छायाने रॉड हाणला सासूच्या डोक्यात ! मृतदेहाचे गाठोडे नेवून टाकले मैदानात !!

नाशिक : आजकाल लग्न जुळवतांना उपवधू आणि उपवर मुला-मुलीची पत्रिका जुळवून पाहिली जाते. परंतु आता उपवधू आणि तिची भावी सासू यांची देखील पत्रिका जुळते का हे बघण्याची आणि तसे म्हणण्याची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे लग्नानंतर एकत्र कुटूंबातील पती दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो. मात्र दिवसभर सुनेचा सर्वाधिक संबंध तिच्या सासूसोबत येत असतो. अशा प्रसंगी सासु आणि सुनेचे वाद हे बहुतांश वेळी होतच असतात. सासु सुनेचे वाद हे आपण नेहमीच ऐकत व बघत असतो. सासु सुनेच्या वादावर आजवर कित्येक सिनेमा देखील तयार झालेले आहेत. कित्येक टिव्ही सिरीयल मधे सासू सुनेचे वाद आवर्जून दाखवले जातात. जुन्या जमान्याच्या काळात ललिता पवार या अभिनेत्रीचे पात्र केवळ खाष्ट सासूच्या  भुमिकेसाठी निवडले जात होते. अगदी दुर्मिळ ठिकाणी आपल्याला सासु आणि सुन यांच्यात प्रेमाचे अर्थात आई आणि मुलीसारखे संबंध असल्याचे दिसून येते. अशा कुटूंबात आपल्याला नेहमीच आनंदी वातावरण  दिसून येते. ज्या घरात सुन आणि सासू खळखळून हसतात त्या घरात वास्तूदोष निवारणाची गरज भासत नाही.
काही दिवसांपुर्वी नाशिक शहराच्या जेलरोड परिसरात एका सुनेने तिच्या सासुच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा हल्ला करुन तिला जिवे ठार करण्याची घटना घडली. सासु आणि सुनेच्या वादातून हा दुर्दैवी हल्ला झाला होता. लावालावी अर्थात चुगली करत असल्याचा सासुचा तिच्या सुनेवर नेहमीच आरोप रहात होता. त्यातून सुनेने सासूवर हा जिवघेणा हल्ला केला होता. त्यात सासू जिवानिशी गेली. पोलिस तपासात सत्य उघडकीस आल्यानंतर सुनेला जेलमधे जाण्याची वेळ आली.
नाशिक रोड येथील जेल रोड भागात धनराज नगर भागात मंदाकिनी वसंतराव पाटील (मेधने) या 62 वर्षाच्या जेष्ठ नागरिक महिला रहात होत्या. मंदाकिनी पाटील यांच्या कुटूंबात मुलगा संदीप, सचिन आणि त्याची पत्नी छाया असे सर्व सदस्य आहेत. छाया ही सचिनची दुसरी पत्नी आहे. सचिन हा एकलहरे-नाशिक रेल्वे स्टेशन येथे नोकरीस आहे.
सचिनची दुसरी पत्नी छाया आणि तिची सासू मंदाकिनी यांच्यात काही केल्या जमत नव्हते. त्यामुळे ती तिची व्यथा नेहमी पती सचीन यास सांगत असे. आपली सून छाया ही आपल्या बद्दल नेहमी लावालावी अर्थात चुगली करत असते असा सासू मंदाकीनीचा आरोप रहात होता. या आरोपामुळे छाया तिची सासू मंदाकिनीवर चिडचिड करत असे. एकंदरीत सासू आणि सुनेचे काही केल्या जमत नव्हते. त्यातून दोघात वाद होत असत. कधी कधी दोघांचे वाद विकोपाला जात असत.
