अस्तित्वात नसलेल्या प्लॉटच्या व्यवहार प्रकरणी दोघांना अटक

जळगाव : विश्वास संपादन करुन अस्तित्वात नसलेल्या बनावट प्लॉटचा व्यवहार करुन जेष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडिसी पोलिस  स्टेशनला दाखल गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या जेष्ठ नागरिकाच्या चुलत शालकाचा या फसवणूकीत प्रमुख सहभाग आहे. त्यामुळे विश्वास गेला पाणीपतच्या युद्धात असे म्हणण्याची वेळ पती पत्नीवर आली आहे.

अमृतलाल मुराई हे जेष्ठ नागरिक वरणगाव ऑर्डनन्स फॅक्ट्रीतून सन 2018 मधे सेवानिवृत्त झाले आहेत. ते सध्या वरणगाव येथे राहतात. सेवानिवृत्तीनंतर परिवारासह जळगावला राहण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांची पत्नी जगराणीबाई मुराई यांनी जळगाव येथील त्यांचा चुलत भाऊ संजु परदेशी याला प्लॉट खरेदी करण्याचा विचार बोलून दाखवला होता. कुठे एखादा चांगला प्लॉट विक्री असल्यास सांगावे असे म्हटले होते.    

संजु परदेशी याने त्याचा मित्र आतिष राणा याच्या संगनमतने मुराई दाम्पत्याची फसवणूक केली. दुस-याच्या नावे असलेला प्लॉट आपल्या परिचिताचा असल्याचे भासवून व तो प्लॉट दाखवून पुढील व्यवहार केला. या व्यवहारात 3 लाख 21 हजार रुपये रोख व उर्वरीत 7 लाख रुपयांचे चेक मुराई  यांच्याकडून घेण्यात आले. कागदपत्रांवर प्लॉट मालकाच्या नावाने अगोदरच सह्या घेऊन ठेवण्यात आल्या होत्या. प्लॉट  मालक हे वयोवृद्ध असून ते सह्या करुन निघून गेले असे प्रत्येक वेळी मुराई दाम्पत्यास सांगण्यात आले. ज्यावेळी सात बारा उतारा तपासून पाहिला त्यावेळी दाखवण्यात आलेला प्लॉट हा दुस-याच व्यक्तीच्या नावे असल्याचे मुराई दाम्पत्याच्या लक्षात आले. तसेच ज्या बनावट प्लॉटधारकाच्या नावाने चेक दिले होते ते बचत खाते पैसे वटल्यानंतर बंद करण्यात आले होते. एकंदरीत हा गोलमाल मुराई दाम्पत्याच्या लक्षात आला तेव्हा बराच कालावधी निघून गेला होता. पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले होते. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत पो.नि. प्रताप शिकारे यांची भेट घेत आपली व्यथा कथन केली.

याप्रकरणी जगराणीबाई मुराई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा चुलतभाऊ संजु परदेशी आणि त्याचा मित्र आतिष रतनलाल राणा  या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रतिलाल पवार, इम्रान सय्यद, मुकेश पाटील, मुदस्सर काझी आदींच्या पथकाने संजु परदेशी आणि आतिष राणा या दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोघांना न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here