पोलिस होण्याचे स्वप्न स्वप्नीलने बाळगले उराशी — तृतीयपंथी हट्टी आकांक्षा मारली गेली जिवानिशी

On: February 8, 2026 9:05 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): एस.टी. महामंडळात चालक म्हणून काम करणा-या अशोक पाटील यांचा स्वप्नील पाटील हा सुपुत्र होता. पोलिस दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्नीलचे स्वप्न होते. एस.टी. महामंडळात चालक म्हणून काम करणा-या वडीलांच्या अंगावर खाकी युनिफॉर्म असला तरी त्या युनिफॉर्म पेक्षा पोलिसाच्या अंगावरील खाकीला किती मान सन्मान आहे याचे महत्व त्याला समजले होते. पोस्टमन, चालक, पहारेकरी अशा कित्येक पदावरील नोकरदारांच्या अंगावर खाकी युनिफॉर्म असला तरी पोलिस दलातील खाकी वर्दीला एक वेगळाच रुबाब असतो हे बारावी पास असलेल्या स्वप्नीलने अनुभवले होते. त्यामुळे पोलिस दलात भर्ती होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने नाशिक गाठले. नाशिकच्या एका खासगी अकॅडमीत प्रवेश मिळवत त्याने पोलिस दलातील नोकरीची तयारी सुरु केली होती.

जामनेर तालुक्यातील पहुर येथील मुळ रहिवासी असलेला स्वप्नील पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी नाशीकच्या रविवार कारंजा भागात भाड्याच्या खोलीत रहात होता. तेथून जवळच असलेल्या खासगी अकॅडमीत तो पोलिस भरतीचे धडे घेण्यासाठी ये जा करत होता. गेल्या दोन वर्षापुर्वी नाशिक मुक्कामी असतांना तो एके दिवशी एका नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी त्याची ओळख एका हिंदी भाषिक तृतीयपंथी सोबत झाली. आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेंद्रे असे त्या तृतीयपंथीचे नाव होते. मुळ छत्तीसगढ राज्यातील रहिवासी असलेला अजय उर्फ आकांक्षा हा तृतीयपंथी दिवसभर छक्केगिरी करुन पैसे जमा करत होता. त्याचा सर्वाधिक काळ नाशिकमधे व्यतीत झाला होता.

नाश्त्याच्या हातगाडीवर आकांक्षा सोबत स्वप्नीलची ओळख झाली. त्याचे हावभाव आणि हालचाली बघून पहिल्या भेटीतच हा तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलने ओळखले होते. आकांक्षाने देखील तो तृतीयपंथी असल्याचे स्वप्नील यास कथन केले होते. झालेल्या ओळख परिचयातून दोघांची मैत्री कलेकलेने वाढत गेली.

या मैत्रीतून एके दिवशी आकांक्षाने स्वप्नील यास त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट बाबत चौकशी केली. स्वप्नीलचे इंस्टाग्रामवर अकाऊंट असल्याचे समजल्यानंतर आकांक्षाने त्याला त्याच रात्री एक मेसेज पाठवला. मला भेटायला येशील का, तुला मी आवडतो का? असे त्या मेसेजचे स्वरुप होते. त्यानंतर काही दिवसांनी अजय उर्फ आकांक्षा व स्वप्नील या दोघांची नाश्त्याच्या गाडीजवळ पुन्हा भेट झाली. यावेळी त्याने स्वप्नील यास सरळ सरळ ऑफ़रच दिली की तु माझ्यासोबत लफडे कर, मी कुणालाच काही सांगणार नाही. आकांक्षाच्या या ऑफरला स्वप्नील भुलला आणि फसला. त्याने आकांक्षाच्या या ऑफरला सरळसरळ होकार देऊन टाकला.

तेव्हापासून आकांक्षा आणी स्वप्नील यांचे रिलेशन सुरु झाले. दोघांचे इंस्टाग्राम या अकाऊंटवर नियमीत चॅटींग़ देखील सुरु झाले. भोळ्या मनाने स्वप्नीलने त्याची खासगी माहिती आकांक्षाला देऊन टाकली. आकांक्षाच्या प्रेमात बळी पडलेल्या स्वप्नीलने त्याच्यासोबत रस्त्यावर मोबाईलमधे एकत्र फोटो देखील काढले. स्वप्नीलची खासगी माहिती आणी त्याच्यासोबत काढलेले फोटो एवढी बाजू आकांक्षासाठी स्वप्नील यास ब्लॅकमेल करण्यासाठी पुरेशी होती. ज्या उद्देशाने आणि धैय्याने स्वप्नील नाशिकला आला होता त्या धैय्यापासून तो भरकटला. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी घेऊन नाशिकला आलेला स्वप्नील तृतीयपंथी आकांक्षाच्या जाळ्यात फसत गेला.

