जातीपातीच्या भिंती निकिताला नव्हत्या मान्य ; आईबापाने गळा दाबून तिचे जिवन केले अमान्य


जळगाव :  जातीपाती आणि धर्माच्या उंच भिंती प्रेमीयुगलांना मान्य नसतात. जातीपाती आणि धर्माच्या भिंती या मनुष्यप्राण्यांनी निर्माण केलेल्या आहेत. अदृश्य परमेश्वराच्या लेखी जगाच्या पाठीवरील प्रत्येक मनुष्यप्राणी हा समान आहे. त्याला जातपात व धर्माचा आधार नसतो. भिन्न जातीच्या प्रेमीयुगलांना या समाजाचा लग्नबंधनात अडकण्यासाठी नेहमीच विरोध होत असतो. परंतू आता काळ बदलला आहे. आधुनिक विचारसरणीचे लोक आपल्या मुलांच्या प्रेम विवाहाला मान्यता देत असल्याचे दिसून येत आहे. परंतू असे असले तरी ग्रामिण भागात लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या एकाच विचाराने प्रेम विवाहाला मान्यता देत नाही? यातून पळून जावून लग्न करणे, आत्महत्या करणे, खुन होणे असे प्रकार घडत असतात.
आपल्या अल्पवयीन मुलीचं आंतरजातीय प्रेम प्रकरण मान्य नसल्यामुळे आई-वडिलांनी तिचे दुसऱ्या एका मुलाशी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न ठरवले. याबाबतची माहिती त्या मुलीने तिच्या प्रियकराला दिली. त्याने न्यायालयात बालविवाह होत असल्याची तक्रार दिली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना न्यायालयाने हजर राहण्याची नोटीस बजावली. आता आपल्यावर कारवाई होईल व समाजात बदनामी होईल, याचा राग मुलीच्या आई वडीलांना आला. मुलगी झोपेत असतांना त्यांनी तिचे नाक, तोंड व गळा आवळून जीवे ठार मारल्याची धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच जळगाव जिल्हयात वरणगाव जवळ असलेल्या तळवेल या गावात घडली.
जळगाव जिल्हयातील वरणगाव शहरापासून काही अंतरावर तळवेल हे गाव आहे. जवळपास  १५ हजार लोकवस्तीच्या या समृद्ध-संपन्न गावात सुधाकर पाटील हे आपल्या कुटूंबासह रहात होते. हम दो हमारे दो असे त्यांचे चौकोनी कुटंब होते. सुधाकर पाटील यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य होते.
सुधाकर पाटील यांना एक अल्पवयीन मुलगी होती. तिचे नाव निकीता असे होते. निकीता सोळा वर्षाची असतांनाच ती गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. सोळाव्या वर्षीच आपल्य मुलीचे पाऊल वाकडे पडत असल्याची कुणकुण सुधाकर पाटील व नंदा पाटील या दांपत्याला लागली होती. त्यामुळे त्यांनी तिच्यावर त्यांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. असे असले तरी निकीता व गावातील बावीस वर्षाचा तिचा प्रियकर यांच्यातील प्रेमसंबंध कमी झाले नाही. ते दिवसेंदिवस वाढतच होते. दोघांचाही लग्नाचा निर्धार पक्का होता. या प्रकरणाची गावभर चर्चा झाल्याने तिचे वडील सुधाकर पाटील यांनी तिला शाळेतून काढून टाकले व घरीच बसवले. त्यामुळे ती नववीच्या पुढे  शिक्षण घेवू शकली नाही.
दिवसामागून दिवस जात होते. निकिता आणि तिच्या गावातील प्रियकराचे प्रेम दिवसेंदिवस फुलतच होते. दोघांच्या चोरुन लपुन गाठीभेटी सुरुच होत्या. तिला तिच्या आईवडीलांनी समजावून सांगीतले की तू त्या मुलाच्या नादी लागू नको. तुझे लग्न आम्ही समाजाच्या मुलासोबत लावून देवू. परंतू निकीता व तिचा प्रियकर दोघे आपल्या प्रेमावर ठाम होते. त्यामुळे त्यांनी निकीतावर दडपण आणणे सुरु केले. त्यांनी तिच्यावर दडपण आणून गावातील प्रतिष्ठीत लोक सोबत घेत वरणगाव पोलिस स्टेशन गाठले. त्या तरुणाविरुद्ध निकीताला छेडखानीचा गुन्हा दाखल करण्यास सर्वांनी भाग पाडले. वडील व गावातील लोकांच्या दडपणाला बळी पडून अल्पवयीन निकीताने तिच्या प्रियकराविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनला छेडखानीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे तिच्या प्रियकराला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. सहा महिन्यांची शिक्षा भोगून आल्यावर दोघांचे प्रेम प्रकरण पुर्वीपेक्षा जोमात सुरु झाले.
आता आपली मुलगी हाताबाहेर जाण्याच्या आत तिचे लग्न लवकरात लवकर लावून देणे योग्य राहील असा विचार तिचे पालक सुधाकर पाटील व नंदा पाटील यांनी केला. त्यांनी तिच्यासाठी वरसंशोधन मोहिम सुरु केली. वास्तविक ती अल्पवयीन होती. ती अठरा वर्षाची होण्यास अजून किमान सहा ते सात महिने बाकी होते. तरी देखील त्यांनी तिच्यासाठी एक स्थळ नक्की केले. आपल्या लग्नाचा घाट घातला जात असल्याचे बघून तिने हा प्रकार तिच्या प्रियकराच्या कानावर घातला. त्याच काळात कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नाची तयारी वेगात सुरू केली होती. तिच्यासाठी लग्नाची तारीक देखील त्यांनी नक्की केली.
प्रियकरासोबतच जाण्याचा ठाम निर्धार असलेल्या निकीताने या काळात कुटुंबीयांना वारंवार पळून जाण्याचे आणि त्यांनी ठरवलेले लग्न ऐनवेळी मोडण्याचे आव्हान देण्यास सुरुवात केली. तरीदेखील तिचे पालक तिच्या लग्नाची तयारी करतच होते.तिने हा सर्व प्रकार तिच्या प्रियकराच्या कानावर घालून काहीतरी मार्ग काढण्यास सांगीतले.
तिच्या प्रियकराने सरळ भुसावळला जावून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आपली प्रेयसी निकीताचे लग्न काही दिवसांवर येवून ठेपले असतांना त्याने न्यायालयात एक अर्ज दिला. आपल्या गावातील निकीता अल्पवयीन असतांना देखील तिचे लग्न होत असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. निकीताने त्याला दिलेला तिच्या वयाचा दाखला, शाळेचा दाखला, लग्नपत्रिका हे पुरावे त्याने न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सुधाकर पाटील व नंदा पाटील या दांपत्याला एक नोटीस पाठवली व न्यायालयात हजर होण्यास सांगीतले. लग्नाची तारीख जवळ आलेली असतांना न्यायालयाची मिळालेली नोटीस त्यातच आपल्या मुलीचे पळून जाण्याचे दिले जाणारे आव्हान पाटील दांपत्याला हैरान करुन सोडत होते.
अखेर निकीताच्या आयुष्यातील तो अखेरचा काळा दिवस आणि काळरात्र आली. 19 फेब्रुवारीच्या रात्री निकिता व तिचे आईवडील घरात झोपले. त्या रात्री सुधाकर पाटील व नंदा पाटील यांच्या मनात आपल्या मुलीविषयी चिड निर्माण झाली होती. समाजात मुलीमुळे बदनामीला तोंड द्यावे लागत असल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत होते. त्या रात्री निकीता झोपली ती कायमचीच. 19 फेब्रुवारीच्या रात्री पाटील दांमत्याने आपली  मुलगी निकीताचे नाक, तोंड व गळा दाबून तिचा श्वास कायमचा बंद केला. आज आपल्या जिवनातील ही रात्र काळरात्र ठरणार असल्याची तिला पुसटशी देखील कल्पना नव्हती. निकीताचा मृत्यु हा नैसर्गीक मृत्यू असल्याचे भासवण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यामुळे पुढील सर्वच संकटातून आपली मुक्तता होईल असे त्यांना वाटत होते. परंतू सत्य हे लपत नसते.
