अपशकुनी समजून तिला घरातच डांबून ठेवले! निष्पाप बालिकेला कुपोषीत करुन जिवे मारले!!

जळगाव : जावेद अख्तर आणि नाजीया परवीन हे दाम्पत्य जळगाव शहरातील रजा नगर पिंप्राळा -हुडको परिसरात रहात होते. या दाम्पत्यास सन 2009 मधे पहिली मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव कनीज असे ठेवले. पहिली मुलगी कनीज झाल्यानंतर काही दिवसातच जावेद अख्तर याच्या आईचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जावेदच्या मेडीकल दुकानास आग लागली. सलग काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे जावेद हताश झाला. आपल्या घरात जन्माला आलेली कनीज ही आपल्यासाठी अपशकुनी असल्याचा त्याने मनाशी गैरसमज करुन घेतला. हळूहळू त्याच्या मनातील हा गैरसमज दृढ होत गेला. त्याच्या मनातून या बालिकेबद्दल निर्माण झालेला गैरसमज जाण्याचे काही केल्या नाव घेत नव्हता. मनात आलेला गैरसमज त्याच्या मनात कायमचे वास्तव्य करुन बसला. आपली पोटची मुलगी अपशकुनी असल्याच्या गैरसमजातून त्याने तिला त्रास देण्याचे काम सुरु केले. निष्पाप कनीजने या जगाची साधी तोंडओळख देखील केली नव्हती. मात्र ती आपल्या बापाच्या दृष्टीने अपशकुनी ठरली होती. तिचा काहीही दोष नसतांना ती आपल्या जन्मदात्या बापाच्या दृष्टीने अपशकुनी ठरली होती.

तिच्या आजीचे अर्थात जावेदच्या आईचे निधन हे विधीलिखीत होते. झालेले वय आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने जावेदच्या आईचे निधन झाले होते. तसेच जावेद अख्तर याच्या मेडीकल दुकानाला लागलेल्या आगीचा आणि तिच्या जन्माचा देखील तसा कोणताही संबंध नव्हता. तरीदेखील ती आपल्या बापाच्या दृष्टीने अपशकुनी ठरली होती हे तिचे दुर्दैव होते.

सन 2009 मधे जन्माला आलेल्या कनीजचा जन्मदात्या बापाकडून मानसिक व शारिरीक छळ होत असल्याचे बघून तिचा मामा अजहर अली शौकत अली यास राहवले गेले नाही. त्याने भाची कनीजला आपल्या गावी अमळनेर येथे सोबत आणले. मामा अजहर अली यास भाची कनीजची दया आली होती. त्यामुळेच बापाच्या छळातून त्याने तिची सुटका केली. बापाचे नेहमी नेहमी रागावणे, मारहाण करणे, तिला जड वस्तू फेकून मारणे  या गोष्टीपासून तिची सुटका झाली होती. त्यामुळे तिला मामा अहजरचा लळा लागला होता. मामा अजहर यानेच तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली. अमळनेर येथील शाळेत त्याने तिचे नाव दाखल केले. ती मामाच्या घरकामात मदत करु लागली. अशा प्रकारे बालिका कनीज ही मामाच्या घरी लवकरच रुळली.  बघता बघता दहा वर्षाचा कालावधी उलटला. कनीज आता सुमारे दहा वर्षाची झाली होती. या दहा वर्षाच्या कालावधीत देखील बाप जावेद याच्या मनातून मुलगी कनीजबद्दल  राग कायम होता. तो आजही तिला अपशकुनी अर्थात मनहूस समजत होता.

दहा वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर जावेदने कनीजचा मामा अर्थात त्याचा शालक अजहर सोबत भांडण सुरु केले. माझी मुलगी तु का नेली. तिला आमच्या ताब्यात दे असे म्हणत जावेदने शालक अजहरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद जवळच्या नातेवाईकांपर्यंत गेला. समाजातील चार प्रतिष्ठीत नातेवाईकांना बोलावून त्यांच्या कानावर हा विषय घालून मार्ग काढण्याचा अजहर याने प्रयत्न केला. अखेर चार प्रतिष्ठीत नातेवाईकांच्या समक्ष व त्यांच्या माध्यमातून कनीजला कुठलाही त्रास दिला जाणार नाही असे जावेदकडून वदवुन घेण्यात आले. अटी शर्थीवर कनीजला जावेदच्या ताब्यात देण्यात आले. एवढे वर्ष सोबत राहिलेली भाची बापाच्या ताब्यात जात असल्याचे बघून तिचा मामा अजहर यास गहिवरुन आले होते. कनीजला देखील मामाचे घर सोडून जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. मात्र बापाच्या हेकेखोरपणापुढे तिचे व कुणाचेच काही चालले नाही. आता कनीज ही बाप जावेद व आई नाजीया यांच्या ताब्यात आली होती. मुलगी कनीज आपल्या ताब्यात आल्यापासून जावेद व नाजीया या दाम्पत्याने अजहर सोबत जणू काही नातेसंबंध तोडून टाकले.

