जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : रात्रीचे साडेसात वाजले होते… बोरनार गावातील अनिस पटेल यांच्या घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती. पाहुण्यांची वर्दळ, नातेवाइकांची धावपळ, जेवणाच्या पंगती आणि विवाहसोहळ्याचा आनंद… सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. मुलीचे लग्न निर्विघ्न पार पडावे, हीच वधूपित्याची इच्छा होती.

मात्र या आनंदसोहळ्याला एका तरुणाच्या वादाची नजर लागली होती. काही वेळापूर्वीच मद्याच्या नशेत लग्नमंडपात येऊन मांसाहारी जेवणाचा हट्ट धरणारा प्रेम गोपाल धनगर याला नातेवाइकांनी समजावून घरी पाठवले होते. आता वाद संपला, असे सगळ्यांना वाटत होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते!
अचानक तो पुन्हा लग्नमंडपात परतला. शब्दांचे वार सुरू झाले. शिवीगाळ झाली. त्यानंतर धक्काबुक्की आणि मारहाणीने परिस्थिती हाताबाहेर गेली. काही जणांनी त्याला पकडून ठेवले. त्याचवेळी ‘इसको आज जिंदा नही छोडेंगे!’ अशी आरोळी दिली. पुढच्याच क्षणी धारदार शस्त्राचे वार झाले. काही क्षणांपूर्वी स्वतःच्या हट्टासाठी वाद घालणारा प्रेम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. लग्नमंडपातील आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले. एका कुटुंबाचा आनंद हिरावला गेला आणि अनेकांच्या आयुष्यावर दुःखाची कायमची छाया पसरली. मात्र हा रक्तरंजित शेवट अचानक घडलेल्या वादापुरता मर्यादित नव्हता. त्यामागे होती एका तरुणाची बिघडत गेलेली जीवनशैली, व्यसनाची सवय आणि वारंवार समोर येणारे वाद…

जळगाव जिल्ह्यातील बोरनार येथील प्रेम गोपाल धनगर हा तरुण एमआयडीसी पोलिसांच्या अभिलेखावरील होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी वेळोवेळी त्याला समज दिली होती. सुधारण्याची संधीही मिळाली होती. मात्र त्याच्या वागण्यात अपेक्षित बदल होत नव्हता.

दारूचे व्यसन आणि कोणत्याही कारणावरून इतरांशी वाद घालण्याची सवय यामुळे परिसरातील नागरिक प्रेमला वैतागले होते. एखाद्या छोट्या कारणावरून वाद निर्माण करणे, लोकांना त्रास देणे आणि दादागिरी करणे, अशा प्रकारांमुळे त्याच्याबद्दल परिसरात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई झाल्यानंतर तो अमळनेर येथे मामाच्या गावी राहण्यासाठी गेला होता. दिवाळीच्या निमित्ताने त्याचे आई-वडीलही अमळनेर येथे गेले होते. काही काळ बोरनारपासून दूर राहिल्यानंतर प्रेमला पुन्हा गावात येण्याची इच्छा झाली. तो एकटाच बोरनार येथे परतला. गावात परतल्यावर त्याचे जुने वागणे पुन्हा सुरू झाले. परिसरातील नागरिकांना पुन्हा त्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

आणि अशाच वातावरणात १८ नोव्हेंबर २०२६ हा दिवस उजाडला. त्या दिवशी बोरनार येथील अनिस अजिज पटेल यांच्या मुलीचा विवाहसोहळा होता. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नासाठी नातेवाईक जमले होते. पाहुण्यांच्या स्वागताची आणि जेवणाची व्यवस्था सुरू होती. अशा मंगल वातावरणात प्रेम गोपाल धनगर मद्याच्या नशेत लग्नमंडपात आला. त्याने तेथे मांसाहारी जेवणाची मागणी सुरू केली. मात्र त्या दिवशी मांसाहारी जेवण नसल्याचे त्याला सांगण्यात आले. सामान्य परिस्थितीत हा विषय काही क्षणांत संपला असता. मात्र मद्याच्या नशेत असलेला प्रेम कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने लग्नमंडपातच वाद घालण्यास सुरुवात केली.

वधूपक्षातील मंडळींसाठी हा प्रसंग अनपेक्षित होता. एका बाजूला मुलीच्या लग्नाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला मद्यधुंद तरुणाचा गोंधळ! परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून प्रेमचा आतेभाऊ सुनील धनगर आणि त्याचे काका दिलीप सिताराम धनगर यांनी पुढाकार घेतला. दोघांनी त्याला समजावले. वाद वाढवू नकोस, लग्नसमारंभात गोंधळ करू नकोस, अशा शब्दांत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघांनी त्याला लग्नमंडपातून घरी आणले. नातेवाइकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. लग्नातील गोंधळ आता थांबेल, अशी आशा निर्माण झाली. पण हा केवळ वादातील मध्यांतर होता!

प्रेम घरी गेल्यानंतर लग्नमंडपात पुन्हा लगबग सुरू झाली. मात्र तो पुन्हा परत येऊ शकतो, याची शक्यता वधूपक्षातील काही नातेवाइकांना वाटत होती. त्यामुळे अनिस पटेल आणि त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक सावध होते. साधारण अर्ध्या तासानंतर, रात्री ७.३० वाजेच्या सुमारास प्रेम पुन्हा लग्नमंडपात आला. आता पुन्हा वाद होणार, याची भीती खरी ठरली.