डॉ. महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक

आता स्वप्नील आपल्या जाळ्यात पुर्णपणे फसल्याची जाणीव आकांक्षा उर्फ अजय गेंद्रे याला झाली. त्या बळावर त्याने स्वप्नील यास त्याच्या वाढदिवशी मेसेज केला. त्यात त्याने त्याला सातपुर येथे भेटण्यास बोलावले. स्वप्नीलने त्याला नकार देत सातपुर येथे येण्यास नकार दिला. मात्र एका शब्दाने ऐकून घेईल तो तृतीयपंथी अजय कसला? त्याने स्वप्नील यास दम दिला की तु जर मला भेटण्यास आला नाही तर तु शिकत असलेल्या अकॅडमीत येऊन मी तुझा तमाशा करेन. मात्र तरीदेखील स्वप्नील त्याला भेटण्यासाठी सातपूर येथे गेलाच नाही. स्वप्नील आपल्याला भेटण्यास आला नाही याचा राग मनात ठेवत तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा याने खरोखरच अकॅडमीत येऊन तमाशा करत गोंधळ घातला.

त्यामुळे समयसुचकता बाळगत उगीच वाद नको असे मनाशी म्हणत स्वप्नील त्याच्यासोबत जाण्यास तयार झाला. त्यानंतर आकांक्षाने स्वप्नील यास घोटी येथे त्याच्या मैत्रीणीच्या घरी नेले. मैत्रीणीच्या घरी आपल्यासोबतच रहावे असा अजय उर्फ आकांक्षाने स्वप्नीलकडे हेका लावत बळजबरी केली. आपण दोघे राजस्थानला फिरायला जावू सर्व खर्च करण्यास मी तयार आहे अशी नवीन ऑफर यावेळी आकांक्षाने स्वप्नील यास दिली. तु जर माझ्यासोबत राजस्थानला आला नाही तर मी थेट पहुर येथे तुझ्या घरी येऊन गोंधळ घालेन असा नव्याने दम यावेळी आकांक्षाने स्वप्नील यास दिला. काल अकॅडमीत येऊन गोंधळ घालणारा अजय उर्फ आकांक्षा आता थेट आपल्या घरी पहुर येथे येऊन गोंधळ घालण्याची भाषा करत असल्याचे बघून स्वप्नील मनातून घाबरला.

आकांक्षाच्या अशा  वागण्यामुळे स्वप्नील त्याच्या पोलिस होण्याच्या स्वप्नापासून दुरावत गेला. त्याचे अकॅडमीत लक्ष लागत नव्हते. तो नाईलाजाने अजय उर्फ आकांक्षा सोबत राजस्थानला रेल्वेने फिरायला गेला. आकांक्षाने स्वखर्चाने त्याला राजस्थानातील विविध ठिकाणी फिरवले. तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा दिवसभर छक्केगिरी करुन पैसे जमा करत असे. या कालावधीत स्वप्नील दिवसभर रिकामाच रहात होता. पोलिस भरतीसाठी नाशिकला आलेला स्वप्नील तृतीयपंथी आकांक्षाच्या नादी लागून भरकटला होता. नाशिकला सोबत काढलेल्या फोटोचा धाक दाखवून आकांक्षा उर्फ अजय त्याला आपल्या सोबत फिरण्यास आणि राहण्यास भाग पाडत होता.

मुळचा छत्तीसगढ राज्यातील हिंदी भाषिक अजयने वैद्यकशास्त्राच्या मदतीने दिल्ली येथे काही वर्षापुर्वी त्याच्या लिंगामधे ऑपरेशन करुन बदल केला होता. त्याने त्याचे स्त्री लिंगात रुपांतर केले होते. त्याने ब्रेस्ट प्लॅंट करुन छातीत सिलीकॉन टाकून स्तन देखील मोठे करुन घेतले होते. त्यामुळे तो आता पुर्णपणे एखाद्या महिलेप्रमाणे दिसत होता. तृतीयपंथी अजय हा स्वप्नील यास त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. मात्र इच्छा नसतांना देखील स्वप्नील तसा प्रयत्न करायचा, त्यात त्याला हवे तसे यश येत नव्हते.