आता मात्र या नराधम बापाने कनीजला अमानवी पद्धतीने अतिशय कृर वागणूक देण्यास सुरुवात केली. हा बाप नसून हैवान असल्याचे निष्पाप कनीजला दिसून आले. ती दहा वर्षाची बालिका हतबल  होती. जावेदने त्याच्या पत्नीला सक्त ताकीद दिली की कनीजला अतिशय कमी प्रमाणात खायला द्यायचे. तिला उपाशी ठेवल्यानंतर ती आपोआप मरुन जाईल असे त्याने पत्नी नाजीयाला म्हटले.

नराधम बाप जावेदने कनीजला एका खोलीत डांबून ठेवले. तिचे खेळण्याबागडण्याचे वय असतांना तिला एका खोलीत डांबून नजरकैदेत ठेवण्यात आले. तिला खायला जवळपास दिलेच जात नव्हते. पिण्यास पाणी वेळेवर दिले जात नव्हते. तिला अंघोळ करु दिली जात नव्हती. तसेच तिच्या केसांना लावण्यास तेल दिले जात नव्हते. त्यामुळे तिचे घनदाट केस रुक्ष होण्यास सुरुवात झाली होती. तिच्या केसांमधे लवकरच उवा, खवले आणी कोंडा निर्माण होण्यास सुरुवात झाली. खायला अन्न व पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे तिची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. ती दिवसेंदिवस कुपोषीत होऊ लागली. खिडकीतून ती आपल्या वयाच्या मुला मुलींना खेळत असल्याचे बघत असे. मात्र इच्छा असून देखील ती बाहेर खेळण्यास जाऊ शकत नव्हती. ती एका खोलीत बंदीस्त होती. तिला बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. तिचा कुणाशी संपर्क देखील येऊ दिला जात नव्हता. वेळप्रसंगी जावेद पोटची मुलगी कनीजला बेदम मारहाण करु लागला. एके दिवशी त्याने अवजड कुकर तिच्या पाठीत मारुन फेकला. त्यामुळे आधीच कुपोषीत बालिका कनीज जखमी झाली व जमीनीवर धाडकन कोसळली. तिला वैद्यकीय उपचारापासून मुद्दाम वंचीत ठेवण्यात आले. ज्या दिवशी तिच्या पाठीत अवजड कुकर जावेदने मारुन फेकला तो दिवस इद ए मिलादचा दिवस होता. या चांगल्या दिवशी देखील जावेदच्या मनात आणि अंगात सैतानी रुप आले होते. बालिका आपली असो वा इतर कुणाचीही असो एवढे नराधमपणे कुणीही वागत नाही हे जावेदला समजत नव्हते. परक्याची बालिका जवळ आली म्हणजे तिला आपुलकीने खायला, प्यायला दिले जाते. एवढा साधा आणी सरळ  विचारदेखील जावेदच्या मनात येत नव्हता. पाठीवर कुकर मारुन फेकल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे तिला सरळ उभे राहणे अवघड झाले होते. ती घसरत घसरतच हाताच्या मदतीने चालत होती. तिला बाहेर जाण्या येण्यास बंदी असल्यामुळे तीला खोलीतच नाईलाजाने प्रातर्विधी करण्याची वेळ आली होती. एवढा अमानवी व्यवहार तिच्यासोबत करतांना बाप असलेल्या जावेदचे मन जराही द्रवले नव्हते. एवढे कमी झाले म्हणून की काय तो तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असे. आपण हिला खायला द्यायचे नाही म्हणजे ही आपोआपच मरुन जाईल असे त्याने पत्नी नाजीयाला बजावून ठेवले होते. आपल्या भाचीवर होत असलेला अन्याय अजहर यास बहिण नाजीयाकडून समजला होता. बहिण नाजीयाकडून समजलेल्या या अमानवी घटनेमुळे कनीज फातेमा शेख जावेद हिच्या मामाला गहिवरुन आले.

अखेर ती काळरात्र आली. खाण्यास अन्न नाही व पिण्यास पाणी नाही व कित्येक दिवसांपासून अघोळ देखील नाही व त्यामुळे कनीजने आपले प्राण त्यागले. 23 एप्रिलच्या रात्री नऊ वाजता तिचा मृत्यू झाला. मनहुस अर्थात अपशकुनी म्हणून अनन्वीत छळ करण्यात आलेल्या कनीज य दहा ते अकरा वर्षाच्या बालिकेने आपला जिव सोडून मृत्युला कवटाळले होते. आपली मुलगी मरण पावल्याचे समजल्यावर देखील नराधम बाप जावेदला दुख: झाले नाही. दुस-याच दिवशी 24 एप्रिल रोजी सकाळी त्याने कुणाला न कळवता तिच्या मृतदेहाचा दफनविधी भराभर आटोपून घेतला. या संशयास्पद मृत्यूची माहिती मयत कनीजचा मामा अजहर यास उशीरा समजली.

