पाळत ठेवून सराफाला लुटणारे चौघे गजाआड

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): एरंडोल तालुक्यातील सराफ व्यावसायीकास दागिन्यांसह लुटून त्यांचीच मोटारसायकल घेऊन पसार झालेल्या पाचपैकी चौघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पाचव्या फरार आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. अवघ्या चोवीस तासात लुटारु पाच आरोपींपैकी चौघांना गजाआड करण्यात आले आहे. मुख्य आरोपी फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. 

एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री येथील राजेंद्र विसपुते यांचे रवंजा येथे समर्थ ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान  आहे. दररोज त्यांची दुकानात जाण्याची आणि घरी परत येण्याची वेळ लुटारुंनी लक्षात ठेवली होती. 16 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास राजेंद्र विसपुते दुकान बंद करुन मोटारसायकलने आपल्या घरी जात होते. त्यावेळी वाटेत दुपारी अडीचच्या सुमारास दोन मोटार सायकलने एकुण पाच जण त्यांच्या मागे मागे येत होते. यातील दोन जण आसपास राहून रेकी करत होते. चोरटक्की  गावाच्या पुढे सुमारे एक किलोमिटर अंतरावर वन विभागाच्या हद्दीतून जात असतांना  तिघे लुटारु मोटारसायकलस्वार तरुण त्यांना ओव्हरटेक करुन पुढे गेले व पुन्हा यु टर्न घेत मागे आले. मागे आल्यावर त्यांनी राजेंद्र विसपुते यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत विसपुते मोटार सायकलसह खाली पडून जखमी झाले. या अनपेक्षीत प्रकाराने राजेंद्र विसपुते गांगरले.

तोंडाला रुमाल बांधलेल्या तिघांपैकी एकाने त्यांना हातातील पिस्टल दाखवत दहशत निर्माण केली. दुस-याने राजेंद्र विसपुते यांच्या डाव्या दंडावर व पाठीवर त्याच्या हातातील चाकूने वार केला. तिस-याने त्यांच्या मोटर सायकलच्या मागील हुकला लावलेली दागिने असलेली निळ्या रंगाची पिशवी बळजबरी हिसकावून घेतली. दरम्यान एकाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. आता पळून जाण्याच्या बेतात तिघे लुटारु असतांना त्यांच्या मोटारसायकलने त्यांना दगा दिला. लुटारुंची मोटारसायकल ऐन वेळी बिघडली. वारंवार किक मारुन देखील ती सुरु होण्यास तयार नव्हती. त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी त्यांंच्या त्याब्यातील मोटारसायकल तेथेच सोडून विसपुते यांची मोटार सायकल हिसकावून त्यांच्याच मोटार सायकलने रिंगणगावच्या दिशेने पलायन केले.

आपली मोटार सायकल, सोने चांदीचे दागिने व रोकड घेऊन लुटारुंनी पलायन केल्याने विसपुते हवालदिल झाले. काही वेळाने त्यांच्या परिचयाचा एक इसम तेथून मार्गक्रमन करत असतांना त्यांना दिसला. त्याच्या मोबाईलवरुन या घटनेची माहिती त्यांनी आपला भाऊ संजय बबन विसपुते यांना कळवली.  52 हजार रुपये रोख, 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने, 2 लाख रुपये किमतीचे 4 किलो वजनाचे चांदीचे दागीने व लगड, 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल, अंदाजे 25 हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकुण 8 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटारुंनी लुटून नेला होता. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने आपले कसब वापरुन डिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (रा.जैनाबाद ता. जि. जळगाव), विशाल अरुण सपकाळे (रा. कोळीपेठ जळगाव), विशाल लालचंद हरदे (रा. चौगुले प्लॉट, कांचन नगर जळगाव) व संदीप राजू कोळी (रा. कुसुंबा, जळगाव) या चौघांना शिताफीने अटक केली. यापैकी पोलिसांच्या अभिलेख्यावरील एक मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. या फरार आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटकेतील चौघा आरोपींकडून तक्रारदार विसपुते यांची हिसकावून नेलेली व गुन्ह्यात वापरलेली एक अशा दोन मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, महेश महाजन, अक्रम याकुब शेख, संदिप साळवे, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, राहुल बैसाने, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, इश्वर पाटील, वाहन चालक राजेंद्र पवार मुरलीधर बारी, महेश महाजन अशा दोन पथकातील कर्मचारी वर्गाने या तपासपथकात सहभाग घेतला. अटकेतील सर्व आरोपी एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here