वर्दीतच जुगार खेळताना सापडला पोलिस कर्मचारी

औरंगाबाद : जुगार अड्ड्यावरील गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत आपलाच सहकारी खाकी वर्दीवर जुगार खेळत असल्याचे पथकाला आढळून आले. सुरेश भिकाजी इंगळे असे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या व छाप्यात आढळून आलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. त्याच्याकडे इतर जुगारी आरोपींपेक्षा चाळीस हजाराची सर्वाधिक रोकड आढळून आली. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईने औरंगाबाद पोलिस दलात खळबळ माजली आहे. मिल कॉर्नरच्या एका घरात हा जुगार अड्डा सुरु होता.

पोलिस आयुक्तालयाच्या जुन्या निवासस्थानानजीक कोतवालपु-यात हा जुगाराचा अड्डा सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकला असता त्याठिकाणी आढळून आलेल्या नऊ जुगारींपैकी एक आपलाच पोलिस कर्मचारी असल्याचे आढळून आले. सुरेश इंगळे या पोलिस कर्मचा-यासह आनंद कृष्णगोपाळ भिंडा (44), रा. मिलकॉर्नर आकाश अशोक बनसोडे (29), रा. भोईवाडा, शेख कुदरत शेख सिद्दीक (31), रा. आसेफिया कॉलनी, शेख शाहरुख शेख युसूफ (27), रा. लक्ष्मी कॉलनी, अजिमोद्दीन खान करिमोद्दीन खान (52), रा. हिलाल कॉलनी, मोहंमद मुनाफ मोहंमद सुलेमान (54), रा. जुना मोंढा, सागर शिवाजी जाधव (31), रा. टाऊन हॉल, सुरेश रामभाऊ खरात (45), रा. गवळीपुरा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. एकुण 1 लाख 16 हजार 600 रुपयांची रोकड या कारवाईत जप्त करण्यात आली. पोलिस कर्मचारी इंगळे याच्याविरुद्ध यापुर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याचे समजते. जुगार खेळणा-या सर्वांना बेगमपुरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, कल्याण शेळके, अंमलदार ओमप्रकाश बनकर, नवनाथ खांडेकर, जितेंद्र ठाकूर, संदीप सानप, चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here