चाकू हल्ल्यात दोघे जखमी – तिघांविरुद्ध गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : अंगणात बसलेल्या दोघा तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणा-या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान खान महमुद खान व आसिफ शेख सरवर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. तसेच आरिफ शहा याच्यासह काल्या व बंदर असे तिघा हल्लेखोर तरुणांची नावे आहेत.

मिल्लत नगर मेहरुण परिसरात लग्नाची लगबग सुरु असतांना 15 नोव्हेंबरच्या रात्री रेहान व आसिफ हे दोघे मित्र घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी आरिफ शहा नावाचा तरुण तेथे मद्याच्या नशेत हातात चाकू घेऊन तेथे आला. त्याने रेहान खान याच्या हातात बळजबरी चाकू दिला. रेहान याने तो चाकू जवळच पडलेल्या लाकडाच्या ढिगा-यात फेकून दिला. या कृत्याचा आरिफ शहा यास राग आला. त्याने खिशातून दुसरा चाकू बाहेर काढला व रेहानच्या डोळ्याखाली वार केला.

रेहानचा बचाव करण्यासाठी त्याचा मित्र आसिफ जवळ आला असता आरिफने त्याच्या पाठीच्या डाव्या बाजुस व मानेखाली चाकूने वार केला. त्यानंतर आरिफ व त्याचे साथीदार तेथून पळून गेले. जखमी रेहान व त्याचा मित्र आसिफ यांनी सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीसांना दिलेल्या जवाबानुसार आरिफ शहा व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here