शनिवार दि.१ फेब्रुवारीची सकाळ उजाडली ती  मंदाकिनी पाटील यांच्या जिवनातील शेवटचा दिवस म्हणूनच. सकाळ पासूनच छायाच्या मनात सासू मंदाकिनीबद्दल राग होता. या दिवशी घरातील सगळे जण उठून नेहमी प्रमाणे आवरा-आवर करत होते. सचिन आणि संदीप कामावर जाण्यासाठी आपली कामे आवरत होते. इकडे स्वयंपाकघरात छाया सकाळचा नाष्टा करत होती. नाश्ता तयार झाल्यानंतर तिने तो सगळ्यांना दिला. अजून तिची सासूबाई मात्र उठलेली नव्हती. ल्या नव्हत्या. काहीवेळाने छायाने सासूबाईच्या खोलीत जावून पाहिले तर त्या अंथरूणाची घडी घालत होत्या. सून छाया आपल्या खोलीत का डोकावून पहाते? म्हणून सासू मंदाकिनीच्या कपाळावर आठी चढली. ‘ही बया घरात आल्यापासून घरात भांडण वाढलीत.  इकडंचं तिकडं,  तिकडंच इकडं करण्याची हिला भारी हौस.’ असे मनाशी सासूबाई पुटपुटली.  छायाला ते किंचितसे ऐकू आले, त्यामुळे तिला सासूचा भलता राग आला. ती रागाच्या भरात स्वयंपाकघरात आली आणि तीही पुटपुटू लागली.
“ह्या मला समजतात काय? मी काय भांडण लावते ?” असे ती पुटपुटत होती. प्रत्येक जण घाईत असल्याने कुणाचेही लक्ष छायाच्या पुटपुटण्याकडे गेले नाही. नाश्ता झाल्यानंतर सगळे जण आपआपल्या कामाला निघून गेले. आता छाया सकाळचे धुणे, स्वयंपाकाच्या तयारीला लागली. इकडे सासूबाई अंघोळ करून घेत किचनमध्ये आली. सासू मंदाकिनी यांनी  छायाकडे चहा मागितला. “सासूबाई नाश्ता देवू का?” छायाने विचारले.
“मी देवपूजा झाल्याशिवाय नाश्ता घेत नाही, माहित आहे ना तुला?” असे त्यांनी रागानेच छायाला म्हटले.  त्यानंतर त्या देवपूजेच्या तयारीला  लागल्या. छाया त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहून रागाने मनातल्या मनात बडबडत होती. ‘आज  काम करायचंच.”  अस तिने मनाशी ठरवले. त्यानंतर सासूच्या नकळत ती बाजूला गेली आणि हातात लोखंडी रॉड घेवून ती सासूच्या पाठीमागे तिला मारण्याच्या पवित्र्यात उभी राहिली.
सासूने देवघरातील घंटी घेतली आणि त्या आरती म्हणत असतांनाच छायाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. “आई गऽऽ” असं म्हणत त्या किंचाळल्या. तोवर छायाने दुसरा दणका त्यांच्या डोक्यात घातला. त्यासरशी त्या बेशुद्ध होवून खाली पडल्या. बेशुद्ध पडलेल्या मंदाकिनीबाई अजूनही हालचाल करत होत्या, “बाई मरायची नाही इतक्यात’ असे म्हणून छायाने पुन्हा डोक्यात रॉड हाणला. त्यासरशी मंदाकिनीबाईची हालचाल बंद झाली. ‘मेली एकदाची. मला नावं  ठेवते काय?  मी काय लावालाव्या करते म्हणे? माझ्यामुळे घरात भांडणं होतात.’ असे म्हणत या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावायची याचा विचार तिने मनातल्या मनात सुरु केला. अखेर तिला एक गोणपाट दिसले. त्या गोणपाटात तिने तो मृतदेह कोंबला. त्याचे अक्षरश: गाठोडेच बांधले. त्यावर साड़ी गुंडाळून त्याचे गाठोडे तयार केले. त्यानंतर छाया बाहेर आली. तिने आजूबाजूचा कानोसा घेतला. बाहेर फारसे कुणी दिसत नव्हते. घरात दुपारच्या वेळी सगळे जण जेवायला येतात. त्याच्या आत हे गाठोडे फेकून द्यायला हवे असे म्हणत ते जड गाठोडे तिने डोक्यावर घेतले आणि घरासमोरच असलेल्या दुर्गामाता मंदिराजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेवर ते गाठोडे फेकले. याठिकाणी फारसे कोणी येत नाही हे तिला माहिती होते. त्यामुळे तिने ते गाठोडे तिथे टाकले आणि ती पुन्हा घरात आली.
