बनावट कागदपत्रांचा बनावट व्यक्तीला आधार—– मुळ जागामालक कागदोपत्री झाला निराधार !!

जळगाव : बनावट आधारकार्ड व बनावट पॅनकार्डच्या आधारे बनावट जागा मालक दाखवून एकाच्या बखळ प्लॉटचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. सुरेशचंद्र मांगीलाल बाफना (सुयोग कॉलनी सेंट जोसेफ शाळेजवळ जळगाव) असे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे.

सुरेशचंद्र बाफना यांनी सन 2007 मधे धरमचंद सेठीया यांच्याकडून मेहरुण शिवारात 280.50 चौरस मिटर क्षेत्रफळाचा बखळ प्लॉट खरेदी केला होता. या व्यवहाराबाबत रितसर दस्त नोंदणी करण्यात आली होती. या प्लॉटची बाफना यांना विक्री करायची असल्यामुळे त्यांनी मेहरुण तलाठी कार्यालयातून सात बारा उतारा मिळवला. हाती पडलेल्या सात बारा उता-यात त्यांना त्यांचे नाव कमी झालेले दिसून आले. आपल्या मालकीच्या प्लॉटच्या सात बारा उता-यावर त्यांना चार पुरुष व एक महिला अशा चौघांची नावे दिसून आली.

आपल्या मालकीचा प्लॉट अद्याप विक्री केला नसतांना त्यावर दुसरीच नावे दिसल्याने त्यांनी अधिक माहितीसाठी सह दुय्यम निबंधक जळगाव -1 यांचे कार्यालय गाठले. सदर प्लॉटच्या खरेदी विक्रीची दुय्यम प्रत त्यांनी मिळवली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता सदर प्लॉटचा व्यवहार 2 मार्च 2021 रोजी झाल्याचे आढळून आले. सुरेशचंद्र बाफना यांच्या नावे बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्डचा वापर करुन त्रयस्त व्यक्तीने त्यांच्या नावाची सही करुन फोटो वापरुन हा गैरव्यवहार केल्याचे एकंदरीत दिसून आले. या प्लॉट संदर्भात एका दैनिकात एका वकीलाच्या नावे मालकी हक्काबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याचे देखील आढळून आले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैर व्यवहारात ओळख देणा-या महिलेस अटक करण्यात आली आहे. फिर्यादीच्या जागी बनावट आधारकार्ड वापरुन कोण इसम हजर होता याबाबत तिच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. याप्रकरणी पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, रविंद्र चौधरी, इम्रान सैय्यद, योगेश बारी, निलोफर सैय्यद आदींनी तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे व दत्तात्रय बडगुजर करत आहेत. इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here