जळगाव : जळगावसह विविध देशात प्रसिद्ध असलेल्या जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या पोर्ट्रेटची गिनीज बुकात नोंद घेण्यात आली आहे. जैन पाईप्सचा मदतीने प्रदीप भोसले यांनी या हे पोर्ट्रेट साकारले आहे. मोजेक प्रकारात तयार करण्यात आलेल्या या पोर्ट्रेटची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनी नोंद घेतली आहे. जागतीक विक्रमाचे प्रमाणपत्र गिनीज बुक कडून देण्यात आले आहे. भवरलालजी जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला या प्रमाणपत्राचे प्रदान करण्यात आले आहे. गुरुवारी या कलाकृतीचे लोकार्पण केले जाणार आहे.
जळगावच्या जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ या ठिकाणी 150 फूट लांब आणि 120 फूट रुंद असे एकुण 18 हजार चौरस फूट ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही कलाकृती कायमस्वरुपी राहणार असून ‘भाऊंच्या वाटिके’त ती प्रेक्षकांना बघण्यासाठी उपलब्ध राहील. काळा, करडा आणि पांढरा अशा तिन रंगात पीई आणि पीव्हीसी पाईप्सच्या मदतीने ही मनोहारी भव्य कलाकृती साकारण्यात आली आहे.
भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला त्या पाईप्सपासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे. या पोर्ट्रेटसाठी पीई पाईप २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास असे एकूण ९८ तास अर्थात पाच हजार ८८० मिनिट, ३ तीन लाख ५२ हजार ८०० सेकंदात या मोजेक स्वरूपाची कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्याठिकाणी विक्रम होत असतात अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडीओ चित्रण करण्यात येते. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडोओची बारकाईने नोंद घेण्यात येते. अशीच नोंद या पोर्ट्रेटसाठीसुध्दा घेण्यात आली. या जागतिक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्यावतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी कोरोनामुळे ही पूर्ण कलाकृती ऑनलाईन पाहिली. याशिवाय गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जळगाव येथील आर्किटेक शिरीष बर्वे यांची सर्व्हेयर म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्यासह प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे हे या जागतिक विक्रमाचे साक्षीदार म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने नेमणूक केली होती. स्वप्नील डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.
विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोक जैन
कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी भवरलाल जैन यांच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रीडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीतआता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. भवरलाल जैन यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आणि प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहिल, असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या भावना व्यक्त केल्या.