सराफी दुकान फोडणारा मोनुसिंग यास अटक

जळगाव : जळगाव येथील नंदुरबार सराफ या दुकानातील दागिने चोरी करणा-या मोनुसिंग बावरी या अट्टल गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. यापुर्वी भारतसिंग आयासिंग भाटीया (रा. सतवास जिल्हा देवास मध्यप्रदेश) यास यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने या तपासाला गती दिली असून प्रगतीपथावर नेले आहे.

या गुन्ह्यातील दुसरा आरोपी मोनुसिंग बावरी यास मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. अशोक जाधव, माधव गोरेवाल यांच्या पथकाने मोनुसिंग बावरी यास अटक केली आहे. त्याला पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. तो त्याच्या साथीदारांसह मुक्ताईनगर तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मोनुसिंग याच्यावर यापुर्वी 15 गुन्हे दाखल आहेत. तो अट्टल घरफोड्या करणारा गुन्हेगार आहे. एमआयडीसी पोलिसांच्या सदर गुन्हे शोध पथकाने संपूर्ण रात्र मुक्ताईनगर तालुका पिंजून काढण्यात घालवली. मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन गुप्त पद्धतीने त्याचा शोध घेण्यात आला. अखेर तो मेहुण या गावी तपास पथकाला गवसला. उद्या 7 नोव्हेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याकडून विविध घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्यात यापुर्वी अटक करण्यात आलेल्या भारतसिंग भाटीया यास स.पो.नि. प्रमोद कठोरे व किरण पाटील हे मध्यप्रदेशातील सतवास येथे तपासकामी घेऊन गेले होते. तेथून चोरीची चांदी हस्तगत करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here