुरलीधर पाटील या दाम्पत्यांच्या घरी गेले. त्यानंतर थोडयावेळाने सुधाकर पाटील हा तेथे गेला. देविदास श्रीनाथ व सुधाकर पाटील या दोघांनी सुरुवातीला मुरलीधर पाटील यास घराच्या गच्चीवर गळफास देत ठार केले. दरम्यान अरुणाबाईने घरातच आशाबाई मुरलीधर पाटील हिला घरगुती गप्पांमधे व्यस्त ठेवले. देविदास श्रीनाथ हा गच्ची वरुन खाली घरात आला त्यावेळी आशाबाई पाटील ही खुर्चीवर बसलेली होती व अरुणाबई तिच्याजवळ खाली बसलेली होती. देविदास श्रीनाथ आल्यानंतर त्याने आशाबाईच्या गळ्याला दोरीने फास देत ठार केले. आशाबाईला ठार करत असतांना तिची हालचाल रोखण्यासाठी सुधाकर पाटील याने तिचे पाय घट्ट धरुन ठेवले. अरुणाबाई वारंगणे हिने उशीने तोंड दाबून तिला ठार करण्याकामी मदत केली.

दोघे पती पत्नी ठार झाल्यानंतर तिघा आरोपींनी आशाबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील रोख रक्कम काढुन घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर सुधाकर पाटील हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवर आणि देविदास श्रीनाथ व अरुणाबाई वारंगणे हे दोघे देविदासच्या मोटार सायकलवर बसुन चिंचखेडा येथे पसार झाले. तिघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here