भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनचा उपक्रम-कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर

जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना विषाणूला सामोरे जात आहेत. या प्रसंगी अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यापासून रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटरची कमतरता, जीवरक्षक औषधी व इंजेक्शनची कमतरता या समस्यांमुळे अनेक कुटुंबांनी आपली जिवाभावाची माणसे गमावली आहेत. अद्यापही असंख्य नागरिकांची ससेहोलपाट सुरुच आहे.

गृह विलगीकरणातील बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटरची नितांत आवश्यकता आहे. ही गरज पूर्ण होण्यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तसेच विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबई यांच्या वतीने 25 ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. सदरची मशीनरी कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार आहे. ज्या रुग्णांना याची गरज भासणार आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजनची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्याचा तपशील, ज्या रुग्णांसाठी आवश्यकता आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक असणारा तपशील, मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील आदी बाबी सादर करणे आवश्यक राहणार आहे.

या फौंडेशनच्या वतीने निशुल्क दिली जाणारी ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची आहे. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कंसेंटेटरची आवश्यकता नसल्याचे चित्र लक्षात आल्यानंतर हे ऑक्सिजन कंसेंटेटर कांताई नेत्रालयास परत करायाचे आहे. ऑक्सिजन कंसेंटेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन कंसेंटेटरच्या उपलब्धते बाबत विजय मोहरीर (9423774346), सुधीर पाटील (9823362330), उदय महाजन (9422776708), अनिल जोशी (9432594487), नितीन चोपडा (9423489824), अमर चौधरी (9372409468), डॉ. प्रदीप ठाकरे (9422775906) कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी सन 1982 मध्ये सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी म्हणून जैन चॅरिटीज् ची स्थापना केली. ही संस्था आता कालांतराने भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन अशी नोंदणीकृत झाली. समाजाला प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्म, पर्यावरण आणि जीवनावश्यक बाबी इत्यादी करीता मदतीची आवश्यकता असते. ही संस्था विविध जाती धर्माच्या गरजू, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना निरपेक्ष भावनेने मदत करीत असते. दातृत्वाचा हा वसा मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्याकडून पुढच्या पिढीस मिळाला असून या संस्थेची व्याप्ती व कार्य वाढलेले आहे.

विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि. ही मुंबईस्थित पॉलीमर क्षेत्रातील जागतिक पातळीवरची मोठी कंपनी आहे. ही कंपनी गत 40 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असून प्लास्टिक व केमिकल्सच्या वितरण व विपणण क्षेत्रात अग्रेसर आहे. 110 देश अर्थात जगभरात कंपनीची विक्री व्यवस्था आहे. जग भरात सुमारे 50 कार्यालये या कंपनीचे आहेत. ही कंपनी सीएसआर निधीतून म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) विविध सामाजिक लोककल्याणकारी कार्य करीत असते. विनमार व जैन इरिगेशन कंपनी आता कोविड-19 च्या आव्हानात्मक परिस्थितीत मिळून मदत करण्यासाठी कटीबद्ध झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here