20 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. आपल्या मुलीचा झोपेतच मृत्यू झाला असल्याची पाटील दांपत्यांनी सुरु केली. याबाबत त्यांनी गावचे पोलिस पाटील ज्ञानदेव पाचपांडे यांना कळवले. पोलिस पाटील यांनी हा प्रकार वरणगाव पोलिसांना कळवला. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक संदिपकुमार बोरसे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची व मृतदेहाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. त्यात तिच्या गळ्यावर असलेले व्रण त्यांना संशयास्पद वाटले. तिच्या गळ्यावरील व्रण व शरीरावरील ओरबाडल्याच्या खुणा बघून हा मामला काहीतरी वेगळाच असल्याची शंका त्यांना आली. सुरुवातीला  या प्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मयत निकीताचा मृतदेह शव विच्छेदनासाठी जळगाव येथे सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला.
मृतदेहावर १२ ठिकाणी ओरबाडल्याच्या खुणा होत्या. हाताच्या पंजाला मुका मार व ओठाला जखम होती, त्यामुळे डॉ. हेंडवे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानुसार जळगाव जिल्हा रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार निकीताचा गळा दाबून खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या प्रकरणी गावात सुरु असलेली कुजबुज तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती पोलिसांनी संकलीत केली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणाच्या बदनामीमुळे आई-वडिलांनी निकीताची झोपेतच हत्या केली होती.
निकीताचा खून झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयित वडील सुधाकर मधुकर पाटील (वय ४६) व आई नंदाबाई सुधाकर पाटील (वय ४०, रा.तळवेल) यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३४, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ कलम ११ प्रमाणे गुन्हा वरणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने पुढील तपास सुरु केला.
पोलिस बंदोबस्तात मुलीचे अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर संशयीत सुधाकर पाटील व नंदाबाई पाटील या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
अल्पवयीन निकीताचे लग्न अवघे ८ दिवसांवर आले असताना ती वारंवार पळून जाण्याचे आव्हान त्यांना देत होती. तिने प्रियकरामार्फत न्यायालयाची नोटीस त्यांना पाठवली होती. त्यामुळे एकुणच पाटील दांपत्य तणावात होते. त्यातून संतापाच्या भरात त्यांच्या हातून हा प्रकार घडला. मुलीकडून पुन्हा पुन्हा प्रेमविवाह करण्याचे आव्हान दिले जात असल्याने त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यातून अतिशय शांत डोक्याने आई-वडिलांनी तिला संपवण्याचा निर्धार केला. सायंकाळी सोबत जेवण केल्यानंतर रात्रीच त्यांनी मुलीचा घरातील पलंगावर झोपेत असताना उशीने तोंड दाबून खून केला. पहाटे उठून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला.
वरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप बोरसे यांनी मुलीचे आई-वडील व प्रियकराच्या घेतलेल्या जबाबानुसार संबंधित मुलीसोबत गेल्या काही वर्षांपासून मुलाचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय विवाहाला त्यांचा विरोध असल्याची बाब उघड झाली. त्यातूनच आई-वडीलांनी पोटच्या मुलीचा गळा घोटला. दरम्यान, या घटनेने तळवेल परिसरातील समाजमन सुन्न झाले आहे. नातेवाईकही या अनपेक्षित प्रकाराने अचंबित झाले आहेत. आई-वडीलांनी एवढे टोकाचे पाऊल उचलायला नको होते, अशा भावना गावातून उमटल्या आहेत. या घटनेने मयत निकीताचा  एकुलता एक भाऊ मात्र उघड्यावर पडला. त्याचे आईबाप जेलमधे तर बहिण देवाघरी गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here