आपले आई वडील वारले असून आपल्याला जवळचे कुणी नातेवाईक नाही असे अजयने स्वप्नील यास सांगितले होते. स्वप्नीलने फक्त आपल्यासोबतच रहावे असे अजय यास वाटत होते. त्याने घरी कुणासोबत संपर्क करु नये असा अजय उर्फ आकांक्षाचा प्रयत्न रहात असे. त्यामुळेच त्याने स्वप्नीलचा मोबाईल देखील फोडून टाकला होता. मात्र एके दिवशी सन 2024 च्या दिवाळीपुर्वी गोड बोलून स्वप्नीलने त्याच्यापासून सुटका करुन घेत आपले पहुर येथील घर गाठले.

स्वप्नील सुटका करुन पहुर येथे आला खरा. मात्र पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर 2024 मधे तृतीयपंथी अजय पहुर येथे दाखल झाला. त्याला स्वप्नीलची चांगल्याप्रकारे माहिती होती. तो कुठे राहतो? त्याच्या घरी कोण-कोण आहेत? त्याचे वडील काय काम करतात? याची सर्व माहिती तृतीयपंथी अजयने करुन घेतली होती. त्या माहितीच्या आधारे अजय उर्फ आकांक्षाने जामनेर तालुक्यातील स्वप्नीलचे पहुर येथील घर गाठले. नाशिकच्या अकॅडमीत केलेल्या तमाशाप्रमाणे त्याने पहुर येथील स्वप्नीलच्या घरी व अंगणात नग्न होत तमाशा सुरु केला. मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत अशी त्याने मागणी सुरु केली. तडजोडीअंती स्वप्नीलच्या वडिलांनी अजय उर्फ आकांक्षाला पावणे दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवत स्वप्नीलची त्याच्यापासून सुटका करण्याची विनवणी केली.

सहा महिन्याच्या कालावधीनंतर स्वप्नीलच्या वडीलांनी तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षाला पावणे दोन लाख रुपये दिले आणि यापुढे स्वप्नील यास त्रास द्यायचा नाही असे वदवून घेतले. अजय उर्फ आकांक्षाच्या धाकाने स्वप्नीलच्या वडीलांनी पहुर येथील घर बदलून घेतले. ते दुसरीकडे राहण्यास निघून गेले.

पोलिस होण्याचे स्वप्न बघणा-या स्वप्नीलचे ते स्वप्नच राहिले. त्याने आता जामनेर येथे आयटीआय या विद्या शाखेत प्रवेश घेतला. तो नियमीत आयटीआय करु लागला. या कालावधीत त्याला पुन्हा पुन्हा अजयचे कॉल येण्यास सुरुवात झाली. पुन्हा माझ्याकडे राहण्यास ये असे तो त्याला म्हणत होता. त्याला स्वप्नील नकार देत होता. काहीही करुन स्वप्नीलने आपल्यासोबतच रहावे यासाठी अजय उर्फ आकांक्षाचा हट्ट सुरु होता. मात्र अजय त्याला वारंवार नकार देतच होता. स्वप्नील यास आता तृतीयपंथी आकांक्षासोबत कोणताही रस नव्हता.

अखेर अजय उर्फ आकांक्षाचा काळ जवळ आला आणि मरणाची वेळ समीप आली. अजयने स्वत:हून स्वप्नीलच्या हातून आपले मरण ओढवून घेण्याची वेळ आली होती. तो स्वप्नीलचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हता. दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी तृतीयपंथी आकांक्षाचा स्वप्नील यास त्याच्या मोबाईलवर फोन आला. मी उद्या 31 जानेवारी रोजी जळगावला येत आहे. मला भेटण्यासाठी जळगावला ये, आपण दोघे बाहेर फिरायला जावू असे आकांक्षा उर्फ अजयने स्वप्नील यास जणू काही फर्मानच सोडले.

यावेळी काही तमाशा नको असे मनाशी म्हणत स्वप्नील आकांक्षाला भेटण्यास तयार झाला. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी स्वप्नील मुकाटपणे घरात कुणाला काही न सांगता जळगावला येण्यास निघाला. वाटेत मोटार सायकलमधे पेट्रोल भरण्यासाठी अजय उर्फ आकांक्षाने त्याला फोन पे च्या माध्यमातून तिनशे रुपये पाठवले. स्वप्नीलने सर्वप्रथम शिरसाळा येथे हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर तो मुक्ताईनगर मार्गे जळगावला येण्यास निघाला. अजय उर्फ आकांक्षा जळगाव येथील एका लॉजवर मुक्कामी होता. त्या लॉजवर स्वप्नील गेला आणि बाहेरच त्याची वाट बघत थांबला. काही वेळाने अजय बाहेर आला.

