अंगठी छान आहे म्हणत हातात घेतली——— बोटात घालून भामट्याने धुम ठोकली!!

जळगाव : बाबा कुठे चालले तुम्ही….. चला मी तुम्हाला सोडतो असे पायी चालणा-या वृद्धासोबत बोलत बोलत त्याच्या हातातील अंगठीच शिताफीने पळवून नेणा-या भामट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण गिरधर धांडे (रणछोड नगर जळगाव) हे 74 वर्ष वयाचे जेष्ठ नागरीक पांडे चौकातून आपल्या घराच्या दिशेने पायी पायी जात होते. दरम्यान एक अनोळखी इसम मोटार सायकलने त्यांच्या जवळ आला. बाबा, कुठे जात आहात चला मी तुम्हाला सोडतो असे म्हणत तो त्यांच्याशी जवळीक साधू लागला. त्याच्या गोड बोलण्यात आल्यानंतर अरुण धांडे त्याच्या मोटार सायकलवर बसले. पुढे गेल्यावर निर्मनुष्य जागी त्याने मोटार सायकल उभी केली.

बाबा तुमच्याकडे पाचशे रुपयांचे सुटे आहेत काय? अशी विचारणा केली. त्यावर धांडे यांनी त्याला नकार दिला. त्यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठीवर मोटार सायकलस्वाराची अगोदर पासून पाळत होती. बाबा तुमची अंगठी खुप छान आहे. मला देखील अशी अंगठी घ्यायची आहे असे म्हणत त्याने धांडे यांच्याशी लबाडीने अजुन जवळीक साधली. मला तुमच्या हातातील अंगठी दाखवा मी तिचा फोटो काढतो असे म्हणत त्याने अंगठी मागीतली.

भोळ्या मनाने अरुण धांडे यांनी त्याला म्हटले की माझ्या बोटातील अंगठी सहजासहजी निघत नाही, तुच काढून बघ. त्यावर त्या भामट्याने वयोवृद्ध अरुण धांडे यांच्या बोटातील अंगठी काढली. त्यानंतर त्याने ती अंगठी आपल्या बोटात घालून मोटारसायकलला किक मारुन पसार झाला. आपल्या हातातील अंगठी लबाडाच्या हातात साधेपणाने दिल्यानंतर ती त्याने पसार केल्याचे बघून वयोवृद्ध अरुण धांडे हतबल झाले. त्यांना दरदरुन घाम फुटला. आपल्या मुलाला त्यांनी घाबरत घाबरत सर्व हकीकत कथन केली. 24 हजार रुपये किमतीची अंगठी लबाडाने लबाडीने चोरुन नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here