जळगावच्या भोंदूचा डोंबिवलीतील महिलांना गंडा!— लाखो रुपयात फसवणूकीनंतर उघड झाला फंडा!!

डोंबिवली : आपल्या अंगात देवी येते असे खोटे सांगून दोघा महिलांना 32 लाख 15 हजार रुपयांचा गंडा घालणा-या जळगाव येथील एका भोंदू बाबाविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन पाटील (28) असे त्या भोंदू बाबाचे नाव आहे.

तुमच्या कुटुंबावर कुणीतरी करणी केली असल्याचे सांगून भोळ्या महिलांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळवा येथे राहणा-या प्रियंका राणे यांची आई डोंबिवली पूर्व येथील आयरे रोड परिसरात राहतात. प्रियंका, त्यांची आई व भावाच्या संपर्कात जळगाव येथील पवन पाटील हा भोंदू आला. आपल्या अंगात देवीचा संचार असल्याचे त्याने मायलेकीस सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांचा अजून विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःच्या हातातून त्याने खडीसाखर, कुंकू व त्यामध्ये देवीची चांदीची प्रतिमा काढून त्यांना दाखवली. या हातचलाखीमुळे या महिलांचा त्याच्यावर विश्वास बसला.

कुटुंबावर झालेली करणी काढण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील असे त्याने सांगितले. करणीची भीती दोघींच्या मनात घट्ट बसवल्यानंतर प्रियंका व त्यांच्या आईच्या खात्यातून त्याने 31 लाख 6 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यात जमा करुन घेतले. त्यानंतर वेळोवेळी त्याने 1 लाख 9 हजार रुपये किमतीच्या भेट वस्तू देखील प्रियंका यांच्याकडून घेतल्या. हा प्रकार डिसेंबर 2019 पासून अव्याहतपणे सुरु होता. मंत्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राम नगर पोलीस स्टेशनला पवन पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि. सुरेश सरडे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here