गर्भातील बाळाची शपथ साहेब, आम्ही नाही चोरटे!- पोलिस तपासात मिळाले रस्तालुटीचे असली भामटे!!

औरंगाबाद (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : गॅस एजन्सीची जमा रक्कम मालकाच्या हवाली करण्यासाठी जाणा-या कॅशीयरला रस्त्यात अडवून लुट करण्यात आली होती. 22 ऑक्टोबर रोजी घडलेल्या लुटीप्रकरणी गॅस एजन्सी मालकाने कॅशियरवरच आरोप करत गुन्हा दाखल केला. आपण निर्दोष असल्याचे टाहो फोडून सांगणा-या कर्मचा-याच्या बोलण्यावर कुणालाही विश्वास बसत नव्हता. रोजच्या चौकशीच्या त्रासाला वैतागून कॅशियर कर्मचा-याची गर्भवती पत्नी पोलिस स्टेशनला दाखल झाली. तिच्या पोटावर हात ठेवत गर्भातील बाळाची शपथ घेत कॅशीयरने सांगीतले की आम्ही गरीब आहोत मात्र कुणाचे पैसे चोरणार नाही. पुढच्या क्षणी कॅशीयर ढसाढसा रडला. त्यानंतर तपासाची दिशा बदलली. तपासात खरोखर रस्तालुट झाल्याचे निष्पन्न झाले व सहा आरोपी गवसले. आरोपकर्त्या गॅस एजन्सी मालकाला आपली चुक उमगली व खाकी देखील गहिवरली.

औरंगाबादच्या हर्सुल टी पॉंईंट परिसरात आदित्य पांडे यांच्या मालकीची आदित्य भारत गॅस एजन्सी आहे. हेमंत सुंदरलाल गुडीवाल हे कॅशियर म्हणून कामाला आहेत. 22 ऑक्टोबर रोजी जमा झालेली रक्कम रात्रीच्या वेळी ते पांडे यांना देण्यासाठी दुचाकीने जात होते. वाटेत आंबेडकर नगर जवळ काही लुटारुंनी त्यांच्या हातावर रॉड मारुन त्यांना अडवले. त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग घेत सर्वांनी पलायन करण्यात यश मिळवले. गुडीवाल यांनी हा प्रकार एजन्सी मालक पांडे यांच्या कानावर घातला.परगावी असलेले पांडे 23 ऑक्टोबर रोजी औरंगाबादला दाखल झाले. त्यांनी हेमंत गुडीवाल यांच्यावरच संशय व्यक्त करत साडे तिन लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा सिडको पोलिस स्टेशनला दाखल केला.

चुक नसतांना संशयीत आरोपी म्हणून बदनामी झाल्यामुळे हेमंत गुडीवाल व त्यांची गर्भवती पत्नी असे दोघे जण ऐन दिवाळीत व्यथीत झाले. दोघांची दिवाळी बदनामी व दुख़ा:च्या सावटाखाली गेली. सतत पोलिस स्टेशनला जाऊन चौकशीला सामोरे जाण्याचा प्रकार बघून हेमंत गुडीवाल यांची गर्भवती पत्नी सिडको पोलिस स्टेशनला पतीसह दाखल झाली. पत्नी सोबत आल्यामुळे अगोदरच व्यथीत झालेल्या हेमंत गुडीवाल यांचा संयमाचा बांध फुटला. गर्भवती पत्नीच्या पोटावर हात ठेवत त्यांनी जन्माला येणा-या बाळाची शपथ घेऊन सांगीतले की साहेब आम्ही गरीब आहोत, मात्र कुणाची चोरी करणार नाही. ढसाढसा रडणा-या हेमंत गुडीवाल यांच्या बोलण्यात तथ्य वाटल्यानंतर खाकीलाही गहिवरुन आले. दरम्यान पोलिस निरीक्षक संभाजी पवार व उप निरीक्षक अशोक अवचार यांच्यासह संतोष मुदीराज व इरफान खान यांनी दुस-या अ‍ॅंगलने तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजची तपासणीसह खबरे कामाला लागले होते.

तपासादरम्यान दोघा तरुणांकडे जुगार खेळण्यासह महागडा मोबाईल विकत घेण्यासाठी मोठी रक्कम आली असल्याची माहिती पोलिसांना समजली. या तरुणांचे राहणीमान व वागण्यात बदल झाला होता. संकेत मधुकर वेलदोडे (25), रा. एकतानगर व विकास राजेंद्र बनकर (21), रा. आंबेडकरनगर या दोघांना एजन्सी मालक पांडे यांनी कामावरुन कमी केले होते. त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या  माहितीनुसार त्यांचे साथीदार  पवन प्रभाकर डोंगरदिवे (21), रा. जटवाडा, सागर प्रभुदास पारधे (22), रा. मिसारवाडी, समीर अमजद पठाण (21), रा. जाधववाडी व एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.

घटनेच्या रात्री 22ऑक्टेाबर रोजी गॅस एजन्सीमधून हेमंत गुडीवाल रोकड ताब्यात घेत बाहेर पडले. त्यांच्यावर विकास बनकर याने पाळत ठेवली. गुडीवाल बाहेर पडताच आंबेडकर चौकातील इतर साथीदारांना खबर मिळाली व ते सतर्क झाले. विकास बनकर व संकेत वेलदोडे या दोघांनी गुडीवाल यांना धावत्या दुचाकीवर अ‍सतांना त्यांच्या हाताला रॉड मारत अडवले. गुडीवाल थांबताच इतरांनी त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकावत पळ काढला. एका टेकडीवर सर्वांनी मिळून त्या रकमेची वाटणी करुन घेतली.

संकेत हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार असून त्याच्यावर अगोदरच पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांचा हा पहिलाच गुन्हा आहे. लुटमारीतील रक्कम  आरोपींनी मद्यपानासह जुगारात खर्च केली. उर्वरीत 64 हजार रुपये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. लुटमारीचा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर हेमंत गुडीवाल व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपण निरपराध असल्याचे एक समाधान त्यांच्या चेह-यावर लपू शकले नाही. साडे तिन लाख रुपयांचा अपहार केल्याचा कलंक निघाल्याने त्यांना हायसे वाटले. गॅस एजन्सी मालकाला आपली चुक उमगली होती. त्यामुळे त्यांनी गुडीवाल दाम्पत्याची माफी देखील मागीतली.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here