तिच्यासोबत दिनेशला बघून निलेश खुप खवळला – पार्टीला बोलावून दोघांनी त्याचा गळाच आवळला

On: December 28, 2025 11:12 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): दिनेश चौधरी हा अवघा एकवीस वर्षाचा तरुण जळगाव तालुक्यातील शिरसोली या गावी रहात होता. शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात विद्येचे धडे घेऊन तो सज्ञान झाला होता. वयाची विशी ओलांडताच दिनेशला जामनेर तालुक्यातील एका वित्त संस्थेत फिल्ड क्रेडीट असिस्टंट या पदावर नोकरी मिळाली. ग्राहकांना कर्ज देणा-या वित्त संस्थेत दिनेशची नोकरी व्यवस्थित सुरु होती.

दिनेश नोकरी करत असलेल्या वित्त संस्थेत काही दिवसांनी एक तरुणी देखील कामाला लागली. दिनेश आणी ती तरुणी दोघेही एकाच पदावर एकाच संस्थेत सोबतच काम करत होते. एक तरुण व एक तरुणी असे जोडीने ग्राहकांना माहिती देण्यासाठी फिल्डवर जाण्याचा सध्या विविध कंपन्यांमधे ट्रेंड आला आहे. टवटवीत चेह-याची, सुमधुर आवाजातील तरुणी कंपनीचे प्रमोशन करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी समोर आली अथवा फोनवर बोलली म्हणजे बहुसंख्य ग्राहक जोडले जातात.  ग्राहकांची ही मानसिकता हेरुन तरुणींना नोकरीत प्राधान्य दिले जाते. सध्या अशा कपल अर्थात जोडीदार नोकरदारांचा जमाना आला आहे.   

दिनेश आणि ती तरुणी दोघेही एकदम तरुण होते. दिनेश तिला सिनीअर होता. त्यामुळे फिल्डची माहिती देण्यासाठी दिनेश तिला मोटार सायकलवर डबलसिट नेत असे. दोघे एकदम तरुण आणि एकाच वयाचे असल्यामुळे साहजीकच दोघांचे विचार जुळण्यास वेळ लागला नाही. एकाच मोटार सायकलवर दोघे फिल्डवर जात येत असल्यामुळे साहजीकच दोघांचा एकमेकांना स्पर्श होत असे. हसत खेळत दोघे सोबतीने नोकरी करत होते.

mayat nilesh kasar

ती तरुणी जामनेर येथील रहिवासी होती. तिच्या घराजवळ निलेश राजेंद्र कासार नावाचा तरुण रहात होता. एकाच परिसरात दोघे राहणारे असल्यामुळे निलेश कासार त्या तरुणीला चांगल्याप्रकारे ओळखत होता. तिच्याबद्दल निलेशच्या मनात कुठेतरी प्रेमाचा अंकुर फुलला होता. ती दिसली म्हणजे टीव्हीवरील जेठालालप्रमाणे निलेशची कळी खुलत असे आणि त्याचा चेहरा प्रफुल्लीत होत असे. ती दिसली म्हणजे निलेशच्या रोमारोमात उर्जा आणि चैतन्य निर्माण होऊन त्याचा दिवस प्रसन्न जात असे.

त्या तरुणीला आपल्याच तालुक्यातील खासगी संस्थेत नोकरी मिळाल्याचे निलेश कासार याला समजले. ती कुठे नोकरीला जाते, काय काम करते, केव्हा परत येते याची निलेशने माहिती घेण्यास सुरुवात केली. तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेमभावना होती. आपल्या मनाच्या एका कप्प्यात त्याने तिच्यासाठी स्पेस करुन दिली होती. ती तरुणी दिनेश चौधरी या सहका-यासोबत त्याच्या मोटार सायकलवर डबलसिट फिरत असल्याचे निलेशने एके दिवशी पाहिले. दुस-या तरुणासोबत ती हसत खिदळत फिरत असल्याचे बघून निलेशच्या मनाचा तिळपापड झाला. त्याच्या मनाची तार गिटारच्या तारेप्रमाणे तुटली. “डर” चित्रपटातील शाहरुख खान प्रमाणे निलेशच्या मनाची घालमेल करणारी अवस्था झाली. तो तिला आपली समजत होता. समोरचा दिनेश त्याला जणू काही “डर” चित्रपटातील सनी देओल प्रमाणे भासू लागला. ती माझी आहे… ती फक्त माझीच आहे असे निलेश मनाशी म्हणू लागला.

