इंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा

On: March 30, 2021 8:01 PM

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना त्यांनी केलेल्या लिंग भेदभावासंबंधी वादग्रस्त वक्तव्यासंबंधी संगमनेर न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांचे अपील मंजूर करण्यात आले आहे. दिवाणी न्यायालयाकडून देण्यात आलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात इंदोरीकर महाराजांनी अपील दाखल केले होते. संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द केला आहे. न्यायालयाचा निकाल समजताच इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

“स्त्री समवेत सम तिथीला संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला संग झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाल्यास संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी निर्माण होते” असे वाद निर्माण करणारे वक्तव्य इंदोरीकर यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्याप्रमाणे नोटीस बजावली होती. तसेच याप्रकरणी खुलासा देखील मागीतला होता. याप्रकरणी अखेरच्या दिवशी आपल्या वकीलांच्या मार्फत महाराजांनी न्यायालयात खुलासा सादर केला.

इंदोरीकर महाराज यांचे कथित वादग्रस्त वक्तव्य कुठे आणि कधी करण्यात आले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचे कारण पुढे करत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अनिसच्या रंजना गवांदे यांनी पाठपुरावा करुन या प्रकरणी पुरावे जमा करुन जिल्हा आरोग्य विभागाला सादर केले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर न्यायालयात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश दिले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment