नासिरचा विवाहितेसोबत सुरु होता प्रेमाचा सिलसिला ! लोखंडी रॉडच्या घावात कायमची संपली त्याची रासलिला !!

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या साकेगाव या लहानशा गावी नासिर बशिर पटेल हा विवाहित तरुण रहात होता. विवाहीत नासिर पटेल याचा दुध विक्रीचा व्यवसाय होता. पत्नी, दोन मुले व दोन मुली तसेच काही पाळीव म्हशी असा नासिरचा सुखी संसार सुरु होता. तसे बघता त्याचे पोरे – सोरे आणि ढोरे असे सर्व काही मजेत होते. म्हशींचे काढलेले दुध तो दररोज भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरात असलेल्या विशाल दुग्धालय या दुध डेअरीत विक्रीसाठी आणत होता. या डेअरी मालकाच्या मासिक ग्राहकांच्या घरी सकाळ – सायंकाळ असे दोन्ही  वेळचे दुध वितरीत करण्याचे काम देखील नासिरकडे होते. गेल्या सहा महिन्यापासून नासिरचा हा उद्योग व्यवस्थित सुरु होता.
भुसावळ शहरातील कोळीवाडा परिसरात नासिर दुध वितरण करत असे. या भागातील एका विवाहीत महिला दुध डेअरी चालकाची मासिक ग्राहक होती. सकाळ – सायंकाळ अशा दोन्ही वेळेस नासिरला या महिलेच्या दारी दूध वाटपासाठी जाण्याचा योग येत होता. भल्या पहाटे त्याच्या गाडीचा आवाज ऐकला म्हणजे ती महिला रिकामे पातेले घेवून घराबाहेर दुध घेण्यासाठी येत होती. सकाळी सकाळी तिचा हसतमुख चेहरा पाहिला म्हणजे इकडे नासिरची कळी खुलत असे. दोघांची एकमेकांकडे नजरानजर होत असे. दुधाचे माप कॅनमधे टाकून मोजलेले दुध बाहेर काढून तो तिच्या रिकाम्या पातेल्यात ओतुन देत असे. दरम्यान तिच्या गुलाबी ओठांसह काही विशिष्ठ अवयवांच्या हालचाली नासिरच्या पारखी नजरेने हेरल्याशिवाय रहात नव्हत्या. त्यशिवाय नासिरच्या मनाला शांतता लाभत नव्हती. सायंकाळी हाच प्रकार रिपिट होत असे. सायंकाळी त्या महिलेचा साजशृंगार बघण्याचा योग नासिरला लाभत होता. बघता बघता दुध वितरण करता करता त्याचा त्या महिलेसोबत संपर्क वाढला. संपर्कातून त्यांचे एकमेकांसोबत संभाषण देखील वाढले. याची परिणीती म्हणून दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दुधाची देवाणघेवाण ही दोघांच्या प्रेमासाठी एक माध्यम ठरले होते.
दोघांच्या प्रेमाचा हा सिलसिला कित्येक दिवस सुरु होता. वास्तविक नासिर हा एक विवाहीत होता. त्याला दोन मुले व दोन मुली होत्या. ती महिला देखील विवाहिता होती. दोघे विवाहित असतांना देखील त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले व वाढले. दोघे लपूनछ्पून एकमेकांना भेटू लागले. दुधाची देवाण घेवाण करतांना त्यांची सांकेतीक भाषा काम करु लागली.
प्रेम कितीही लपवले तरी ते लपत नाही असे म्हणतात. दुध वितरण करणारा नासिर आणि त्या महिलेचे प्रेम परिसरातील लोकांच्या लक्षात आले. घरातील कर्ते पुरुष कामाला गेल्यानंतर फावल्या वेळात गल्लीतील महिला एकत्र जमत. एकत्र आल्यानंतर त्या महिला परिसरातील चालू घडामोडीवर चर्चा करत असत. महिलांच्या पोटात कोणतीही गोष्ट रहात नाही हे सर्वश्रुत आहे. एखादी गोष्ट एखाद्या महिलेला समजली म्हणजे ती महीला ती गोष्ट लागलीच संधी बघून दुस-या महिलेला सांगीतल्याशिवाय रहात नाही. असाच प्रकार कोळीवाड्यात झाला. दुध वाटप करणारा नासिर व त्या महिलेच्या प्रेम कथेची वार्ता गल्लीतील महिलांच्या माध्यमातून प्रसारीत होण्यास वेळ लागला नाही. एक महिला दुस-या महिलेला बोलावून तिच्या कानात सांगू लागली की “ हे बघ फक्त तुलाच सांगते………कुणाला सांगू नको…..आपल्या गल्लीतील ती…..चे  त्या दुधवाल्या नासीर सोबत…….”
त्यावर ऐकणारी महिला तोंडात बोट घालून “ अग बाई!…..अस का? …. मी  कुणाला सांगणार नाही बर…….”  असे म्हणत तिच गोष्ट कुणाला सांगायचे नाही या अटीवर तिस-या महिलेला सांगू लागली. अशा प्रकारे नासिर व त्या महिलेच्या प्रेमप्रकरणाची कथा सर्वांना समजण्यास वेळ लागली नाही.
