नंदुरबारकर सराफ दुकानातील चोरीचा उलगडा

जळगाव : जळगाव येथील नंदुरबारकर ज्वेलर्स या दुकानातील दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने या तपासात आघाडी घेत तपास लावला. स्थानिक गुन्हेगारासह दोघा परप्रांतीय गुन्हेगारांनी या दुकानातील सोने चांदीचे दागिने चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

30 ऑक्टोबर 2021 च्या रात्री जळगाव शहरातील नंदुरबारकर ज्वेलर्स या सराफी दुकानातून 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागीने चोरीला गेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते.

हे.कॉ. संजय हिवरकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा सुगावा लागला. याबाबत त्यांनी पो.नि. किरणकुमार बकाले यांना माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार रवि पंढरीनाथ नरवाडे, पोहेकॉ. संजय हिवरकर, पोहेकॉ. राजेश बाबाराव मेंढे, पोना. संतोष रामास्वामी मायकल, चालक मुरलीधर बारी यांचे एक पथक मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्याच्या सतवास या गावी रवाना झाले. तेथून संशयीत भारतसिंग आयासिंग भाटीया (19) रा. यात्रा मैदान आत्माराम बाबा पाण्याच्या टाकीजवळ यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. दरम्यान हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी हे स्थानिक पातळीवर मध्यप्रदेशातील पथकाच्या संपर्कात राहून तपास करत होते. ताब्यातील भारतसिंग भाटीया यास पो.नि. किरणकुमार बकाले यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.

त्याची कसून चौकशी करण्यात आली. नंदुरबारकर ज्वेलर्स या दुकानात जळगाव येथील मोनुसिंग जगदिशसिंग बावरी व त्याचा एक मित्र अशा तिघांनी मिळून चोरी केल्याचे कबुल केले. चोरी केल्यानंतर मोनुसिंग बावरी याच्या घरी तिघांनी दागिन्यांची समान वाटणी केली. भारतसिंग भाटीया याच्या वाट्याला आलेले दागिने त्याने सतवास जिल्हा देवास येथे लपवून ठेवले असल्याचे कबुल केले आहे. भारतसिंग भाटीया हा सतवास जि.देवास (मध्यप्रदेश) येथील अट्टल घरफोड्या व पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे. भारतसिंग भाटीया यास अटक करण्यात आली असून पुढील तपासकामी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here