महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास

जळगाव : धावत्या मोटारसायकलवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पळ काढल्याचा प्रकार आज दुपारी घडला. जळगाव औरंगाबाद महामार्गावरील अहिंसा तिर्थ गो शाळेजवळ दुपारी हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने दुचाकीवरील दाम्पत्य काही क्षण भांबावले. धुम स्टाईल सोनसाखळी चोरांनी पुन्हा आपले कारनामे सुरु केल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.

प्रफुल्ल चोपडा व त्यांची पत्नी सरोज चोपडा हे दाम्पत्य नातेवाईकांच्या बाराव्याच्या कार्यक्रमाला जळगाव येथून जामनेर येथे दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावला येतांना वाटेत गो शाळेनजीक त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोघे जण आले. मोटारसायकलवर मागे बसलेल्या तरुणाने सरोज चोपडा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका देत तोडून नेली. 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन एका क्षणात धुम स्टाईल चोरट्यांनी ओढून नेतांना चोपडा दाम्पत्याने आरडाओरड केली. मात्र मदतीला कुणीच नसल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. दोघे चोरटे जळगावच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले.

या प्रकरणी सरोज चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी भेट दिली. पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासह स.पो.नि. अमोल मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here