या प्रेमप्रकरणाची भणक त्या महिलेच्या तरुण मुलाला लागली. त्याने या प्रकरणी त्या महिलेला अर्थात त्याच्या आईला समजावले. परंतू त्याचे ते प्रयत्न व्यर्थ ठरले.  दुध वाटप करणारा नासिर आणि त्या महिलेचे प्रेम प्रकरण सुरुच होते. त्यामुळे नासिरबद्दल त्या महिलेच्या मुलाच्या मनात संतापाची लाट उसळली होती.
अखेर 2 मार्चची ती दुर्दैवी सायंकाळ नासिरच्या जिवनात आली. नेहमीप्रमाणे सायंकाळच्या दुध वितरणासाठी (वाटप) नासिर दुचाकीला दुधाच्या कॅन लावून तयार झाला. आज त्याच्यासमवेत डेअरी चालकाचा मुलगा पुरुषोत्तम प्रविण जंगले हा देखील होता. कोळीवाड्यातील ग्राहकांकडे दुध देण्यासाठी नासिर आणि प्रविण जंगले असे दोघे जण आले होते. एका ग्राहकाकडे दुध देण्यासाठी नासिर जात असतांना त्याठिकाणी त्या महिलेच्या मुलाचे आवेशात आगमन झाले. ग्राहकाकडे दुध देत असतांना पाठीमागून आलेल्या त्या महिलेच्या संतप्त मुलाने नासिरच्या डोक्यात लोखंडी रॉड हाणला. डोक्यात लोखंडी  रॉडचा हल्ला अचानक झाल्यामुळे बेसावध नासिर धाडकन जमीनीवर कोसळला. त्यानंतर देखील त्या महिलेच्या संतप्त मुलाने नासिरच्या डोक्यात हातातील लोखंडी रॉडचे सलग दोन ते तिन वार केले. या हल्ल्यामुळे नासिरच्या डोक्यातून, नाकातून व तोंडातून रक्त बाहेर आले. ते रक्त रस्त्यावर पसरले. रस्त्यावर जणू काही रक्ताचा पुर आला. नासीर जागीच मयत झाला होता. हल्ला केल्यानंतर त्या महिलेचा संशयित हल्लेखोर मुलगा फरार झाला.
या भयावह हल्ल्यामुळे नासिरसोबत आलेला डेअरी चालकाचा मुलगा पुरुषोत्तम जंगले घाबरला. या हल्ल्यामुळे परिसरातील लोक देखील काय झाले म्हणून बघण्यासाठी धावतच घटनास्थळी आले. भेदरलेल्या पुरुषोत्तम जंगले याने या घटनेची खबर त्याचे काका गोपाळ जंगले यांना दिली व लागलीच घटनास्थळावर बोलावले. दरम्यान या वार्डातील नगरपालीका सदस्य युवराज पाटील यांनी या घटनेची माहीती भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस स्टेशनला कळवली. माहीती मिळताच बाजारपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर नासिरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत नासिर पटेलचे याच परिसरातील एका महिलेसोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा या निमिताने सुरु होती. ती चर्चा पोलिस पथकाने टिपली होती.
या प्रकरणी पुरुषोत्तम  जंगले याच्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलिसात गु.र.न.42/20  भा.द.वि. 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खून प्रकरणी दाखल फिर्यादीत नासिर व त्या महिलेबाबत परिसरातील चर्चेतून समजलेल्या प्रेमसंबंधाचा उल्लेख घेण्यात आला. खून केल्यानंतर संशयीत लागलीच फरार झाला होता. शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे रजेवर असल्यामुळे डीवायएसपी गजानन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली संशयीताचा शोध बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलिप भागवत व त्यांचे सहकारी करत होते. पोलिस निरिक्षक दिलीप भागवत व त्यांचे सहकारी त्याच्या मागावर होते. फरार संशयीत हल्लेखोर हा  बंटी पथरोड या गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या व्यक्तीच्या घरी आश्रयासाठी गेला होता. बंटी पथरोड याच्या पत्नीने ही माहिती पो.नि. दिलिप भागवत यांना मोबाईलद्वारे कळवली. मात्र या ठिकाणी पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण संशयीताला लागताच त्याने तेथून देखील पलायन केले. मात्र त्याचा माग काढत काढत पोलिस पथकाने त्याला भुसावळ शहरातून अटक करण्यात यश मिळवले. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संशयितास ताब्यात घेण्याकामी डीवायएसपी गजानन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिलीप भागवत व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरिक्षक अनिल मोरे, सहायक पोलिस निरिक्षक संदिप परदेशी, सहायक फौजदार तस्लिम पठाण, पोलिस नाईक रविंद्र बि-हाडे, पो.ना. रमण सुरळकर, पो.ना.उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, पो.कॉ. श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. तुषार पाटील, पो.कॉ. इश्वर भालेराव व पो.कॉ. प्रशांत परदेशी यांनी परिश्रम घेतले. संशयितास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान संशयीताने गुन्हयात वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांना काढून दिला. पोलिस कोठडी संपल्यावर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here