जळगाव :भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ७, ८, ९, १०जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार आहे. २५ वा अर्थात रौप्य महोत्सवी महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ६ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २५ व्या महोत्सवाचे आयोजनास महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य लाभले असून मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि., होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य असणार आहे. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. ७ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभा नंतर होईल. प्रथम सत्रात तरूण पिढिचे प्रतिनिधित्व करणार्या आणि पुण्यात वास्तव्य करणार्या एक अत्यंत गुणी व प्रतिभासंपन्न गायिका पंडिता मंजुषा पाटील कुलकर्णी ह्यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना लिलाधर चक्रदेव संवादिनीवर तर आशय कुलकर्णी तबल्यावर साथसंगत करतील. द्वितीय सत्रात जागतिक किर्तीच्या गुरू पंडिता शमाताई भाटे यांचे शिष्य प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी, व नयन कोहले हे तिघे ‘त्रिमिती’ हा कथक नृत्यावर आधारीत कार्यक्रम सादर करतील.
द्वितीय दिनाच्या प्रथम सत्रात झी टिव्ही च्या सारेगमप (हिंदी) या नुकत्याच सुरू असलेल्या रिऍलिटी शो मध्ये असलेले श्री सहेजदीप सिंग यांचे गझल व ठुमरी गायन होईल. त्यांना तबल्याची साथ अमनदीप सिंग तर दिलरूब्याची साथ अंशदीप सिंग करतील. द्वितीय सत्र बनारस येथील प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्र शंकर मिश्रा आपल्या कथन नृत्याने रसिकांना मोहीत करतील. त्यांना पखावजाची साथ त्यांचे गुरू व पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा करतील.तबल्याची व पढंतची संगत उदयशंकर मिश्रा करतील तर सारंगीची संगत ओम सहाई मिश्रा करतील.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र हे मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर सेवाव्रत असलेलया पंडिता भारती राजपूत यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने संपन्न होणार आहे, त्या पं. कुमार गंधर्व यांच्या परंपरेतील असून कुमारजींच्या अनवट बंदिशी व निर्गुणी भजने सादर करतील. त्यांना तबल्याची साथ निशांत शर्मा तर संवादिनीवर सुप्रिया मोडक-जोशी साथ करतील. तृतीय सत्रात पं. रामदास पळसुले व पं. कृष्णा साळुंखे यांची तबला व पखावज जुगलबंदी जळगावकर रसिकांना अनुभवण्यास मिळेल. त्यांना पं. अजय जोगळेकर संवादिनीवर संगत करतील.
चतुर्थ दिनी प्रथम सत्र हे नाट्य संगीत व अभंगवाणीचे असणार आहे. आणि कलाकार असतील स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली. त्यांना ऑर्गनची साथ मकरंद कुंडले, तबल्याची साथ रामकृष्ण करंबेळकर, बासरीवर वरद कवठापूरकर, आणि निरूपण करतील प्रख्यात सुसंवादीनी मंगला खाडिलकर.
नवीन पिढीला या कार्यक्रमात रस उत्पन्न व्हावा, त्यांनाही अभिजात संगीत कळावे यासाठी प्रतिष्ठान गेली २५ वर्षे प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून खास जेन-झी साठी अभिजीत पोहनकर आणि सहकारी सादर करतील एक अत्यंत सुश्राव्य कार्यक्रम ‘बॉलीवुड घराना’. या कार्यक्रमाने २५ व्या रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होईल.
तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या चारही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने, स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व या महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर येणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसाठी सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्र. ९८२३०७७२७७ / २२२७७२२ यांच्याशी संपर्क करावा अशी विनंती प्रतिष्ठानाने केली आहे. संपर्क : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान. १०१, पार्क रॉयल, १३, वल्लभ नगर, रामानंद चर्च जवळ, जळगाव.






