भर रस्त्यावर वर्दीधारी पोलिसांची जबर हाणामारी! अवैध व्यावसायीक व जनतेसमोर आली हप्तेखोरी

जळगाव : भर रस्त्यावर आणि पोलिस स्टेशनला वर्दीधारी पोलिस कर्मचा-यांमधे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना जळगाव शहरात समोर  आली आहे. आज सकाळी जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर खोटे नगर बस स्टॉप जवळ वर्दीधारी पोलिसांमधे झालेली तुंबळ हाणामारीची घटना जनता जनार्दनाने उघड्या डोळ्यांनी पाहिली. अवैध दारु व्यावसायिकाकडून दरमहा कलेक्शन सुरु असतांना त्याच्यावर कारवाई का केली? हे या घटनेमागचे मुळ कारण असल्याचे लोक आता उघड बोलत आहेत. या एकमेव कारणावरुन एका पोलिस कर्मचा-याने दोघा पोलिस कर्मचा-यांना मारहाण केल्याचे आता सर्वश्रृत झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरिष्ठांच्या आदेशाने एक अधिकारी व तिन कर्मचारी असे चौघे जण खोटे नगर परिसरातील एका हॉटेल परिसरात अवैध दारु व्यावसायीकावर छापा कारवाई करण्यासाठी गेले होते. ज्या व्यावसायीकाकडून दरमहा कलेक्शन मिळते त्याच्याविरुद्ध कारवाई होत असल्याचे संबंधीत जमाकर्त्या पोलिस कर्मचा-याला समजले. आपले व्यावसायिक संबंध बिघडतील असे लक्षात येताच संबंधीत जमाकर्ता पोलिस कर्मचा-याने वर्दीवरच घटनास्थळी धाव घेतली. अवैध दारु व्यावसायीकासमोरच एक अधिकारी व तिघा कर्मचा-यांना रागाने लालबुंद झालेल्या जमाकर्त्या पोलिस कर्मचा-याने खडसावले. “ए सोडा याला….  याच्याकडून दरमहा कलेक्शन मिळते. असे तो कर्मचारी जोरात ओरडून बोलला. आपल्याला वरिष्ठांनी आदेश देऊन या ठिकाणी कारवाईकामी पाठवले असल्याचे त्याला  सांगण्यात आले. मात्र तो जमाकर्ता कर्मचारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने वर्दीवरच आपल्या वर्दीधारी बांधवांना हाणामारी करण्यास सुरुवात केली. अवैध  व्यावसयीकासमोर सुरु असलेली हाणामारी बघून कारवाईकामी आलेल्या अधिका-याला अतिशय लज्जास्पद वाटले. त्यानंतर अवैध व्यावसायीकासह सर्व जण पोलिस स्टेशनला आले. पोलिस स्टेशन आवारात देखील हाणामारीचा अर्थात फ्री स्टाईलचा दुसरा अंक बघण्यास मिळाला. अवैध दारु व्यावसायीकास पोलिस स्टेशनला आणून जमा करण्यात आल्याचे समजते. या घटनेदरम्यान संबधित प्रभारी अधिकारी पोलिस अधिक्षक कार्यालयात बैठकीसाठी गेले होते असे समजते. या घटनेप्रकरणी पोलिस अधिक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here