अजहर अली शौकत अली याने 27 एप्रिल रोजी रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांची भेट घेत लेखी स्वरुपात माहिती देत आपली कैफीयत मांडली. आपल्या मयत भाचीला न्याय मिळावा आणी तिच्या नराधम माता पित्याला शासन व्हावे अशी विनंती अजहर अली याने पो.नि.बडगुजर यांना केली. या गंभीर घटनेची पो.नि. अनिल बडगुजर यांनी तातडीने दखल घेत वेगवान हालचाली सुरु केल्या. या घटनेची माहिती पो.नि.अनिल बडगुजर यांनी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या कानावर घातली. सर्व बड्या अधिका-यांसह पो.नि. अनिल बडगुजर यांनी दफनविधी झालेल्या घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी सर्व प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. सदर अकस्मात मृत्यु 25/21 या क्रमांकाने सीआरपीसी 174 नुसार स.पो.नि. दिपक बिरारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाने दाखल केला. सदर अकस्मात मृत्यूचा तपास स.पो.नि. दिपक बिरारी यांनी सुरु केला.

aropi javed shaikh

मयत कनीज ज्या खोलीत मरण पावली त्या खोलीचा तसेच तिला ज्या ठिकाणी कब्रस्थानात दफन करण्यात आले त्या दोन्ही जागेचा पंचनामा करण्यात आला. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पो.नि. अनिल बडगुजर, नायब तहसीलदार प्रदीप राजपूत, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव सोनार तसेच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. दिपक बिरारी, गोपनीय शाखेचे तपास पथक, मयत कनीजचे मामा आदींनी दफनविधी झालेले घटनास्थळ गाठले. मयत कनीजचे पुरलेले शव खोदून बाहेर काढण्यात आले. त्या मृतदेहाचा सर्वांसमक्ष पंचनामा करण्यात आला. उत्तरीय तपासणीकामी तिचे शव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तरीय तपासणीत     अकरा वर्षाच्या मयत कनीजचे वजन कुपोषनामुळे अवघे नऊ किलो भरले. तिचा व्हिसेरा नाशिक येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रवाना करण्यात आला. तो राखीव ठेवण्यात आला आहे.

सर्व प्रकारच्या तपासणी व चौकशीअंती मयत कनीजच्या मृत्यूप्रकरणी तिचा नराधम बाप जावेद अख्तर शेख जमालउद्दीन व आई महिला परवीन बी शेख रफीक (दोघे रा. रजा नगर पिंप्राळा हुडको – जळगाव) यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारतर्फे फिर्यादी होत स.पो.नि. दिपक बिरारी यांनी सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 118/21 भा.द.वि.कलम 304, 323, 506, 201, 202, 34, बाल-न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधीनियम,2015 चे कलम 75 नुसार दाखल करण्यात आला. तपासी अंमलदार विनोद सोनवणे यांनी सदर गुन्हा दाखल करुन घेतला. मयत कनीजचा नराधम बाप जावेद अख्तर व आई नाजीया परवीन या दोघांना अटक करण्यात आली.  दोघांना न्यायालयात  हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान दोघांनी आपला गुन्हा कबुल केला.

मयत कनीज ही अपशकुनी असल्याचा समज करुन घेत फेब्रुवारी 2019 पासून 23 एप्रिल 2021 पावेतो जवळपास दोन वर्षापासून खुद्द जन्मदात्या बापाने मयत कनीजला एका खोलीत डांबून ठेवले होते. तिला खाण्यापिण्यास अतिशय कमी प्रमाणात दिले जात होते. तिला वेळोवेळी दमदाटी व मारहाण केली जात होती. तिला गरजेपेक्षा खुप कमी प्रमाणात जेवण दिल्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावली होती. ती मरणासन्न अवस्थेत जगत होती. एवढे कमी झाले म्हणून की काय तिला वेळोवेळी शारीरीक व मानसिक यातना देखील दिल्या जात होत्या. तिच्यावर वेळीच औषधोपचार केला जात नव्हता. तिला कुपोषीत करण्यात आले होते. मरणासन्न अवस्थेत ती एका खोलीत दिवस कंठत असतांना अखेर तिने आपला जिव सोडला.

या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिपक बिरारी, भुषण पाटील, पोलिस नाईक जितेंद्र तावडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, डी.बी. पथकातील विजय खैरे, सुशील चौधरी, रविंद्र पाटील, उमेश पवार, शिवाजी धुमाळ, गोपाल चौधरी, संतोष गिते, अतुल पवार, प्रविण वाघ, हर्षल पाटील, राकेश दुसाने, महिला पोलिस सुवर्णा तायडे, सुलताना सैय्यद, दिव्या छाडेकर, रत्ना मराठे, वळवी आदींनी तपासकामात सहभाग घेतला. पुढील तपास सुरु आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here