जळगाव : दरोड्याच्या इराद्याने संशयास्पद अवस्थेत फिरणा-या तिघा जणांना मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीची पिस्टल, एक जीवंत काडतुस, तिन अॅंड्रॉईड मोबाईल, दोन मोटार सायकली, 5300 रुपये रोख, लोखंडी छर्रे, स्क्रु ड्रायव्हर, टोकदार हत्यार आणि विविध क्रमांकाच्या नंबर प्लेटस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर शहरातील एस. एस. महाविद्यालय परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ व त्यांच्या सहका-यांना यश आले आहे. मेकला प्रसन्नकुमार मेकला दास, धरसिंगी देरच घोडीडी, मेकल विरास्वामी कोंडापा असे आंध्र प्रदेशातील तिघांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यातील गुन्हेगारांनी इतर ठिकाणी दरोड्याचा गुन्हा केला असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. इतर फरार साथीदारांचा शोध सुरु आहे. पोलिस निरिक्षक आशिष अडसुळ यांच्या पथकातील हे.कॉ. कल्पेश आमोदकर, आसिम तडवी, अंमलदार रविंद्र धनगर, मुकेश महाजन, रितेश चव्हाण आणी गोविंदा पवार आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बनसोड करत आहेत.





