जळगाव : रा.कॉ. चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाहनांचा ताफा भुसावळ शहरात आज अडवल्याने राजकीय वातावरण काही वेळ तापले होते. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे व इतर काही संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून वाहने अडवण्यात आली होती. स्थानिक पातळीवर रा.कॉ.चे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध असलेल्या नाराजीतून हे आंदोलन केले असल्याचे म्हटले जात आहे.
आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासमक्ष संतोष चौधरी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने जयंत पाटील यांनी आंदोलकांसमवेत हितगुज केले. भुसावळ नगरपालीकेवर सध्या भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे रा.कॉ.चे नेते जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले शेकडो बॅनर्स काढण्यात आले. एकंदरीत रा.कॉ. विरुद्ध भाजप असे वातावरण तापले असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.








