पोलिसांना मारहाण – बारामतीला गुन्हा दाखल

बारामती : डॉल्बीच्या मोठ्या आवाजात लग्नाच्या आदल्या रात्री काढलेल्या वरातीमुळे रहदारीला निर्माण झालेल्या अडथळ्याची दखल घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने मारहाण करण्याची घटना शुक्रवारी घडली होती.
लिमटेक ता. बारामती येथील घटनेत शहर पोलिस स्टेशनचे हवालदार विलास विठ्ठल मोरे जखमी झाले आहेत.
या घटनेप्रकरणी डॉल्बी चालक, ऑपरेटर व अन्य 23 जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करणे,बेकायदा गर्दी जमवणे, महाराष्ट्र पोलिस कायदा, मोटार वाहन कायदा, शासन आदेशाचे उल्लंघन आदीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बारामती जिल्ह्यात कलम 144 लागू असून घटनेच्या वेळी आलेल्या पोलिसांच्या दिशेने दहा ते बारा जण धावून आले. अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे अशांनी पोलीसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आमचा डीजे बंद करतो काय, याला आपण खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी दमबाजी करत पोलिसांना मारहाण सुरु केली. या घटनेत पोलिस कर्मचारी विलास मोरे जखमी झाले. त्यानंतर अक्षय व रोहित शिंदे यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. गाडीचे नुकसान टाळण्यासाठी काळे व शेंडगे या कर्मचाऱ्यांनी गाडी बाजूला घेतली. जमावातील सात ते आठ महिला पोलीस कर्मचारी मोरे यांच्या अंगावर धावून आल्या. तुम्ही मद्यपान करुन आले असून महिलांच्या गळ्यातील सोने काढून घेतल्याचा खोटा गुन्हा तुमच्यावर दाखल करण्याची धमकी विलास मोरे यांना यावेळी देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील महाडिक आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमी मोरे यांना वैद्यकीय उपचारार्थ रूग्णालयात रवाना करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here