सकाळी कामावर गेलेला छायाचा नवरा सचिन, दीर संदीप आणि पुतणी प्राची दुपारी जेवायला आले. तेव्हा तिने त्यांना सांगितले की “आपल्या आई सकाळी आठ वाजता ब्लाऊजपीस आणण्यासाठी बाहेर गेल्या, त्या अजून आल्या नाहीत.”
“अगं, खरंच ती बाजारातच गेली ना? का कुठे नातेवाईकाकडे जाते म्हणून बाहेर गेली.”  असे सचिनने तिला विचारले.
नाही हो. मला तरी तसंच त्यांनी सांगितलं.” असे छायाने पतीला सांगितले. त्यावर संदीप व सचिन या दोघा भावांनी मिळून त्यांची आई मंदाकिनी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या आईचा सगळीकडे शोध घेतला. ती ज्याठिकाणी जावू शकते त्याठिकाणी त्यांनी शोधून पाहिले पण त्यांना आपली आई काही मिळून आली नाही. अखेर रात्री  ११ वाजता संदीपने उपनगर पोलीस ठाण्यात जावून आई मंदाकिनी वसंतराव पाटील हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर महिला बेपत्ता झाल्याची नोंद करून घेतली आणि तपासाला सुरूवात केली.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर संदीप व सचिन हे दोघे भाऊ आईचा शोध घेवू लागले. धनराजनगरमध्ये राहणा-या मंदाकिनी वसंतराव पाटील (वय ६२), मध्यम शरीरयष्टी, सावळा रंग अशी महिला आढळून आल्यास तात्काळ संपर्क साधावा, माहिती देणा-यास ५० हजाराचे बक्षीस देण्यात येईल अशी पत्रके वाटण्यात आली. शहरात ठिकठिकाणी डिजीटल बोर्ड लावण्यात आले. दहा दिवस सर्व जण आई मंदाकिनीची वाट पहात होते,
आपली आई अशी कुठे गेली? अचानक कशी बेपत्ता झाली? तिचे बरे-वाईट झाले नाही ना? असा विचार ते करत होते. गेले. १० दिवस सचिन-संदीपला नीट झोप लागत नव्हती. सकाळ झाली की आज आपल्या आईची काहीतरी खबरबात ऐकायला मिळेल या आशेने ते लवकर उठत. घरात आलेले दैनिक वाचून काढत. त्यामध्ये काही माहिती मिळते का? याचा शोध घेत होते.
दि.११ फेब्रुवारी २०२० ची सकाळ. साडेआठ वाजले असावेत. मंदाकिनी पाटील यांच्या घरासमोरच असलेल्या दुर्गामाता मंदिराजवळ असलेल्या धनराज नगरातील मोकळ्या जागेवरुन दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांना जाणवले.याबाबत कुणकुण लागताच मंदाकिनीची  दोन्ही मुले सचिन व संदिप हे दोघे नागरिकांसमवेत त्या जागेवर गेले. तेथे त्यांना एक बारदानाची गोणी पडलेली दिसून आली. त्या गोणीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांनी उपनगर पोलिस स्टेशनला फोन करुन माहिती दिली. खबर मिळताच सहायक आयुक्त इश्वर वसावे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल रोहकले आपल्या सहकारी पोलिस कर्मचा-यांसह घटनास्थळी आले.