बाहेर येताच स्वप्नीलच्या मोटार सायकलवर अजय डबलसीट बसला. यावेळी अजयने अंगात काळया रंगाचा सलवार सुट, काळया रंगाची लेगीज परिधान केली होती. चेहरा पांढ-या आकाशी रंगाच्या स्कार्फने बांधलेला होता. ठरल्यानुसार अजयच्या सांगण्यानुसार दोघे जण सुरुवातीला पद्मालय येथे गणपतीच्या दर्शनाला जाण्यास निघाले. तु जर मला पुन्हा भेटला तर मी पद्मालय येथे गणपतीच्या चरणी नारळ फोडायला येईल असा नवस केला होता असे अजयने मोटार सायकल चालवणा-या स्वप्निल यास सागितले. दरम्यान प्रवासात अजयने स्वप्नीलच्या बॅंक खात्यावर फोन पे द्वारे अजून तिनशे जमा केले. या रकमेतून स्वप्नीलने अजून पेट्रोल भरले. अशा प्रकारे त्याच्या मोटार सायकलमधे ब-यापैकी पेट्रोल जमा झाले होते. अखेर दोघे जण पद्मालय येथील सुप्रसिद्ध गणपती मंदीरात सकाळी दहा वाजता दाखल झाले. नारळ व पुजेचे साहित्य विकत घेत दोघांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी पुजेच्या साहित्याचे पैसे देखील आकांक्षाने अदा केले.

देवदर्शनानंतर जेवण करण्यासाठी दोघे एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले. जेवण करतांना आकांक्षाने बियरच्या सहा बाटल्या विकत घेतल्या. यावेळी देखील सर्व खर्च आकांक्षानेच केला. आकांक्षाने तिन बियरच्या बाटल्या रिचवल्या. मात्र स्वप्नीलने कशीबशी एकच बियरची बाटली अर्धवट संपवली. मद्यपान करण्यावरुन दोघात हॉटेलमधेच वाद सुरु झाला. वाद आणि गोंधळ घालण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आकांक्षाने यावेळी देखील हॉटेलमधेच स्वप्नीलसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मद्य प्राशन करण्यासाठी पद्मालय परिसरातील जंगलात माझ्या सोबत चल असे आकांक्षाचे म्हणणे होते. स्वप्नील त्याला नकार देत होता. रागाच्या भरात आकांक्षाने पायी पायी चालण्यास सुरुवात केली. लोकांसमोर तमाशा नको असे मनाशी म्हणत शिल्लक राहिलेल्या बिअरच्या दोन बाटल्या सोबत घेत स्वप्नील तेथून उठला. त्याने मुकाट्याने अजय उर्फ आकांक्षाला मोटार सायकलवर डबलसीट बसवले.  

पद्मालय परिसरात जंगल भागातील घाटातून वर जातांना मद्यप्राशन करण्यासाठी दोघांना एक निर्जन जागा दिसली. त्यामुळे स्वप्नीलने तेथेच रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. तेथून झाडाझुडूपात दोघे जण मद्यप्राशन करण्यास गेले. त्याठिकाणी दोघांनी मद्यप्राशन करण्यास सुरुवात केली. मद्यप्राशन केल्यानंतर अजय उर्फ आकांक्षाला सिगारेट ओढण्याची सवय होती. त्यामुळे त्याच्याजवळ माचीस रहात होती. 

दुपारचे साधारण अडीच वाजले होते. दोघे जण झाडांच्या आडोशाला बसून मद्यप्राशन करत होते. स्वप्नीलने आपल्यासोबत नाशिकला यावे असा अजयने हट्ट सुरु केला. त्यावर स्वप्नीलने त्याला नकार दिला. स्वप्नीलचा नकार ऐकून अजय संतापला. त्यामुळे दोघात जोरजोरात वाद सुरु झाला. बियरच्या नशेत आकंठ बुडालेला अजय उर्फ आकांक्षाला काहीही सुचत नव्हते. तो मद्यधुंद झालेला होता. मद्याच्या नशेतील अजयने स्वप्नीलचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. काहीवेळ दोघात बाचाबाची सुरु होती.

या बाचाबाची दरम्यान खाली बसलेल्या अजय उर्फ आकांक्षाच्या डोक्यात स्वप्नीलने बियरची रिकामी बाटली जोरात मारली. ती बाटली फुटून आजुबाजूला काच पसरले. पुढच्याच क्षणी स्वत:चा बचाव करण्यासाठी आकांक्षा उर्फ अजय सरसावला. आता आकांक्षा आपल्याला रोखणार हे लक्षात येताच स्वप्नीलने त्याच्या गळ्यातील स्कार्फ त्याच्याच गळ्याभोवती आवळण्यास सुरुवात केली. बराच वेळ गळा आवळला गेल्यामुळे आकांक्षाचा जीव गुदमरला. तरी देखील जीव वाचवण्यासाठी त्याने स्वप्नीलच्या उजव्या हातावर नखाने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. काही वेळातच अजय उर्फ आकांक्षाने आपला जीव सोडला. त्याची हालचाल बंद झाली ती कायमचीच.

अजय मरण पावल्याची खात्री झालेला स्वप्नील आता पुर्णपणे भानावर आला. आकांक्षाची ओळख पटू नये यासाठी काय करता येईल याचा स्वप्नील विचार करु लागला. त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या कानातील दागिने, गळ्यातील मणी, पायातील जोडवे, बोटातील दोन्ही अंगठया, हातातील ब्रेस्लेट व त्याच्या वापराचा मोबाईल, बॅंकेचे एटीएम कार्ड व इतर वस्तू असा सर्व ऐवज काढून घेतला. काढून घेतलेला सर्व ऐवज स्वप्नीलने जवळच पडलेल्या रुमालात बांधून घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या अंगावरील सर्व कपडे आणि पायातील चप्पल देखील काढून घेतली.

आकांक्षाच्या गळ्याभोवती आवळलेला स्कार्फ वगळता अंगावरील काढलेले सर्व कपडे व चप्पल त्याच्याच अंगावर टाकून देत पेट्रोलने पेटवून दिले. मोटार सायकलच्या टाकीतून जवळपास दोन लिटर पेट्रोल काढून ते मयत आकांक्षाच्या अंगावर आणि अंगावरील कपड्यावर टाकल्याने लागलीच पेट झाला. बियर घेतल्यानंतर आकांक्षाला सिगारेट ओढण्याची सवय होती. त्यामुळे त्याच्याजवळ माचीस रहात होती. त्याच्याच माचिसने त्याचा मृतदेह पेटवून देण्यात आला होता.

मृतदेह आणि कपडे जळत असतांना स्वप्नील त्यावर हळू हळू पेट्रोल ओतण्याचे काम करत होता. आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य असल्यामुळे त्याठिकाणी हा प्रकार बघण्यास कुणीही नव्हते. बघता बघता आकांक्षाचा चेहरा आणि छाती पुर्णपणे जळून खाक झाली. आता अजय उर्फ आकांक्षाला कुणी ओळखू शकणार नाही असे स्वप्नील यास वाटले. या विचारातूनच त्याने आता घरी परत जाण्याची तयारी सुरु केली.

दुपारचे चार वाजले होते. मरण पावलेल्या आकांक्षाचा जमा केलेला ऐवज व मोबाईल आदी वस्तू कपड्यात गुंडाळून स्वप्नील त्याच्या ताब्यातील मोटार सायकलने घरी जाण्यास निघाला. सायंकाळच्या आत घरी आल्यावर घडलेला प्रकार त्याने घरात वा बाहेर कुणालाही सांगितला नाही. जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात तो वावरु लागला.

त्यानंतर चार दिवस उलटले. 4 फेब्रुवारी 2026 चा दिवस उजाडला. दुपारी बारा वाजेच्या सुमारास पद्मालय ते नागदुली दरम्यान जंगल परिसरात बक-या चारणा-यां गुराख्यांना अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचे केवळ पाय तेवढे शिल्लक होते. बाकी शरीर जळालेले होते. या घटनेची माहिती पद्मालय ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मोरे यांच्यामार्फत एरंडोल पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार राजेश पाटील यांना समजली. त्यामुळे त्यांनी पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या कानावर हा प्रकार टाकला. बातमीची खात्री करण्यासाठी सहायक फौजदार राजेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी खरोखरच एका महिलेचे नग्न अवस्थेत जळीत मात्र पाय शाबुत असलेला  मृतदेह त्यांना आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले, शंकर पवार, पोलिस उप निरीक्षक विकास देशमुख, सहायक फौजदार राजेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल ललित नारखेडे आदींनी घटनास्थळ गाठले. तत्पुर्वी पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कानावर टाकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाला समांतर तपासकामी घटनास्थळी रवाना केले.

या घटने प्रकरणी सहायक फौजदार राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र. नं. 16/2006 भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 103 (1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जंगल परिसरात घडलेल्या या घटनास्थळी कोणताही मागमुस नव्हता. या परिसरात सीसीटीव्ही नव्हते. मयताचे शरीर व चेहरा जळून खाक झाला होता. तपासाला कुठून सुरुवात करायची असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह विद्रूप अवस्थेत असल्याने ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते. डोगराळ परिसर व घनदाट जंगल असल्याने साहजीकच या ठिकाणी मानवी वर्दळ नव्हती. त्यामुळे कुणाच्या निदर्शनास येणार नाही अशा परिस्थतीत मृतदेह निर्जन स्थळी गेल्या चार दिवसापासून पडून होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची तपासकामी चार पथके तयार करण्यात आली. मृतदेहाचे पाय तेवढे शिल्लक राहिले होते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कोणता तरी पुरावा शिल्लक ठेवून जातो आणि त्या पुराव्याच्या आधारे पोलिस त्याचा माग काढतात. मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुर्नी’ हे दोन घटक घटनास्थळावर पोलिस पथकाला आढळून आले. या दोन वस्तूंवरच तपास लागू शकतो हे पोलिस पथकाच्या लक्षात आले.

या दोन वस्तूंचा धागा पकडून पुढील तपासाला गती देण्यात आली. याशिवाय तांत्रीक तपासासह खब-यांची देखील मदत घेण्यात आली. परिसरातील तांत्रीक पुरावे संकलीत करण्यात आले. जळीत व उर्वरीत मृतदेह उत्तरीय तपासकामी रुग्णालयात पाठवण्यात आला. फॉरेंसिक लॅबची तपासकामी मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक तज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या (Maggots) वाढीवरुन हा गुन्हा उघडकीस येण्याच्या चार दिवसांपुर्वी अर्थात 30 अथवा 31 जानेवारी रोजी घडला असल्याचे निश्चीत केले. जिल्ह्यात अथवा आजूबाजूच्या जिल्ह्यात एखाद्या पोलिस स्टेशनला कुणा महिलेची मिसींग दाखल आहे का? याचा देखील सखोल तपास करण्यात आला.

सखोल चौकशीत परिसरातील एका बिअर बार मधे एक महिला व एक पुरुष जोडीने मद्यप्राशन करण्यासाठी आले होते अशी माहिती समोर आली. दोघांमधे मद्य प्राशन करतांना जोरदार वाद झाले होते अशी देखील माहिती पोलिसांना समजली. बारमधे वाद घालणारे जोडपे पद्मालय देवस्थानात परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले होते. मोटार सायकलवर तेच जोडपे जात असल्याचे देखील समोर आले. अशा प्रकारे तपासाचा एक एक धागा जोडत स्थानिक गुन्हे शाखा आणी एरंडोल पोलिसांचे पथक संशयीत आरोपीचा माग काढत अखेर त्याच्यापर्यंत पोहोचले.  

मिळालेली गोपनीय माहिती, घटनास्थळावरील भौतीक व वस्तूजन्य पुरावे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा.पहूर ता. जामनेर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा संशयीत आरोपी स्वप्नील पाटील सत्य कथन करु लागला. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. छत्तीसगढ राज्यातील हिंदी भाषिक रहिवासी तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा हिच्यासोबत असलेल्या प्रेमसबंधाच्या वादातून रागाच्या भरात हा गुन्हा घडल्याचे स्वप्नील याने पोलिसांजवळ कथन केले.

तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षा हिच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने प्रहार करून तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावरील कपडे काढून मोटार सायकल मधील पेट्रोल काढून ते मृतदेहावर टाकून जागीच जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने कबुल केले. त्यातून तिचा मृतदेह अर्धवट जळाला असल्याची देखील कबुली स्वप्नील पाटील याने दिली आहे.

अत्यंत कौशल्याने या किचकट गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांना यश आले. संशयित आरोपी स्वप्नील पाटील यास न्यायालयाने सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत त्याने आपला गुन्हा कबुल केला. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार विनोद सुभाष पाटील एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले, शंकर पवार, पोलिस उप निरीक्षक विकास देशमुख, सहायक फौजदार राजेश पाटील, जवानसिंग पाटील, हेमंत घोंगडे, पोलिस नाईक सचिन पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील, पोलिस कॉन्स्टेबल ललित नारखेडे व भाऊसाहेब मिस्तरी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अधिक तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment