पत्नीने मद्यप्राशन केले पतीच्या गैरहजेरीत — मृत्यु झाला तिचा कमरपट्ट्याच्या मारहाणीत

On: September 19, 2023 10:28 AM

जळगाव ‌– पतीचा मद्याचा राखीव कोटा पत्नीने संपवल्याचे लक्षात आल्याने चिडलेल्या पतीने त्याच्या पत्नीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी सुरुवातीला वरणगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती.

शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम असे चाळीशीपार मयत विवाहीतेचे नाव आहे. उत्तर प्रदेशातून जितेंद्र आणि शांतीदेवी हे जोडपे वरणगाव परिसरातील हतनुर धरण परिसरात मजुरीसाठी वास्तव्याला होते. दिवसभर अवजड कामे केल्यानंतर श्रमपरिहार म्हणून जितेंद्र हा मद्याचे घोट घेत असे. मात्र त्याचा मद्याचा राखीव कोटा त्याच्या पत्नीने त्याच्या गैर हजेरीत प्राशन केला. हा प्रकार तिचा पती जितेंद्र याच्या लक्षात आला. त्यामुळे त्याने पत्नी शांतीदेवीला चापटा बुक्क्यांसह कमरपट्ट्याने मारहाण करुन अशांती निर्माण केली.

पत्र्याच्या रहात असलेल्या खोलीत झालेल्या मारहाणीत शांतीदेवी अत्यवस्थ झाली. तिला अत्यवस्थ अवस्थेत हतनुर धरण कॅंम्प येथील रहिवासी भागवत धोंडू कोळी यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अधिक तपासाअंती तिचा पती जितेंद्र हेमब्रम याने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सरकारतर्फे फिर्यादी  हे.कॉ. नाविद अली सादिक अली सैय्यद यांनी फिर्याद दाखल केली. दाखल खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment