मास्तरच्या दुस-या पत्नीचा होता यार ; पिस्टलच्या गोळीत झाली कायमची गार

मास्तरच्या दुस-या पत्नीचा  होता  यार
पिस्टलच्या गोळीत झाली कायमची गार

नाशिक
: भटू सुखदेव डोंगरे हे मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.
शाळा मास्तर असलेले विवाहीत भटू डोंगरे यांचा शिक्षकी पेशा आणि गृहसंसार हे
दोन्ही घटक व्यवस्थित सुरु होते. शाळेच्या ठराविक साचेबद्ध वेळेत
विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केल्यानंतर आपल्या पारिवारीक जिवनात ते
मुबलक वेळ देवू शकत होते. एकंदरीत त्यांचे सर्व काही व्यवस्थित सुरु होते.
मनोज आणि योगेश ही दोन्ही मुले त्यांच्या संसार वेलीवर काळानुरुप मोठी होत
गेली.
कालांतराने त्यांना काय अवदसा आठवली कोण जाणे? पत्नीसोबत त्यांचे
खटके उडू लागले. संसार म्हटला म्हणजे भांड्याला भांडे लागतेच आणि वाद होतच
असतो असे जाणकार लोक नेहमी सांगतात. पती पत्नीचा वाद काही वेळाने, काही
दिवसांनी आपोआप मिटून जातो असे देखील म्हटले जाते. यालाच संसार असे म्हटले
जाते. परंतू शाळा मास्तर भटू डोंगरे आणि त्यांच्या पत्नीचा वाद लवकर
मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. दोन मुले असलेल्या भटू डोंगरे व त्यांची
पत्नी यांच्यावर लवकरच विभक्त होण्याची वेळ आली. मास्तर भटू डोंगरे यांची
पत्नी त्यांना सोडून माहेरी निघून गेली. त्यामुळे दोघा मुलांच्या जबाबदा-या
डोंगरे मास्तर एकटेच पार पाडू लागले.
घरात वाद झाल्यामुळे त्यांची
पत्नी त्यांना व मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे ते
जणूकाही एकाकी पडले होते. डोंगरे मास्तरांचा दिवस शाळेतील मुलांना
शिकवण्यात सहज निघून जात होता. मात्र बिछान्यावर रात्र त्यांना खायला उठत
असे. रात्रभर ते बिछान्यावर तळमळत असत. रात्री बिछान्यावर ते एकटेच एका
कुशीवरून दुस-या कुशीवर झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. 
दरम्यानच्या
काळात त्यांच्या जिवनात एक परस्त्री आली. ज्योती असे तिचे नाव होते.
ज्योती परळी वैजनाथ भागातील मुळ रहिवासी असली तरी ती नाशिक येथे रहात होती.
ज्योती व डोंगरे मास्तर हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले व लवकरच त्यांचे
एकमेकांवर प्रेम देखील जडले. दोघे एकमेकांना नियमीत भेटू लागले. गेल्या
कित्येक महिन्यापासून मास्तर एकटेच होते. त्यांना रात्र खायला उठत असे.
त्यांना पत्नीरुपी स्त्रीची नैसर्गीक व सक्त गरज होती. ती गरज त्यांनी
ज्योतीच्या रुपात पुर्ण होण्याची मनोमन अपेक्षा केली. त्यांनी ज्योतीजवळ
लग्नाचा विषय काढला. ज्योतीने मास्तरसोबत लग्नाला विचार करत होकार दिला.
शाळा मास्तर भटू डोंगरे यांना नियमीत रग्गड पगार असल्यामुळे आपल्या सर्व
गरजा पुर्ण होतील असा व्यावहारीक विचार तिने मनाशी केला होता. तिने या
कालावधीत मास्तरांच्या स्वभावाचा अभ्यास देखील चांगल्या प्रकारे केला होता.
त्यामुळे तिला पतीच्या रुपात मास्तर भटू डोंगरे योग्य असल्याचे  जाणवले.
त्यामुळे ती डोंगरे मास्तरांसोबत लग्न करण्यास एका पायावर तयार झाली. अखेर
मास्तरांनी दुसरे लग्न केले. सन 2005 मधे मास्तर दुस-यांदा बोहल्यावर चढले.
दुस-या संसारात सुरुवातीचे काही दिवस भटू डोंगरे मास्तरांना चांगले गेले.
आपल्या
पतीने अर्थात भटू मास्तरांनी दुसरा घरोबा केल्याचे समजताच त्यांची पहिली
पत्नी नरमली. तिने पुन्हा मास्तरांकडे येण्याची इच्छा व्यक्त केली. तुमचे
दुसरे लग्न झाले असले तरी देखील मी तुमच्यासोबत गुण्यागोविंदाने नांदण्यास
तयार असल्याचे तिने मास्तरांना सांगितले.
त्यामुळे मास्तरांनी मालेगाव
येथील संकल्प नगर भागातील घरात पहीली पत्नी व दोघा मुलांना ठेवण्याचा
निर्णय घेतला. तसेच मालेगाव शहरातील संविधान नगर भागातील घरात ते
ज्योतीसोबत राहू लागले. अशा प्रकारे दोघा बायकांना मास्तरांनी वेगवेगळे
ठेवले, जेणेकरुन वाद नको. लग्नानंतर ज्योतीपासून मास्तरांना दोन मुली
झाल्या. अशा प्रकारे पहिल्या पत्नीपासून दोन मुले व दुसरी पत्नी
ज्योतीपासून दोन मुली अशा चार अपत्यांचे मास्तर पिता बनले.
कॅंलेंडरच्या
तारखा काळानुसार बदलत होत्या. ज्योतीपासून झालेल्या दोन्ही मुली मोठ्या
होत गेल्या. पहिल्या पत्नीपासून झालेले दोन्ही मुले देखील मोठे झाले होते.
मोठा मुलगा मनोज हा एका खासगी पॅथॉलॉजीमधे नोकरी करु लागला. कालांतराने
ज्योतीने मास्तरांच्या स्वभावाला चांगल्या प्रकारे ओळखून घेतले होते.
मास्तरांचा दांडगा पगार व त्यांच्या बॅंकेतील खात्यावरील शिल्लक रकमेची
टिपणी तिच्या पारखी नजरेने हेरली होती. मास्तर शाळेत गेले म्हणजे घरात
ज्योती एकटीच रहात होती.
काही वर्षांनी सन 2015 – 16  च्या दरम्यान
मास्तरांनी त्यांच्या संविधान नगर मधील घराच्या वरच्या मजल्यावर भाडेकरी
ठेवण्याचे निश्चीत केले. दिल्ली येथील दिपक तुलसीदास पाल उर्फ बाबा हा
द्राक्ष व डाळींबाचा व्यापारी तेथे राहण्यास आला. त्याला मास्तरांनी
घराच्या वरच्या मजल्यावरील खोली भाड्याने दिली. दिपक पाल हा दिल्ली येथे
त्याचा द्राक्ष व डाळींबाचा माल रवाना करत असे. तो गुन्हेगारी वृत्तीचा
होता. त्याने दिल्लीत काही गुन्हे केले असल्याचे सांगण्यात येते.
भटू
डोंगरे मास्तर दिवसभर शाळेत नोकरी करण्यासाठी गेले म्हणजे घरी ज्योती एकटीच
रहात असे. दरम्यान तिचे व वरच्या मजल्यावरील भाडेकरी दिपक पाल उर्फ बाबा
सोबत नजरेचा खेळ सुरु झाला. तसे बघता मास्तरांची दुसरी पत्नी ज्योती हिचे
लक्षण काही ठिक दिसत नव्हते. ती मास्तरांना खेळवत होती. मास्तरांच्या
गैरहजेरीत तिचा व  भाडेकरी दिपक  बाबाच्या नजरेचा खेळ सुरु झाला होता. तसे
तिचे इतरही अनेक लोकांसोबत ओळखी वाढल्या होत्या. त्या ओळखीच्या माध्यमातून
चतुराई वापरुन ती लोकांकडून खो-याने पैसे ओढत होती. त्यापैकी दिपक पाल उर्फ
बाबा हा एक होता. तिचे बाबा सोबत शारिरीक संबंध असल्याचे बोलले जात होते.
बाब तिला आर्थिक मदत करत होता असे देखील बोलले जात होते. त्यामुळे केवळ
पैसा हा व्यावहारीक दृष्टीकोन ठेवत तिने बाबासोबत सलगी वाढवली होती. इकडे
मास्तर आपला शाळेत जावून विद्यादानाचे काम करत होता. त्याच्या गैरहजेरीत ती
बाबा व  त्याच्या सारख्या धन्नाशेठ लोकांसोबत आपले गुल खिलवत होती.
एके
दिवशी  द्राक्ष व डाळींब व्यापारी दिपक पाल याला काही कामानिमीत्त
त्याच्या गावी दिल्लीला जाण्याचा योग आला. त्याने ज्योतीला देखील आपल्या
सोबत घेवून जाण्याचे नियोजन केले.  धन्नाशेठ असलेल्या दिपक बाबा सोबत मौज
मजा करण्यासाठी आणि गुलछर्रे उडवण्यासाठी ती देखील दिल्लीला त्याच्यासमवेत
गेली. ती  आता मास्तरचे अजिबात ऐकत नव्हती. ति तिला जसे आवडेल तसे जिवन जगत
होती. ती तिचे स्वच्छंदी जिवन जगत होती. तिच्या हातात लक्ष्मी खेळत होती.
तिच्या आयुष्यात मास्तर व दिपक सारखे अनेक धन्नाशेठ आले होते. त्यांच्या
माध्यमातून ती आपली तिजोरी भरत होती. तिचे चारित्र्य साफ नव्हतेच.
दिल्लीत
बाबा सोबत राहतांना तिला नशापाणी करण्याची सवय जडली. ती दिपक बाबा सोबत
मद्यपान करु लागली. तिला मद्याच्या आहारी जाण्याची सवय जडली होती. तिने फळ
व्यापारी दिपक पाल सोबत चांगली मौजमजा केली. दरम्यान एके दिवशी दिपक बाबाचा
अपघात झाला. त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्यामुळे तो त्याच्या
वैद्यकीय उपचारामधे गर्क झाला. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देण्यास दिपक पाल
उर्फ बाबाला वेळ मिळत नव्हता. ती दिल्लीला एकाकी पडली होती. त्यामुळे ती
एकटीच पुन्हा मालेगाव येथे आपल्या घरी निघून आली.
आल्यावर आता डोंगरे
गुरुजी देखील तिच्याकडे पुर्वीसारखे लक्ष देत नव्हते. ते आपले शाळेत निघून
जात होते. वेळ मिळाल्यास ते आपल्या पहिल्या पत्नीला भेटण्यास जात होते.
त्यामुळे आता मास्तरांचा तिच्यात पहिल्यासारखा रस राहिला नव्हता. त्यांचे
वय देखील झाले होते. मात्र ती दिवसेंदिवस उथळ पाण्याप्रमाणे खळखळ करत होती.

आता तीच्याकडे लक्ष देण्यास मास्तरांना व दिपक बाबा या फळ व्यापारी
देखील रहात नव्हता. त्यामुळे ती एकटी पडली होती. वेळ घालवण्यासाठी ती
तिच्या ओळखीच्या माध्यमातून एका मसाज पॉर्लर मधे जॉब करु लागली. या मसाज
पॉर्लरमधील जॉबच्या माध्यमातून तिचा अनेक पुरुषांसोबत संपर्क मोठ्या
प्रमाणात वाढला. तिच्या मोबाईल कॉल लिस्ट मधे कित्येक धन्नाशेठ वाढू लागले.
त्यामुळे पुन्हा तिच्या हातात पैसा खेळू लागला. तिने लेदर करन्सी
जमवल्याचे लोक बोलू लागले. एकंदरीत तिने ब-यापैकी द्रव्यसाठा केला. आता तर
ती मास्तरांच्या गैरहजेरीत घराला अड्डाच बनवला होता. तिला भेटण्यासाठी अनेक
लक्ष्मीपुत्र येवू लागले. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय होवू लागला. ती
मास्तरांना अजिबात जुमानत नव्हती. आता प्रसंग व गरजेनुसार तिने विविध मसाज
पॉर्लर बदलले. विविध मसाज पॉर्लरमधील ग्राहक ती आपल्याकडे खासगीरित्या ओढून
आणू लागली. या माध्यमातून तिची नाशिक शहरात चांगली ओळख निर्माण झाली होती.
अनेक मालदार लोक तिच्याकडे येत होते. तिचा एक पाय नाशिकला तर दुसरा पाय
मालेगाव येथे डोंगरे गुरुजींच्या घरी राहू लागला. जमवलेले काही पैसे तिने
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या नावावर ठेवले. 
डोंगरे मास्तर व दिपक
पाल बाबा यांच्या व्यतिरिक्त मसाज पॉर्लरच्या माध्यमातून आपल्याकडे वळवलेले
खासगी ग्राहक ती घरी बोलावत होती. त्यांच्यासोबत ती मद्यपान देखील करत
होती. तिला मद्यपान व तंबाखूचे व्यसन लागले होते. ती आता पुर्णपणे
पोर्फेशनल झाली होती. मास्तर व दिपक पाल सारखे अनेक मालदार लोक तिच्या
संपर्कात रहात होते.
आता तीला केवळ आणि केवळ पैशांची भाषा समजत होती.
तिने पतीरुपी भटू मास्तरला त्रास देण्याचे काम सुरु केले. मास्तरांकडून
वेळोवेळी पैसे उकळण्याचे काम तिने सुरु केले होते.  तिचे भटू  मास्तरांना
म्हणणे होते की मी तुमची दुसरी का असेना परंतु पत्नी आहे. तुमच्यापासून मला
दोन मुली झाल्या आहेत. तुम्ही तुमच्या पहिल्या पत्नीच्या मुलांचे
लग्नकार्य पार पाडता मग माझ्या मुलींचे कोण बघेल? मला नाही तर आपल्या
मुलींच्या नावाने मोठी रक्कम बॅंकेत ठेवा नाहीतर मुलींच्या नावाने मला
नाशीकला फ्लॅट घेवून द्या. मी व माझ्या मुली आम्ही नाशिकला राहू. परंतू आता
मास्तर त्यांच्या पहिल्या पत्नी व तिच्यापासून झालेल्या दोघा मुलांची
देखील काळजी घेत होते. त्यामुळे त्यांना आता दुसरी पत्नी ज्योतीपेक्षा
आपल्या पहिल्या पत्नीसह तिच्या मुलांची काळजी होती.
परंतू त्यांची
दुसरी पत्नी ज्योती त्यांना वारंवार पैसे मागून त्रास देत होती. त्यामुळे
मास्तर आता सदैव चिंतेत राहू लागले. त्यांना मानसिक ताणतणाव सुरु झाला
होता. तो ताण त्यांना ज्योतीपासून होता. भटू मास्तरांना सेवानिवृत्त
होण्यास अजुन काही वर्ष बाकी असले तरी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांचा
पगार चांगला लठ्ठ झाला असल्याचे ज्योतीला चांगल्याप्रकारे माहित होते.
त्यामुळे तिची काकदृष्टी मास्तरांच्या पैशांवर खिळून बसली होती. त्यामुळे
ती सारखी सारखी मास्तरांना नाशिक शहरात मुलींच्या नावाने फ्लॅट घेण्यासाठी
तगादा लावत होती.
ज्योतीला भेटायला येणारे तिचे ग्राहक आणि तिचे फळ
व्यापारी बाबासोबत असलेले संबंध लक्षात घेता ते मास्तरांना अजिबात आवडत
नव्हते. त्यातून दोघात सारखे सारखे वाद होत असत. अखेर जेरीस येवून भटू
मास्तर नाशिकला एका बिल्डरकडे फ्लॅटच्या किमतीचा अंदाज घेण्यासाठी गेले.
बांधकाम क्षेत्रातील फ्लॅटच्या किमतींचा अंदाज घेतला असता ते फ्लॅट जवळपास
25 ते 30 लाखांच्या घरात होते. ते बाजारभाव मास्तरांना खुप जास्त वाटले.
कारण त्यांना पहिल्या पत्नीची देखभाल व तिच्यापासून झालेल्या दोन्ही
मुलांची देखील काळजी घ्यायची होती. आता भटू मास्तरांनी व्यावहारीक विचार
सुरु केला. दुसरी पत्नी ज्योतीला फ्लॅट घेवून दिला तरी ती आपल्याजवळ
राहण्यास तयार नाही. फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर ती तिकडेच राहण्यासाठी
जाण्याचे म्हणत होती. ती त्या फ्लॅटमधे व्यापारी दिपक पाल उर्फ बाबासोबत
राहील आणि दोघे तेथे मजा मारतील हे मास्तरांना समजले होते. त्यामुळे तिचा
आपल्याला तसा काहीच फायदा होणार नाही हे मास्तरांनी ओळखले होते. तसेच आता
सद्यस्थितीत ती आपल्या घरी तिचे मसाज पॉर्लरच्या माध्यमातून निर्माण झालेले
ग्राहक निर्लज्जपणे बोलावत होती. ती आपले म्हणणे अजिबात ऐकून घेत नाही
याची मास्तरांना चिड येत होती.
मास्तर आपल्याला लवकर फ्लॅट घेवून देत
नसल्याचे बघून ज्योतीने आता दिपक पाल उर्फ बाबा याची भिती घालण्यास सुरुवात
केली. दिल्ली येथे राहणारा बाबा गुन्हेगारी  वृत्तीचा आहे. त्याने काही
लोकांचे खून केले आहे. त्याला सांगीतले तर तो तुमचा देखील खून करु शकतो.
खून करणे त्याला किरकोळ गोष्ट आहे. त्यामुळे ब-या बोलाने तुम्ही मला नाशिक
शहरात फ्लॅट घेवून द्या असा तगादा ती भटू मास्तरांकडे लावू लागली.
ज्योतीच्या
अशा वागण्यामुळे आता भटू मास्तरांना वेड लागण्याची वेळ आली होती. या सर्व
त्रासातून सुटका होण्यासाठी त्यांनी हा प्रकार पहिली पत्नी व मोठा मुलगा
मनोज यांच्या कानावर टाकला. आता या बाईचे काहीतरी करा हो नाहीतर मी पागल
होवून जाईन अशी आर्त विनवणी मास्तरांनी पहिल्या पत्नीसह मुलांकडे केली.
आपली सावत्र आई ज्योती कोणत्या थराची आहे हे मनोज ओळखून होता. त्याला
सावत्र आई ज्योतीचे सर्व कारनामे चांगल्या प्रकारे माहित होते. 
आपल्या
बापाची अर्थात भटू मास्तरांची व्यथा मनोजने ओळखली. आता पाणी डोक्यावरुन
जात असल्याचे मास्तरांचा मुलगा मनोज डोंगरे याने ओळखले. मनोज हा एका खासगी
पॅथॉलॉजी मधे नोकरी करत होता. आता ज्योतीला या जगातून कायमचे हद्दपार करणेच
योग्य राहील असे मनोज याने मनाशी निश्चीत केले होते. तिला या जगातून बाद
केले नाही तर ती आपल्या बापाला अर्थात मास्तरांना ठार करु शकते हे मनोजने
समजून घेतले होते.
मनोज याने हा प्रकार त्याचा मित्र रविंद्र दादाजी
अहिरे व जितेंद्र राजपूत यांच्या कानावर घातला. मनोज या दोघा मित्रांना
म्हणाला की मला तुमच्या मदतीने माझी सावत्र आई ज्योतीचा खुन करायचा आहे.
तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा. तिला जर मारले नाही तर ती आम्हाला मारुन
टाकेन. तिने आम्हा सर्वांना मारण्याची सुपारी दिली आहे. तुम्ही काहीतरी
करा.
त्यावर मनोजच्या दोघा मित्रांनी अर्थात रविंद्र अहिरे व जितेंद्र
राजपुत यांनी त्याला सांगितले की तिचा खून होवू शकतो मात्र त्यासाठी
आम्हाला रिव्हाल्व्हर लागेल. चाकूच्या सहाय्याने आपण खून करु शकत नाही.
रिव्हॉल्वरची व्यवस्था होत असेल तर तुझ्या सावत्र आईचा खून होण्यास काही
अडचण नाही असे दोघांनी स्पष्ट केले.  या विषयावर झालेल्या तिघांच्या चर्चेत
रविंद्रने  मनोजला सांगितले की माझ्या भाच्याचा सागर रंगारी नावाचा एक
मित्र आहे. त्याचे धुळे व मध्य प्रदेश सिमेवरील बलवाडी, उमर्टी, वाकला आदी
गावात ओळख आहे. त्याठिकाणी रिव्हॉल्व्हर व गोळ्या विकत मिळतात. तो तुम्हाला
तेथून रिव्हॉल्व्हर  व गोळ्या आणून देईन. त्याला त्याकामाचे पैसे द्यावे
लागतील. त्यावर मनोजने सहमती दर्शवत रविंद्रला म्हटले की त्याला जे काही
पैसे लागतील ते मी देण्यास तयार आहे. मनोजची सहमती बघून रविंद्रने सागर
रंगारीसोबत संपर्क साधला. रविंद्रने सागरला सांगीतले की माझा एक मित्र आहे.
त्याच्या सावत्र आईला मारण्यासाठी रिव्हॉल्व्हर व गोळ्या लागणार आहे.
त्याकामाचे पैसे तो देण्यास तयार आहे. तुझे नाव कुठेही येणार नाही याची
काळजी घेतली जाईल.
ठरल्याप्रमाणे मनोजने सागर यास अग्रिम रक्कम म्हणून
पाच हजार रुपये दिले. त्या अग्रिम रकमेत सागरने त्याचा मित्र रविंद्र पावरा
व संजय पावरा यांच्या मदतीने एक गावठी रिव्हॉल्व्हर आणि एक गोळी आणून
जितेंद्र राजपूत याच्या ताब्यात दिली. एका निर्जन मळ्यात मनोज व जितेंद्र
गेले. त्याठीकाणी जितेंद्रने प्रात्यक्षिक म्हणून एक गोळी हवेत फायर करुन
पाहीली. ते प्रात्यक्षिक यशस्वी झाले. त्यामुळे रिव्हॉल्व्हरच्या अजुन
गोळ्या मागवून घेण्यास मनोजला सांगण्यात आले. मनोजने सागर यास उर्वरित 25
हजार रुपये देत अजुन नऊ गोळ्या मागवून घेतल्या.
आता खूनाचे मुख्य आणि
मुद्द्याचे काम कसे करायचे हा प्रश्न मनोज डोंगरे याने जितेंद्र राजपुत यास
केला. त्यावर जितेंद्रने मनोज यास सांगितले की माझा एक मित्र आहे. त्याचे
नाव पका उर्फ प्रकाश निकम आहे. तो आणि मी असे दोघे जण हे काम करणार आहे.
त्यासाठी आम्हाला तिन लाख रुपये द्यावे लागतील. त्यावर मनोजने जितेंद्र
राजपूत यास सांगीतले की मी तिन लाख रुपये देण्यास तयार आहे. माझे काम तेवढे
झाले पाहिजे. मात्र माझे नाव कुठेही समोर येणार नाही याची काळजी घ्या.
त्यावर जितेंद्रने  त्याला सांगितले की तु काहीही काळजी करु नको . तिन लाख
रुपयांची व्यवस्था तेवढी कर, बाकी पुढचे आम्ही बघू.
15 जानेवारी रोजी
जितेंद्र राजपुत व पका उर्फ प्रकाश निकम यांची अंतिम चर्चा व घटनास्थळाची
रेकी झाली. 16 जानेवारी रोजी जितेंद्र राजपूत व प्रकाश निकम यांनी ज्योती
डोंगरे हिला ठार करण्याचे नियोजन केले. जितेंद्र राजपुत याने मनोज डोंगरे
यास संपर्क साधत सांगितले की उद्या 16 जानेवारी रोजी आम्हाला कामगिरी
करायची आहे. त्यासाठी उद्या संविधान नगरातील घरात केवळ तुझी सावत्र आई
ज्योती एकटीच घरात असायला हवी. तिच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही सदस्य घरात
असता कामा नये. त्यानुसार तु नियोजन करुन ठेव.
16 जानेवारी रोजी दुपारी
दिड वाजेच्या सुमारास मनोजने खात्री करण्यासाठी त्याच्या वडीलांना, भटू
मास्तरांना  फोन करुन विचारले की तुम्ही आता कुठे आहात? त्यावर त्यांनी
मनोज यास सांगीतले की मी आता बॅंकेत आहे. त्यावर त्याने वडीलांना सांगितले
की बॅंकेत मी तुम्हाला घेण्यास येणार आहे. तुम्ही एकटे घरी जावू नका. मी
तुम्हाला माझ्यासोबत घरी घेवून जाईन. अशा प्रकारे त्याने वडील बॅंकेत
असल्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर त्याने त्याची सावत्र आई, ज्योतीला
फोन करुन विचारले की वडील कुठे आहेत? त्यावर तिने सांगितले की ते बॅंकेत
गेले आहेत व घरी मी एकटीच आहे. अशा प्रकारे ज्योती घरात एकटीच असल्याची
पक्की खात्री झाल्यानंतर सर्व नियोजन पक्के झाले. त्याने जितेंद्र राजपुत
यास निरोप दिला. त्यानुसार जितेंद्र राजपुत व पका उर्फ प्रकाश निकम पुढील
मुख्य कामाला लागले.
 16 जानेवारी रोजी जितेंद्र राजपूत व पका ऊर्फ
प्रकाश निकम असे दोघे स्कॉर्पिओ या वाहनाने ज्योती डोंगरे रहात असलेल्या
मालेगाव शहरातील भायगाव शिवारात असलेल्या संविधान नगर परिसरात
रिव्हॉल्व्हरसह गेले. जितेंद्र राजपुत हा वाहन चालवत होता. त्याठिकाणी
दोघांनी पुन्हा एकवेळ रेकी केली. जितेंद्र राजपुत याने पका यास लांबूनच
ज्योती रहात असलेले घर दाखवले व सर्व नियोजन समजावून सांगितले.
त्यानुसार
जितेंद्र राजपुत याने त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ वाहन काही अंतरावर
असलेल्या शाळेजवळ लांब उभे केले व काम फत्ते होताच पळून जाण्यास सज्ज
ठेवले. त्याठिकाणी पका गाडीच्या खाली उतरला. ज्योती रहात असलेल्या घराजवळ
पका गेला. त्याने आवाज देवून तिला घराबाहेर बोलावले. ती गेट उघडण्यासाठी
बाहेर येताच पका उर्फ प्रकाश याने तिच्या दिशेने फायर केले. पहिली गोळी
तिच्या दंडाला लागली. लागलीच त्याने दुसरी गोळी तिच्या दिशेने झाडली. ती
गोळी तिच्या छातीला लागली. तिसरी गोळी मात्र खाली पडली. दोन गोळया
लागल्याने ज्योती जमीनीवर कोसळली. ति खाली कोसळताच हातातील रिव्हॉल्व्हरसह
पका तेथून जवळच असलेल्या शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन पळत सुटला.  सुसाट
वेगाने पळत येवून त्याने जितेंद्र राजपुत बसलेले स्कॉर्पिओ वाहन गाठले. पका
वाहनात बसताच जितेंद्रने वाहन पळवले. या सिनेस्टाईल फायर नंतर दोघांनी
तेथून पलायन केले. गिरणा धरणाजवळ जितेंद्रने पकाला सोडून दिले. त्यानंतर
मनोजचा जितेंद्रला फोन आला. “मिशन फायर” फत्ते झाल्याचा निरोप जितेंद्रने
मनोज यास दिला.
या दरम्यान घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमली. त्या वेळी
मनोज व त्याचे वडील त्याठिकाणी हजर झाले. आपल्याला जणू काहीच माहितच नाही
अशा अविर्भावात मनोज व जितेंद्र गर्दीत पुन्हा येवून मिसळले. गर्दीत
त्यांनी मृतदेह उचलून शव वाहिकेत ठेवण्यासाठी मदत केली.
दि. 16 जानेवारी
रोजी दुपारी तिन वाजेच्या सुमारास ज्योती डोंगरे या महिलेचा गोळ्या झाडून
खून झाल्याची घटना शहर व परिसरात वा-यासारखी पसरली. या घटनेची माहिती
मिळताच नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह व अपर पोलीस
अधीक्षक संदीप घुगे यांनी तात्काळ दखल घेतली.
स्थानिक गुन्हे शाखेचे
वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील व त्यांच्या पथकास घटनास्थळावर पाचारण
करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.के.पाटील
यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गु.र.न.10/20 भा.द.वि.302 सह आर्म
अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस प्रशासनासह
सर्वांच्या दृष्टीने मयताची ओळख पटलेली होती. असे असले तरी या गुन्ह्यातील
मारेकरी अज्ञात होते. या हत्येचे कारण देखील सर्वांच्या दृष्टीने अनाकलनीय
होते. नाशिक ग्रामिण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी या
गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी समांतर तपासकामी स्थानिक
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना तपासाची सुत्रे
सोपवली.
खब-यांसह मयताचे इतर नातेवाईक, मित्रमंडळींबाबत गोपनीय
पद्धतीने माहिती संकलीत करण्यात आली. सुरुवातीला कोणतीही उपयुक्त माहिती
मिळत नव्हती. हा  खुन अनैतिक संबंध किंवा कौटुंबिक वादाच्या कारणावरून होवु
शकतो अशा संशय स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील व
त्यांच्या सहका-यांना बळावला. त्यादृष्टीने तपासाची चक्रे वेगाने
फिरवण्यात आली.
मयतासह तिचे जवळचे नातेवाईकांचे कॉल डिटेल्स मागवण्यात
आले. या कॉल डिटेल्स प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी
डोळ्यात तेल घालून अहोरात्र मेहनत घेतली. त्यात त्यांना चांगले यश आले.
त्यानुसार मयत ज्योतीचा सावत्र मुलगा मनोज याच्यावर संशयाची सुई फिरु
लागली. त्याला संशयीत म्हणून सुरुवातीला चौकशीकामी बोलावण्यात आले. त्याला
विश्वासात घेवून विचारपुस करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार
त्याच्या मयत आईचे, ज्योती डोंगरे हिचे दिपक पाल उर्फ बाबा याच्यासोबत
अनैतिक संबंध असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानेच हा खून घडवून
आणला असावा असा संशय मनोज याने  पोलिसांजवळ व्यक्त केला.
त्याने
दिलेल्या माहितीनुसार खात्री करण्यासाठी दिपक पाल उर्फ बाबा याला चौकशीकामी
बोलावण्यात आले. मात्र त्याचा या गुन्ह्यात कुठेही संबंध नसल्याचे तपासात
आढळून आले. घटनेच्या दिवशी त्याचे लोकेशन नाशिक येथे असल्याचे दिसून येत
होते. त्याची सखोल चौकशी केली असता त्याचा या घटनेत संबंध नसल्याचे आढळून
आले.त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले. अशा प्रकारे मनोज याने दिलेल्या
माहितीत तथ्य नसल्याचे दिसून आले. एकंदरीत मनोज काहीतरी लपवत असल्याचे
वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुन्हा
मनोज यास चौकशीकामी बोलावले. वेळ प्रसंगी त्याला विविध युक्त्या वापरुन
बोलते करण्यात आले. त्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील व त्यांच्या
सहका-यांना यश आले.
