नवविवाहीत मुलीला सासरहून पळवून नेणा-या पित्यास अटक

जळगाव : अल्पवयीन नवविवाहीता आपल्या पित्यासह संगनमताने सासरहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना दोघे पकडले गेले. पाण्यातून गुंगीचे औषध दिल्यानंतर दोघा बाप लेकीचा पलायन करण्याचा प्रयत्न सास-याला जाग आल्याने उघडकीस आला. यावेळी दोघांनी केलेल्या मारहाणीत नवविवाहितेचा पती, सासु व सासरा असे तिघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन नवविवाहितेची बालसुधार गृहात तर पित्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. 1 लाख 70 हजार रुपये धुळे येथील एका महिला एजंटला दिल्यानंतर तिच्यामार्फत हा विवाह लावण्यात आला होता असे समजते. 

पाचोरा येथील कोंडवाडा गल्ली भागातील राहुल अर्जुन पाटील या तरुणाचा विवाह परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील मुळ रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत काही दिवसांपुर्वी महिलेच्या मध्यस्तीने लावण्यात आला होता. लग्नाच्या माध्यमातून वराची फसवणूक करण्याचा उद्योग करणा-या पित्याने आपल्या मुलीचा हा चौथा विवाह करुन दिल्याचे उघड होत आहे. लग्न केल्यानंतर पळून जावून पुन्हा कुणाचीतरी फसवणूक करायची असा उद्योग काही लोक दलालाच्या माध्यमातून करत असतात. मात्र यावेळी पळून जाण्याचा बेत फसल्याने या बाप लेकीचे पितळ उघडे पडले.

25 मार्च रोजी नवविवाहितेला भेटण्याचा बहाण्याने तिचे वडील पाचोरा येथे तिच्या सासरी आले होते. दोघांचे पळून जाण्याचे नियोजन होते. काही दिवस मुलीला माहेरी घेऊन जातो असे तिच्या पित्याने व्याह्याला म्हटले. मात्र मुलीच्या सास-याने या गोष्टीला नकार दिला. काहीही करुन पळून जाण्याचे दोघांचे ठरले असल्यामुळे मुलीने रात्री पाण्यातून पती, सासू व सासरा अशा तिघांना गुंगीचे औषध दिले. मात्र तरीदेखील सास-याला जाग आल्यानंतर दोघांनी लोखंडी रॉडने पती, सासू व सासऱ्यांना मारहाण सुरु केली. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. मुलीची रवानगी बाल सुधारगृहात तर पित्याची पोलिस कोठडीत रवानगी  करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here