जळगाव (क्राइम दुनिया न्युज नेटवर्क): एखाद्या मध्यमवर्गीय सभ्य गृहस्थाने स्वरक्षणासाठी सरळ मार्गाने पिस्टलचा परवाना मागितला तर त्याला तो सहजासहजी मिळत नाही, मिळणार नाही. पोलिस दप्तरी नोंद असलेल्या एखाद्या गुन्हेगाराने स्वरक्षणासाठी पिस्टलचा परवाना मागीतला तर त्याला देखील तो मिळणार नाही. अशा वेळी गुन्हेगार व्यक्ती स्वरक्षणासाठी सरळ सरळ बेकायदा पिस्टल खरेदी करुन आपले रक्षण करतो. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले महागडे परवानाधारक पिस्टल शासनाची नियमावली पाळून हाताळावे लागते. मात्र बेकायदा गावठी पिस्टल खरेदी करतांना, हाताळतांना शासनाची कोणतीही नियमावली नसते. त्या पिस्टलने कुठे आणि किती राऊंड फायर केले त्याचा कुणी हिशेब विचारत नाही.

कमी किमतीत विकत घेतलेल्या बेकायदा पिस्टलने गुन्हेगारांचे काम भागते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात बेकायदा पिस्टलचा जणूकाही सुळसुळाट झाला आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. चोपडा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या उमर्टी या गावात बेकायदा पिस्टल सहज उपलब्ध होते. अगदी दहा हजार रुपये किमतीच्या रेंज पासून बेकायदा पिस्टल खरेदी – विक्री होत असल्याचे गुन्हेगारी विश्वात म्हटले जाते. पोलिसांनी कितीही कायदेशीर कारवाया केल्या तरी जळगाव शहरात आणि जिल्ह्यात बेकायदा पिस्टल कुठून आणि कोणत्या मार्गाने येतात हे सर्वसामान्य लोकांना पडलेले एक कोडे आहे. अग्निशस्त्रविरोधी कित्येक गुन्हे जळगाव शहरासह जिल्ह्यात वेळोवेळी दाखल होत असतात. जळगाव शहरात गोळीबाराच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. सहज उपलब्ध होणारे बेकायदा पिस्टल हे त्यामागचे प्रमुख कारण म्हटले जाते. “तरुण हट्टेकट्टे, बाळगतात गावठी कट्टे” असे घोषवाक्य या निमीत्ताने म्हटले जाते.

सहज उपलब्ध होणा-या गावठी कट्ट्यामुळे जळगाव शहरात विविध गुन्हेगारी गॅंग तयार झाल्या आहेत. कालांतराने त्या गॅंगमधील प्रस्थापित सदस्यांमधे वर्चस्वाची लढाई सुरु होते. त्या वर्चस्वाच्या आणि अस्तित्वाच्या लढाईतून टोळी युद्धाचा भडका उडतो. त्यातून गावठी कट्टे बाहेर येतात आणि गोळीबाराच्या घटना घडतात. कधी मद्याच्या नशेत, कधी केवळ एखाद्याला धमकावतांना तर कधी कधी पिस्टल एखाद्याला दाखवतांना चुकून गोळीबाराची घटना देखील घडते.
जळगाव शहरातील अशा गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक टोळी अर्थात गॅंग म्हणजे लाडू गॅंग म्हटली जाते. आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे हा या लाडू गॅंगचा म्होरक्या म्हटला जातो. जळगाव शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा सुपुत्र राकेश सपकाळे याचा दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी खून झाला होता. या खून प्रकरणात लाडू गॅंगचा आजचा म्होरक्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे हा पाचव्या क्रमांकाचा संशयीत आरोपी होता. तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. प्रविण मुंडे यांच्या अख्यत्यारीत स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील स्टार कर्मचारी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर व शहर पोलिस स्टेशनचे रतन हरी गिते आदींच्या पथकाने त्यावेळी फरार झालेल्या आकाश मुरलीधर सपकाळे यास धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून शर्थीचे प्रयत्न करुन शिताफीने पकडले होते.




कालांतराने जेलमधून बाहेर आल्यानंतर आकाश सपकाळे याने जळगावच्या गुन्हेगारी विश्वात आपली ओळख आणि दहशत निर्माण केली. त्याच्या गुन्हेगारी कारवायांची दखल घेत पोलिस दलाने त्याला हद्दपार घोषित केले. हद्दपारीनंतर देखील त्याची दहशत कायम होती. हद्दपारीच्या कालावधीत तो लपुनछपून जळगाव शहरात ये जा करतच होता. स्वत:च्या रक्षणासाठी तो गावठी कट्टा बाळगत होता. पोलिस स्टेशन, तुरुंग आणि गुन्हेगारी या कार्यक्षेत्रात त्याने स्वत:ला झोकून देत सराईत गुन्हेगार असल्याची कुप्रसिद्धी मिळवली.
दरम्यानच्या कालावधीत लाडू गॅंगमधे प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करणारा गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे याच्यासोबत आकाश सपकाळे याचे वाद होण्यास सुरुवात झाली. गणेश सोनवणे हा देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार आहे. आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे, करण चंद्रशेखर पाटील, विक्की अरुण चौधरी, आकाश उर्फ टप-या युवराज बाविस्कर, गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे, तुषार उर्फ साबू रामसिंग सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे सर्व जण एकमेकांचे मित्र होते. मात्र कालांतराने त्यांच्यात दोन गट पडले आणि त्यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरु झाली. आकाश उर्फ डोया सपकाळे, करण पाटील, विक्की चौधरी आणि आकाश उर्फ टप-या बाविस्कर अशी चौघा जणांची एक गॅंग तर गणेश उर्फ काल्या सोनवणे, त्याचा मामा सागर पाटील तसेच तुषार सोनवणे या तिघांची दुसरी गॅंग तयार झाली.




गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे दोघे एकमेकांचे मामा – भाचे आहेत. सागर हा मामा तर गणेश हा त्याचा भाचा आहे. सागर पाटील याचा एमआयडीसी परिसरात लॉजींगचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या आडून कुंटणखाना सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या होत्या. त्या अनुशंगाने गेल्या वर्षी 27 ऑगस्ट 2024 रोजी एमआयडीसी पोलिसांनी सागर लॉजवर छापा कारवाई केली होती. त्याठिकाणी सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला होता. त्यात सागर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत चालक सागर सुधाकर पाटील आणि मालक सागर नारायण सोनवणे या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.
गुन्हेगारी वृत्ती असलेल्या आकाश सपकाळे आणि गणेश सोनवणे या दोघांविरुद्ध पोलिसांनी हद्दपारीचे हत्यार उपसले. दोघांना हद्दपार घोषित करण्यात आले. हद्दपारीत असतांना देखील दोघे जळगाव शहरात लपुन छपून वास्तव्य करत गुन्हेगारी कारवाया करत होते. अस्तित्व आणि वर्चस्वाच्या लढाईत आकाश सपकाळे आणि गणेश सोनवणे या दोघांमधे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाद सुरु होता. आकाशच्या दृष्टीने गणेश हा गुन्हेगारी विश्वात एक उभरता तारा होता. या उभरत्या ता-याचे गडद अस्तित्व निर्माण होऊ नये असे प्रस्थापीत आकाश उर्फ डोया सपकाळे याला वाटत होते.




आपल्या कारवायांबद्दल गणेश आणि त्याचा मामा सागर हे दोघे पोलिसांना टिप देत असल्याचा आकाश उर्फ डोया याला संशय होता. त्या संशयातून देखील आकाशचा गणेश आणि सागर या दोघांवर राग होता. गुन्हेगाराचा अंत गुन्हेगाराकडूनच होत असतो हे आजवरच्या घटनेतून दिसून आले आहे. आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे आणि गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे यांच्यात धुमसत असलेला वाद काही केल्या शांत होत नव्हता.
दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी आकाश (डोया) याचा साथीदार आकाश उर्फ टप-या याने आपल्या साथीदारांसह जेवणाचा बेत आखला होता. त्यासाठी आकाश सपकाळे, करण पाटील आणि विक्की चौधरी असे तिघे जण आकाश उर्फ टप-या याच्याकडे जात होते. त्यावेळी बेकायदा पिस्टलधारक आकाश उर्फ डोया याने मद्यपान केले होते. आकाशच्या घराकडे जातांना वाटेत आकाश उर्फ डोया यास लॉज व्यावसायीक सागर पाटील भेटला. आकाशचा सागर पाटील आणि त्याचा भाचा गणेश या दोघांवर राग होता. त्यामुळे मद्याच्या नशेत त्याचा सागरसोबत शाब्दिक वाद सुरु झाला. आकाश सपकाळे हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सागर पाटील सोबत शिवीगाळ करु लागला. आकाश हा सागरला शिवीगाळ करत असल्याचे समजताच सागरची पत्नी तातडीने घराबाहेर आली. माझा पती सागर यास तु शिवीगाळ का करतो असे तिने आकाश सपकाळे याला विचारणा केली. अगोदरच मद्याच्या नशेत आणि संतापात असलेल्या आकाश सपकाळे याने सागरच्या पत्नीच्या गालात चापट मारली. त्यामुळे आकाश आणि सागर यांच्यातील वाद अजूनच भडकला.