मनोज डोंगरे याने दिलेल्या माहितीनुसार त्याची मयत
सावत्र आई ज्योती भटू डोंगरे हिचे पर पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते. ते
संबंध तिचे पती भटू डोंगरे व सावत्र मुलगा मनोज यांना माहित होते. वारंवार
समजावुन देखील तिच्या वागण्यात कुठलाही फरक पडत नव्हता. तिच्यामुळे डोंगरे
परिवाराची समाजात व मित्र परिवारात बदनामी सुरु झाली होती. मयत ज्योती
डोंगरे हिचा तिचे पती व मनोजचे वडील भटू डोंगरे यांच्या पगाराच्या पैशावर व
त्यांनी साठवुन ठेवलेल्या मालमत्तेवर नजर होती. त्या पैशातुन ती नाशिक
येथे फ्लॅट घेण्यासाठी अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांची मागणीवजा तगादा लावत
होती. तिच्यामुळे घरात वाद सुरु होते. तिच्यामुळे शिक्षक भटू डोंगरे यांचे
मानसिक संतुलन पार बिघडून गेले होते. त्यांनी याबाबत मुलगा मनोज यास
काहीतरी मार्ग काढण्यास सांगितले होते.
त्यानुसार मनोजने त्याचा मित्र जितेंद्र राजपुत व प्रकाश उर्फ पका निकम व इतरांच्या मदतीने हा खून घडवून आणला.
मनोज
डोंगरे याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तपासात सागर अनिल रंगारी यास
मालेगाव शहरातुन ताब्यात घेत गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस करण्यात आली.
सागरने सांगितले की, मी रविंद्र अहिरे उर्फ मामा याच्या सांगण्यावरून मनोज
डोंगरे याच्यासाठी माझे मित्र रवि पावरा व संजय पावरा यांचेकडून त्याला एक
गावठी पिस्टल आणुन दिले होते. त्यासाठी त्यांच्याकडुन पैसे घेतले होते.
त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली
असलेल्या पथकाने रवि रमेश पावरा यास धुळे येथुन व संजय सरदार पावरा यास
आंबे ता. शिरपुर जि. धुळे येथुन ताब्यात घेतले. त्यांना सदर गुन्हयासंबंधी
हकीगत कथन केली. त्यांनी आपल्या गुन्हा कबुली दिली.
अशा प्रकारे मनोज
डोंगरे याने त्याचा मित्र रविंद्र आहिरे याच्या सांगण्यावरून सागर रंगारी,
रवि पावरा, संजय पावरा यांच्याकडून रिव्हॉल्व्हर (गावठी कट्टा)घेतले. ते
रिव्हॉल्व्हर त्याने जितु राजपुत व पका उर्फ प्रकाश निकम यांना
गुन्ह्याकामी दिले.
अशा प्रकारे मनोज भटु डोंगरे (वय २८ वर्ष रा.
संकल्प नगर भायगाव शिवार मालेगाव), प्रकाश भिला निकम उर्फ पका (वय ३४ वर्ष
रा. साने गुरुजी नगर मालेगाव), जितेंद्र बाबुराव कास उर्फ जितु राजपुत (वय
४० वर्ष रा. मुक्ताई कॉलनी भायगाव मालेगाव), रविंद्र दादाजी आहिरे (वय २७
वर्ष रा. इंदिरानगर चंदनपुरी ता. मालेगाव), रवि रमेश पावरा (वय ३० वर्ष रा.
पंचरंगा कॉलनी धुळे), संजय सरदार पावरा (वय ४० वर्ष रा. आंबे ता. शिरपुर
जि. धुळे), सागर अनिल रंगारी (वय २७ वर्ष रा. मोतीबाग नाका तुलसाई नगर
मालेगाव) अशांना क्रमाक्रमाने ताब्यात घेण्यात आले व अटक करण्यात आली.
त्यांना
न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सुरुवातील पोलिस कोठडी
सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. स्थानिक
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के. पाटील व त्यांच्या सहकारी
अधिकारी व कर्मचारी वर्गाने अत्यंत चिकाटी व कौशल्याने हा खूनाचा गुन्हा
उघडकीस आणला.  या गुन्हयात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग व अप्पर पोलीस
अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक के.के.पाटील, स.पो.नि. सागर शिंपी, सपोनि संदीप दुनगहु,
सहायक फौजदार सुनिल अहिरे, पोलिस हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले,
पो.ना.राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, हरीष आव्हाड, पो.कॉ.
रतिलाल वाघ, फिरोज पठाण, प्रदिप बहिरम, संदीप लगड यांच्या पथकाने सदर
खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील तपस वडनेर खाकुर्डी पोलिस
करत आहेत.


 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here