धनराज नगरातील रिकाम्या प्लॉट वर असलेल्या बारदानाच्या गोणीतून दुर्गंधी येत असल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ती गोणी ताब्यात घेत तिला अ‍ॅंम्बुलंसद्वारे दवाखान्यात नेले. त्यांच्या पाठोपाठ सचिन व संदिप हे दोघे भाऊ देखील दवाखान्यात गेले. सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी गोणीचे तोंड उघडून पाहिले असता त्यात स्त्री जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेह  संदीप-सचिन या दोन भावांना दाखवण्यात आला.
मृतदेह पाहताच संदीपने हा मृतदेह आई मंदाकिनीचाच असल्याचे सांगितले. मृतदेहाच्या अंगावरील साडी, हातातील सोन्याच्या बांगड्या व कानातील सोन्याचे डुल वगैरे वस्तूमुळे त्यांनी खात्रीशीरपणे आपल्या आईचाच हा मृतदेह असल्याचे ठामपणे सांगितले. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईचा खून झाल्याचे पाहून दोघा भावांनी हंबरडा फोडला. ही वार्ता जेल रोड भागात पसरण्यास वेळ लागला नाही व  एकच खळबळ उडाली.
ब्लाऊजपीस घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मंदाकिनीबाईचा खून झाल्याचे ऐकून परिसरातील लोक सुन्न झाले. तिचा मृतदेह घरासमोर असलेल्या मोकळ्या पडीत जागेवर मिळून आल्याने तिचा खून कुणी केला व का केला? याचे कोडे सर्वांना पडले. पोलिसांनी घटनास्थळासह  मृतदेहाचा पंचनामा केला.
या प्रकरणी सचिन वसंतराव पाटील (वय ३४) याने उपनगर पोलीसात अज्ञात मारेक-याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार गु. र. न. ८६/२०२० भा.द.वि. ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहकले यांनी आपल्याकडे या गुन्ह्याचा तपास घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदाकिनीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मंदाकिनीबाईच्या अंगावरील सोने जसेच्या तसे मिळून आल्याने हा खून चोरीच्या उद्देशातून झाला नसल्याचे स्प्षट  झाले होते.
यानंतर पोलिसांनी मंदाकिनीच्या घरातील सदस्यांचे जबाब घेतले. त्यामध्ये त्यांना सून छाया हिच्यावर संशय येवू लागला. पहिली गोष्ट म्हणजे घरातील सगळे छाया व्यतिरिक्त बाहेर गेल्यानंतर सासूबाई ब्लाऊजपीस आणण्यासाठी बाहेर गेल्याचे छायाने सांगितले होते. त्या वेपत्ता झाल्या आहेत याची माहिती तिनेच घरच्या सदस्यांना दिली. त्यामुळे तिच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता ती काहीतरी लपवत आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिचे अवसान गळले आणि तिने आपणच सासूचा खून केल्याची कबुली दिली.
आपली सासू आपणांस टोचून बोलत असे. आपण लावालाव्या करतो असे ती सातत्याने म्हणत असल्यामुळे आपणांस सासू बद्दल राग होता. त्यातूनच तिने दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी घरातून तिचा नवरा सचिन, दीर संदीप आणि पुतणी प्राची हे बाहेर पडल्यानंतर सासूचा खून केला. त्यादिवशी मंदाकिनी या अंघोळ करून किचनमधील देवघरासमोर देवपूजा करण्यासाठी बसल्या असतांना सून छायाने लोखंडी रॉडने सासूच्या डोक्यात पाठीमागून वार केला. त्यामध्ये त्या जागीच ठार झाल्या.
सासू मंदाकिनी वसंत पाटील (वय ६२) हिचा खून केल्याप्रकरणी छाया सचिन पाटील हिला अटक करण्यात आली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल रोहकले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here