काही वेळाने सागरचा भाचा गणेश उर्फ काल्या सोनवणे हा देखील त्याठिकाणी आला. त्याने देखील माझ्या मामासोबत का वाद घालतो अशी आकाशला विचारणा केली. बराच वेळ हा वाद सुरु होता. त्यानंतर आकाश आणि त्याचे साथीदार तेथून निघून गेले. सागरचा भाचा गणेश सोनवणे हा देखील तेथून काहीवेळाने निघून गेला. गणेश हा संतापाच्या भरात आकाशचा साथीदार विक्की चौधरी याच्या घराकडे गेला असल्याची माहिती सागरसह त्याची पत्नी, नातेवाईक आणि मित्रांना समजली. त्यामुळे सर्वजण गणेशला समजावण्यासाठी धावले. गणेशच्या जीवाचे काही बरेवाईट होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. सर्वजण रेल्वे लाईनजवळ गणेशला समजावत होते. त्याचवेळी मद्याच्या नशेत पिस्टलसह आकाश उर्फ डोया मुरलीधर सोनवणे हा त्याचे साथीदार करण पाटील, आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर व विक्की अरुण चौधरी यांच्यासह धावत आला.

संतापातील गणेशवर आपले वर्चस्व आणि पिस्टलचा धाक दाखवण्यासाठी मद्याच्या नशेतील आकाश उर्फ डोया याने गणेशच्या दिशेने पिस्टलची गोळी झाडली. गणेश सोनवणे याच्या डाव्या हाताला आणि पोटाला गोळी लागली. गोळी लागल्याने गणेश सोनवणे जखमी झाला. आकाश…. तु माझ्यावर डायरेक्ट गोळी चालवतोय असे जखमी अवस्थेतील गणेशने आकाशला म्हटले. जखमी गणेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मद्यधुंद आकाश (डोया) याने गणेशला शिवीगाळ सुरु केली. जखमी गणेशचा बचाव करण्यासाठी त्याचा मित्र तुषार उर्फ साबू सोनवणे याने संतापलेल्या आकाशला पकडून रेल्वे लाईनच्या दिशेने नेले. त्यावेळी आकाशचा साथीदार विक्की चौधरी याने आकाशला चिथावणी देत जखमी गणेशला शिवीगाळ सुरु केली. जखमी गणेशच्या बहिणीने आकाशला समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दोघे मित्र असतांना असे भांडण का करत आहेत अशी तिने आकाशला विचारणा केली. त्याचवेळी जखमी गणेशचा मामा सागर सुधाकर पाटील व त्याचे वडील रविंद्र रघुनाथ सोनवणे असे दोघेजण देखील घटनास्थळी आले. त्यांनी देखील आकाशला समजावण्यासह गणेशचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.




जखमी गणेशचा मित्र तुषार सोनवणे हा संतप्त आकाशला पकडून रेल्वे लाईनकडे नेत गणेशचा बचाव करत होता. त्यावेळी आकाशने त्याच्या हातातील पिस्टलने तुषार उर्फ साबू रामसिंग सोनवणे याच्या दिशेने दुसरी फिल्मी स्टाईल गोळी झाडली. ती गोळी तुषारने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती गोळी त्याच्या डाव्या कानाला स्पर्श करत त्याच्या मागे उभा असलेल्या आकाश उर्फ टप-या युवराज बाविस्कर याला लागली. त्यात आकाश उर्फ टप-या युवराज बाविस्कर हा जबर जखमी झाला. अगोदर गणेश आणि नंतर तुषार या दोघांवर गोळीबार करण्याच्या नादात आकाश उर्फ डोया याच्याकडून त्याचाच साथीदार आकाश उर्फ टप-या याच्यावर गोळी झाडली गेली. त्यात आकाश (टप-या) जबर जखमी झाला. त्यानंतर देखील आकाश उर्फ डोया हा पिस्टल घेऊन गणेशला मारण्यासाठी धावला. मात्र यावेळी गणेशचा मामा सागर याने आकाशला पकडले. या सर्व घडामोडी दरम्यान जखमी गणेशला त्याच्या घराजवळ राहणा-या जितु कोळी याने मोटार सायकलवर बसवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.
त्याचवेळी आकाशचा साथीदार करण पाटील याने त्याला पुन्हा चिथावणी देत म्हटले की मार आक्या… जे होईल ते पाहिले जाईल. चला आपला सामान आणा. पिस्टल, काडतुस या हत्यारांना ते सर्वजण “सामान” संबोधत होते. कांचन नगर परिसरातील महादेव मंदीराजवळ बारा खोल्या परिसरात त्यांचा अड्डा होता असे म्हटले जाते. त्या अड्ड्यात ते त्यांचा सामान अर्थात शस्त्रसाठा ठेवत होते. करण पाटील याने आकाश डोया याला चिथावणी दिली. त्यामुळे आकाश डोया याने त्याच्या हातातील बंदूकीच्या बटने सागर पाटील याच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर आकाशसह त्याचे साथीदार करण पाटील, विक्की चौधरी असे सर्वजण घटनास्थळावरुन पळून गेले. त्यानंतर घटनास्थळावरील तुषार सोनवणे व आकाश टप-या या दोघा जखमींना देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान आकाश उर्फ टप-या बाविस्कर याचा मृत्यु झाला.




घटनेनंतर आकाश उर्फ डोया सपकाळे याच्यासह त्याचे साथीदार करण पाटील व विक्की चौधरी असे सर्वजण पसार झाले. या घटनेची माहिती समजताच पोलिस उप अधिक्षक नितीन गणापुरे, शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदींनी आपापल्या पथकासह पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. शनीपेठ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक साजीद मंसुरी, पोलिस उप निरीक्षक योगेश ढिकले, सहायक फौजदार गणेश नायकर, हे.कॉ. प्रदीप नन्नवरे, भागवत शिंदे, शशिकांत पाटील, पो.कॉ. अमोल वंजारी, निलेश घुगे, गजानन वाघ, योगेश जाधव, रविंद्र तायडे, महिला कर्मचारी काजल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, हे.कॉ. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, पोलिस नाईक किशोर पाटीळ, नाना तायडे, पो.कॉ. राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाला सुरुवात केली.

या घटनेप्रकरणी मयत आकाश उर्फ टप-या याचे वडिल युवराज चैत्राम बाविस्कर यांनी शनीपेठ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 245/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 103 (2), 109, 189 (2), 191 (2), 191 (3), 190 सह आर्म अॅक्ट सह 1959 चे कलम 3/25 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. ऐकीव माहितीसह घटनास्थळावर हजर असलेल्या सर्व सहा जणांविरुद्ध त्यांनी शनीपेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे, गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे, विक्की अरुण चौधरी, सागर सुधाकर पाटील, तुषार उर्फ साबु रामसिंग सोनवणे, करण पाटील अशा सहा जणांच्या नावांचा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला. मात्र पोलिस तपासात केवळ आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे, करण चंद्रशेखर पाटील व विक्की अरुण चौधरी या तिघांची नावे निष्पन्न झाली. त्यामुळे उर्वरीतांची नावे वगळण्यात आली.
फिर्याद दाखल झाल्यानंतर अधिक तपासात घटनास्थळावरील विविध अॅंगलचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून माहिती संकलीत करण्यात आली. त्यांचे जवाब घेण्यात आले. सीसीटीव्हीत चौघे जण धावत येत असल्याचे पोलिसांना स्पष्टपणे दिसून आले. गोळीबार होत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने पुढील तपासाला वेग आला. चौकशीअंती तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्यावर तपासकामाचा प्रकाशझोत टाकण्यात आला. एकाच पिस्टलमधून गोळीबार झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेत एक गोळी पिस्टलमधेच अडकली असल्याचे देखील उघड झाले. घटनास्थळावरुन एक काडतुस जप्त करण्यात आले. तपासादरम्यान दोन हत्यार, दोन राऊंड आणि एक अडकलेली गोळी पोलिसांनी हस्तगत केली. तपासादरम्यान क्रमाक्रमाने तिघा संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी सुनावली. अटकेतील आकाश उर्फ डोया याच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशनला एकुण बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्याचा पुढील तपास शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत.