दिनेशसोबत ती मोटार सायकलवर डबलसीट बसल्याचे दृश्य बघून निलेशची झोप उडाली. ते दृश्य निलेशला अस्वस्थ करत होते. दिनेश ऐवजी तिने आपल्या सोबत मोटार सायकलवर बसावे असे निलेशला वारंवार वाटत होते. ती निलेशसोबत मोटार सायकलवर डबलसिट बसल्याचे दृश्य वारंवार त्याच्या नजरेसमोर येत होते. तिला दिनेशसोबत डबलसिट बघून निलेशच्या मनाची घालमेल सुरु होती. आपल्याच परिसरात राहणा-या त्या तरुणीचा दिनेशला वारंवार स्पर्श होत असल्याचा निलेशला भास होऊ लागला. त्यामुळे तो स्वत:वरच मनातल्या मनात चिडू लागला. तो अस्वस्थ झाला. या दिनेशचे काय करावे असा विचार त्याच्या मनात घोळू लागला.  

एके दिवशी तो दिनेशच्या पाळतीवर गेला. त्याने दिनेशवर पाळत ठेवली. फिल्डवरुन ऑफीसमधे परत जाणा-या दिनेशला निलेश कासार याने रस्त्यातच अडवले. “तु माझी वाट का अडवली” असा दिनेशने निलेशला सवाल केला. तु तिच्यासोबत मोटार सायकलवर का फिरतो असा प्रतिप्रश्न निलेशने दिनेशला केला. काही कळण्याच्या आतच निलेशने दिनेशच्या कानशिलात लगावली. तु मला का मारले? असा दुसरा प्रश्न दिनेशने केला. या वेळी देखील काही कळण्याच्या आत निलेशने दिनेशला पुन्हा दोन वेळा कानशिलात लगावल्या. यापुढे तु तिच्यासोबत डबलसिट फिरायचे नाही असा सज्जड दम निलेशने दिनेशला दिला. मार खावून सज्जड दम मिळाल्यानंतर दिनेश मुकाटपणे ऑफीसमधे गेला. त्यानंतर निलेश देखील आपल्या मार्गाला गेला.

त्या दिवसापासून दिनेशने त्या तरुणीसोबत फिल्डवर जाणे बंद केले. तो एकटाच फिल्डवर जावू लागला. मात्र निलेशकडून मिळालेली थप्पड आणि त्याने त्याने दिलेला सज्जड दम दिनेश विसरला नाही. हा सर्व घटनाक्रम त्याने त्याचा मित्र भुषण पाटील याला कथन केला. दरम्यानच्या कालावधीत दिनेशला दुस-या एका संस्थेत रिकव्हरी ऑफीसर या पदावर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्यामुळे त्याने नव्या संस्थेत काम सुरु केले. मात्र तरी देखील त्याचे त्या तरुणीसोबत काही ना काही निमीत्ताने फोनवर बोलणे सुरुच होते. त्यानंतर चारच महिन्यात दिनेशला अजून दुस-या संस्थेत चांगल्या पगाराची आणि नव्या पदाची ऑफर आली. त्यामुळे त्याने ती नोकरी सोडून नव्या संस्थेत काम सुरु केले. मात्र योगायोगाने अथवा दुर्दैवाने या संस्थेत निलेश कासार हा देखील कामाला होता. तरुणीसोबत मोटार सायकलवर फिरत असल्याच्या कारणावरुन झालेला वाद आणी त्या वादातून मार देणारा आणि मार खाणारा दोघे एकाच ठिकाणी नोकरीवर होते. त्यामुळे भुतकाळात मार खाणारा दिनेश आता भविष्यात निलेशला मार देण्याचा विचार करु लागला. दिनेशने हा प्रकार आणि मनातील विचार पुन्हा एकदा त्याचा मित्र भुषण पाटील याच्या कानावर टाकला.

निलेशकडून कानशिलात झालेली मारहाण आणि जिव्हारी लागलेला अपमान कसा भरुन निघेल याचा विचार दिनेशला स्वस्थ बसू देत नव्हता. मित्र भुषण याच्या मदतीने निलेशचा गेम करण्याचा विचार दिनेश करत होता. निलेशचा काटा काढण्यासाठी दिनेशने शांत चित्ताने विचार करण्यास सुरुवात केली. काटा काढण्यासाठी दिनेशने निलेश कासार याच्यावर मैत्रीचे जाळे फेकण्यास सुरुवात केली. दिनेशने त्याच्या मनातील योजनेचा निलेशला थांगपत्ता लागू दिला नाही. त्याच्यासोबत त्याने मैत्री वाढवली.

