सामाजिक कार्यकर्ता गुप्ता आणि जळगाव घरकुल हस्तांतरणाचा प्रश्न

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे निवासस्थान असलेल्या हुडको (शिवाजीनगर) भागातील दोन गाळ्यांबाबत महापालिकेने त्यांना एक नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या लेख्यात ही घरे दुस-याच व्यक्तीच्या नावे असून गुप्ताजी यांनी बेकायदेशीररित्या ती निवासासाठी वापरली असल्याचे महापालिकेचे म्हणणे दिसते. त्यावर सात दिवसात मनपाने उत्तराची अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापी लागलीच गुप्ताजी यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात सन 2009 च्या एका ठरावात एखाद्या व्यक्तीचे घरकुल हस्तांतर करायचे झाल्यास रु.1000/-(रु. एक हजार मात्र) हस्तांतर शुल्क आकारण्याची तरतुद असल्याचे गुप्ताजींचे म्हणणे आहे.

जळगाव नपाच्या कथित घरकुल योजनेत अनेकांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचे भाडे रितसर वसुल केले तर मनपास सुमारे 15 कोटी मिळू शकतात असे सांगितले जाते. परंतु बरीच मंडळी हे भाडे भरत नाहीत किंवा त्यांनी ती घरकुले एक तर काही रक्कम घेऊन हस्तांतरीत केली किंवा भाड्याने इतरांना दिली असावी असे म्हटले जाते. आता मनपाने या विषयाला हात घातलाच आहे तर केवळ दीपककुमार गुप्ता यांच्या पुरता विषय मर्यादीत न ठेवता ज्यांना घरकुले वाटप केली त्यांच्या नावानुसार संबंधीतांचा नव्याने सर्वे करावा. तसेच उगाच कुणाला बेघर न करता सबंधितांकडून कथित भाडे किंवा शुल्क वसुलीतून 15 कोटी रुपयांचा महसुल मिळवावा. एखादे घरकुल दुस-यास निवासासाठी दिले असल्यास संबंधिताकडून सन 2009 च्या ठरावाप्रमाणे एक हजार रुपये हस्तांतर शुल्क आकारुन ते घरकुल नव्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरीत करावे असा सोपा मार्ग दिसतो. यात काही चुकभुल झाली असल्यास मनपा अल्पसा दंडदेखील आकारु शकते.

जळगाव व.वा.(गोलाणी) मार्केट मधील बहुसंख्य दुकाने (90 ते 95 टक्के)अशीच हस्तांतरीत झाली आहेत. सुमारे विस वर्षापुर्वी कुणी तेव्हाच्या किमतीत हे व्यापारी गाळे घेत नव्हते. ज्यांनी ते घेतले ते आता बरेच मालामाल झाल्याचे सांगितले जाते. या गाळे हस्तांतरणासाठी देखील मनपाने प्रारंभी सुमारे दहा हजार रुपये हस्तांतरण शुल्क आकारले होते. घरकुलाच्या बाबतीत देखील तसेच मनपा ठरावाप्रमाणे हस्तांतर शुल्क आकारुन महसुल वाढवण्याचा मार्ग मनपाने स्विकारावा असे सुचवावेसे वाटते. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभुत गरजा आहेत. श्रीमंतांनी त्यांचे हे प्रश्न सोडवलेत. उर्वरीत असंघटीत गोरगरीब निवा-याचा प्रश्न सोडवत असतील तर त्यांना मदतीचा हात देण्यात गैर ते काय?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here