रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक

नाशिक : रेल्वेत टीसी आणि गेटमनची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्रे, बनावट मेडीकल दाखले देत करोडो रुपयांचा गंडा घालणा-या टोळीतील एकाला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ज्ञानेश नथु सुर्यवंशी, रा. गणपती मंदिर, पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक असे अटकेतील सायबर कॅफे चालक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ज्ञानेश सुर्यवंशी याच्यासह सतिष गुंडू बुच्चे, रा. घर नं. 9. सदगुरु हाईटस्, पुणे, ता. जि. पुणे व संतोष शंकरराव पाटील, रा. वंडरसिटी, कात्रज, ता. जि. पुणे हे सहआरोपी आहेत.

या घटनेतील फिर्यादी चेतन शिवाजी इघे रा. नांदगाव आणी इतर असे सर्वजण रेल्वे व इतर भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ज्ञानेश नथु सुर्यवंशी याच्या सायबर कॅफेवर जात होते. त्यावेळी ज्ञानेश सुर्यवंशी याने चेतन इघे व इतरांचा विश्वास संपादन करत त्यांना म्हटले की तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशाला भरता? मी तुम्हाला रेल्वेत नोकरी लावून देतो. टीसी या पदासाठी 15 लाख आणि गेटमन पदासाठी 12 लाख रुपये लागतील असे त्याने सर्वांना सांगितले. काही दिवसांनी ज्ञानेश सुर्यवंशी याने सतिष गुंडू बुच्चे व संतोष पाटील या दोघांसोबत सर्वांची ओळख करुन दिली. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांकडून एकुण 1 कोटी 15 लाख अशी रक्कम संकलीत केल्यानंतर ज्ञानेश सुर्यवंशी याने सर्वांना बनावट नियुक्तीपत्र आणि बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून दिले. आपल्या हाती असलेले नियुक्तीपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असल्याचे फिर्यादीसह सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर या फसवणूक प्रकरणी चेतन शिवाजी इघे व इतरांनी नांदगाव पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याच्या तपासात ज्ञानेश नथु सुर्यवंशी यास अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि ईश्वर पाटील, पोलिस हवालदार भारत कांदळकर, पोना अनिल शेरेकर, सुनिल कु-हाडे, सागर कुमावत, पोकॉ संदिप मुंढे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here