या बनावट मैत्री दरम्यान निलेशच्या बॅंक खात्यात विस ते पंचविस लाख  रुपये असल्याचे दिनेशच्या लक्षात आले. निलेशचे जवळचे नातेवाईक पुणे येथे राहतात. त्या नातेवाईकांनी निलेशच्या काकांची शेती खरेदी केली होती. जवळपास पन्नास लाख रुपयांचा तो व्यवहार असल्याचे समजते. निलेशच्या काकांना शेतीच्या व्यवहाराची काही रक्कम निलेशच्या माध्यमातून दिली जात होती. त्या व्यवहारातील सुमारे विस लाख रुपये त्यांनी निलेशच्या खात्यावर टाकून ठेवले होते. निलेश ज्यावेळी फोन पे च्या माध्यमातून किरकोळ व्यवहार करत होता त्यावेळी दिनेश ते बघत असे. त्यावेळी निलेशच्या खात्यातील बॅलन्स रक्कम दिनेशच्या नजरेस पडत होती. निलेशच्या खात्यात लाखो रुपये शिल्लक असल्याची बाब  दिनेशच्या लक्षात आली. निलेशच्या खात्यातील भलीमोठी रक्कम आपल्या खात्यात वर्ग करुन घेण्याची देखील युक्ती दिनेशने मनाशी आखली. त्या दृष्टीकोनातून दिनेशने निलेशसोबत काही ना काही निमित्ताने फोनवर बोलण्याचा आणि प्रत्यक्ष भेटण्याचा सपाटा सुरु केला आणि मैत्रीचा बनाव केला.

Vijaysing Patil ASI

दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडे सात वाजता दिनेश चौधरी आणि भुषण पाटील हे दोघे मित्र एकत्र आले. दोघांनी निलेशचा गेम करण्यासह त्याच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम मोबाईलद्वारे आपल्या खात्यात वर्ग करण्याची योजना आखली. भुषणच्या शेतात मद्यपान आणि मांसाहारी जेवणाचे आयोजन करण्यात आले. या पार्टीत निलेशला मद्यपानासाठी बोलावण्याचे निश्चित झाले. त्यानुसार 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी दिनेशने निलेशला त्याच्या व्हाट्स अ‍ॅप क्रमांकावर कॉल केला. भुषण पाटील याच्या शिरसोली येथील शेतात सायंकाळी सात वाजता मांसाहारी जेवण आणि मद्यपानाचा बेत आखल्याचा निरोप निलेशला देण्यात आला.

निरोप मिळताच निलेश कासार त्याच्या मोटार सायकलने जामनेरहून  शिरसोली येथे दिनेशकडे आला. आपण मद्यपानाच्या पार्टीला नव्हे तर यमलोकांच्या पार्टीला जात आहोत याची निलेशला कल्पना नव्हती. निलेश येताच दिनेशने त्याचा मित्र भुषणचा ठावठिकाणा घेतला. भुषण त्याच्या शेतातच असल्याचे समजल्यानंतर दिनेशने निलेशला त्याठिकाणी नेले. दिनेश आणि भुषण या दोघांनी ठरवून निलेशला मोठ्या प्रमाणात दारु पाजली. अती मद्यप्राशनामुळे निलेश नशेत गुंग झाला. तो नशेत असल्याचे बघून दोघांनी मिळून त्याच्या बॅंक खात्यातील मोठी रक्कम त्याच्या मोबाईलद्वारे आपल्या खात्यात वर्ग करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र त्याचवेळी त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.

आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याचे दिनेशचे नियोजन असतांनाच निलेश उठून परत जावू लागला. निलेश परत जात असल्याचे बघून वेळ न दडवता दिनेश आणि भुषण या दोघांनी त्याला पकडून ठेवले. दोघांनी मिळून त्याला दोरीने गळफास दिला. या गळफासामुळे निलेशचा गुदमरुन जीव गेला. त्याने मद्याच्या नशेत अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे मद्याच्या पार्टीसाठी आलेल्या निलेश कासार या तरुणाचा जीव गेला. आता निलेशच्या मृतदेहाचे करायचे काय? हा प्रश्न दिनेश आणी भुषण या दोघा मित्रांना पडला. निलेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी कंबर कसली. निलेशचा मृतदेह एका पोत्यात टाकून त्यांनी तो नजीकच्या नेव्हरे धरणातील पाण्यात टाकून दिला. ज्या दोरीने त्यांनी निलेशला गळफास दिला ती दोरी त्यांनी परिसरात फेकून दिली. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात दोघांनी तेथून पलायन केले.