अनिस अजिज पटेल, आदिल अजिज पटेल, शोएब ईस्माईल पटेल, सादिक मुर्शीद पठाण आणि अश्पाक मेहमुद पटेल यांच्यासोबत त्याचा वाद सुरू झाला. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ करण्यात आली. शब्दांना शब्द भिडले. आवाज वाढले. संताप अनावर झाला. यानंतर प्रेमला मारहाण सुरु झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले.
अजिज पटेल, शोएब ईस्माईल पटेल, सादिक मुर्शीद पठाण आणि अश्पाक मेहमुद पटेल यांनी प्रेमला पकडून ठेवले. त्याचवेळी आदिल पटेल याने ‘इसको आज जिंदा नही छोडेंगे!’ अशी आरोळी दिली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने प्रेमच्या शरीरावर आणि पाठीवर वार केले. सगळे काही काही क्षणांत घडले. प्रेम गंभीर जखमी झाला. शरीरातून रक्त वाहू लागले आणि तो जमिनीवर कोसळला.


क्षणभरापूर्वी ज्याच्या आवाजाने लग्नमंडप दणाणून गेला होता, तोच तरुण आता रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. हल्ल्यानंतर संबंधित संशयीत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, लग्नमंडपातील आरडाओरडा ऐकून घरी गेलेला सुनील धनगर पुन्हा घटनास्थळी आला. समोरचे दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. प्रेम रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता.
आते भाऊ सुनील आणि काका दिलीप यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेमकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. काही वेळापूर्वी ज्याला समजावून घरी आणले होते, त्याच व्यक्तीला आता रक्ताच्या थारोळ्यात पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. नातेवाइकांच्या मदतीने प्रेमला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. सुनील आणि दिलीप यांच्यासाठी हा क्षण अत्यंत वेदनादायी होता. एका लग्नसमारंभात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना अखेर मृत्यूची बातमी स्वीकारावी लागली होती.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदींनी घटनास्थळासह रुग्णालयात धाव घेतली. मृताचा आतेभाऊ सुनील धनगर याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२५/२०२६ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ११५(२), ३५१(२), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३) आणि १९० नुसार अनिस अजिज पटेल, आदिल अजिज पटेल, सादिक मुर्शीद पठाण, शोएब ईस्माईल पटेल आणि अश्पाक मेहमुद पटेल यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, म्हसावद दूरक्षेत्रातील हेड कॉन्स्टेबल इश्वर लोखंडे, चेतन पाटील, रमेश चौधरी, चंद्रकांत पाटील, भुषण मांडोळे, पोलिस कॉन्स्टेबल कैलास पाटील, राहुल बोरसे आदींच्या मदतीने पुढील तपासाची चक्रे फिरवण्यात आली.

दरम्यान, प्रेमच्या मृत्यूची बातमी बोरनार गावात पसरताच वातावरण तणावपूर्ण झाले. मृताच्या नातेवाइकांनी पाचही संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे शासकीय रुग्णालयातही तणावाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयासह गावातील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. अखेर पाचही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नातेवाइकांचा संताप निवळला.
बोरनारमधील ही घटना केवळ एका खूनाच्या गुन्ह्याची नोंद म्हणून विसरून चालणार नाही. या घटनेतून समाजाला अनेक गंभीर संदेश मिळतात. प्रेमच्या आयुष्यात दारूचे व्यसन आणि वारंवार होणारे वाद सुरु होते. त्याला यापूर्वी पोलिसांकडून समज देण्यात आली होती, प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या होत्या. तरीही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. व्यसनाधीन व्यक्तींना केवळ समज देऊन उपयोग होत नाही. वेळेवर समुपदेशन, उपचार आणि कुटुंबीयांचा सहभागही महत्त्वाचा असतो.
दुसरीकडे, एखादा व्यक्ती कितीही त्रासदायक असला, तरी त्याला मारहाण करणे किंवा त्याचा जीव घेणे हा कोणताही उपाय नाही. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. वाद कितीही वाढला, तरी संयम आणि कायदेशीर मार्ग यांनाच प्राधान्य दिले पाहिजे.
या घटनेत एका बाजूला एका कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावला. दुसऱ्या बाजूला गंभीर गुन्ह्याच्या आरोपांना सामोरे जाण्याची वेळ संबंधित व्यक्तींवर आली. एका लग्नसमारंभातील वादाने अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकले. दारूची नशा उतरते, राग शांत होतो, वाद विसरले जातात. पण गेलेला जीव परत येत नाही!
बोरनारच्या त्या लग्नमंडपात काही वेळापूर्वी आनंदाचे सूर घुमत होते. मात्र काही क्षणांच्या अविचाराने तेथे आक्रोश निर्माण झाला. म्हणूनच प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे…माणसाला जिंकण्यासाठी शस्त्राची गरज नसते. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची ताकद लागते. वादात जिंकण्याच्या नादात आयुष्य हरवू नका. कारण एका क्षणाचा संताप अनेक पिढ्यांच्या दुःखाचे कारण ठरू शकतो. बोरनारची ही रक्तरंजित घटना समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे. लग्नमंडपातील आनंदाचे रूपांतर मृत्यूच्या आक्रोशात झाले. आता तरी व्यसन, दादागिरी आणि हिंसक मानसिकतेविरुद्ध समाजाने जागे होण्याची वेळ आली आहे.








