चार चाकीचा दुचाकीला कट — हाणामारीत उसळले दोन गट

जळगाव : चारचाकी वाहनाचा दुचाकीवरील तरुणांना धक्का लागल्याने झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी व दगडफेकीत रात्री झाले. कट लागल्याचा जाब विचारणा-या दुचाकीस्वार तरुणांचा एक गट व चारचाकी वाहन धारकाचा दुसरा गट असे चित्र यावेळी निर्माण झाले होते. या प्रकरणी एमआयडसी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरीद महंमद मुलतानी व त्याचा मित्र राहुल राजु सोनवणे असे दोघे जण इच्छादेवी मंदिराकडून डी मार्टच्या दिशेने मोटार सायकलने रात्री साडे नऊ वाजता जात होते. त्यावेळी पलीकडून येणा-या छोटा हत्ती वाहनाचा त्यांच्या ताब्यातील दुचाकीला धक्का लागला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी दोघांनी छोटा हत्ती वाहनाचा पाठलाग करत चालकाला वाटेत अडवले.

यावेळी सिकंदर नावाच्या तरुणाचा भाऊ दाऊद शहा तेथे आला. त्याने दोघा दुचाकीस्वारांना निघून जाण्यास सांगत शिवीगाळ सुरु केली. येथून वादाला सुरुवात झाली. वाद वाढल्याने दाऊदने त्याचे काही साथीदार बोलावून घेतले.

दुचाकीवरील राहुल याने देखील त्याचा मित्र मोहनसींग जगदीशसींग बावरी व अनिस पटेल या दोघांना फोन करुन बोलावून घेतले. दाऊद शहा व त्याचे सोबतचे अरबाज शहा, रफत शेख, इकबाल शेख, इकबाल जुनेद, भाई शेख, साहील शहा, रेहान शेख (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांनी दोघा दुचाकीस्वार तरुणांना शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण सुरु केली. त्यानंतर दगडफेक सुरु झाली. दाऊद शहा याने त्याचे जवळ असलेल्या लोखंडी रॉडने राहुल सोनवणे याच्या छातीवर मारहाण केली. इतर साथीदार दगडफेक करत होते.

या दगड फेकीत फरीद मुलतानी यांच्या खांदयाला मुका मार लागला. मोहनसींग बावरी याचे डोक्याला दगड लागला. त्यांचे साथीदार अनिस हमीद पटेल व अनिल रमेश चौधरी यांना देखील मुका मार लागला.
वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर फरीद महंमद मुलतानी यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाऊद शहा (सिकंदरचा भाऊ), अरबाज शहा, रफत शेख, इकबाल शेख, इकबाल जुनेद, भाई शेख, साहील शहा, रेहान शेख (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here