दिनांक 16 डिसेंबर 2025 चा दुसरा दिवस उजाडला तरी देखील निलेश कासार घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्य हैरान झाले. ते त्याचा शोध घेऊ लागले. आदल्या रात्री त्याचे वडील राजेंद्र कासार यांनी त्याला त्याच्या मोबाईलवर फोन केला होता. त्यावेळी आपण शिरसोली येथे दिनेश चौधरी याच्याकडे पार्टीला जात असल्याचे त्याने वडीलांना सांगितले होते. रात्री बराच वेळ त्यांनी वाट पाहिली मात्र निलेश घरी परत आला नाही. त्याचे वडील राजेंद्र कासार यांनी त्याच्यासोबत मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र निलेशचा मोबाईल देखील लागत नव्हता.

त्यामुळे दुस-या दिवशी गावक-यांच्या मदतीने त्याच्या वडीलांनी बेपत्ता निलेशचा शोध सुरु केला. दरम्यान दुस-या दिवशी 16 डिसेंबर रोजी बेपत्ता निलेशची मोटार सायकल रामदेव वाडी गाव शिवारातील पाण्याच्या तळ्याजवळ रस्त्याच्या कडेला आढळून आली. मुलगा निलेशचे अपहरण अथवा त्याचा घातपात झाला असावा अशी त्यांना शंका येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे निलेशचे वडील राजेंद्र कासार यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला तो बेपत्ता झाल्याबाबत मिसींग दाखल केली. बेपत्ता होण्यापुर्वी निलेश हा त्याचा मित्र दिनेश चौधरी याच्याकडे गेला होता आणि यापुर्वी त्या दोघांमधे वाद झाले होते अशी माहिती मिसींग दाखल करतेवेळी त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.

बेपत्ता निलेशचा एमआयडीसी पोलिसांमार्फत तपास सुरु होता. बेपत्ता निलेशचे बेपत्ता होण्याच्या दिवशी कुणाकुणासोबत मोबाईलवर बोलणे झाले. त्याला शेवटचे कुणी पाहिले याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असतांना 19 डिसेंबर रोजी शिरसोली परिसरातील नेव्हरे धरण परिसरात एका तरुणाचा पोत्यात बांधलेला मृतदेह गावक-यांना आढळून आला. या घटनेची माहिती लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळ गाठले. हा मृतदेह कदाचीत बेपत्ता निलेश कासार याचा असू शकतो अशी शंका पोलिस पथकाला आली. त्यांनी मिसींग दाखल करणारे राजेंद्र कासार यांना याबाबत माहिती देत मृतदेहाची ओळख पटवण्यास बोलावले.

जामनेर येथील रहिवासी राजेंद्र कासार यांनी त्यांचा भाऊ अनिल कासार याच्यासह लागलीच शिरसोली परिसरातील नेव्हरे धरण परिसर गाठले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ व त्यांचे सहकारी हजर होते. त्यांच्यासोबत संशयीताच्या रुपात दिनेश चौधरी व त्याचा मित्र भुषण पाटील हे दोघेही हजर होते. धरणाच्या पाण्यात मृतदेहाचे तरंगणारे पोते बाहेर काढण्यात आले. त्या पोत्यातून बाहेर काढण्यात आलेला मृतदेह राजेंद्र कासार यांना दाखवला असता तो त्यांनी लागलीच ओळखला. तो मृतदेह त्यांचा मुलगा निलेश कासार याचाच होता. अशा प्रकारे मृतदेहाची ओळख पटली आणी मिसींगचा तपास पुर्ण झाला. मिसिंगचा तपास पुर्ण झाला असला तरी घातपाताचा संशयास्पद प्रकार पुढे आला. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा आदी कायदेशीर सोपास्कार पुर्ण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला.

सर्व घटनाक्रमाला अनुसरुन मयत निलेश कासार याचे वडील राजेंद्र कासार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.न. 911/2025 भारतीय न्याय संहिता 103, 238, 3 (5) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ व  त्यांच्या सहका-यांनी सुरु केला.

मयत निलेश कासार हा त्याचा मित्र दिनेश चौधरी याच्याकडे पार्टीसाठी गेला होता. तसेच दोघात यापुर्वी कडाक्याचा वाद झाला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. घटनेच्या रात्री निलेश आणि दिनेश या दोघांमधे मोबाईल संभाषण देखील झाले होते. मयत निलेश कासार, दिनेश चौधरी आणि भुषण पाटील या तिघांचे मोबाईल लोकेशन देखील एकाच ठिकाणी आढळून आले होते. या सर्व तपासाच्या आधारे दिनेश चौधरी आणी भुषण पाटील या दोघांना संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र सखोल चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबुल करत गुन्ह्याचा सर्व घटनाक्रम कथन केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, किरण पाटील व किरण चौधरी, पो.कॉ. सुभाष साबळे आदी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment