दगडाने ठेचून खून करणारे एलसीबीने केले अटक

जळगाव : दगडाने ठेचून तरुणाच्या हत्येचा एलसीबी पथकाने उलगडा केला आहे. या गुन्ह्यात दोन आरोपी असून त्यातील एक अल्पवयीन पंधरा वर्षाचा बालक आहे. दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (21) रा. तांबापुरा जळगांव असे या घटनेतील मुख्य मारेक-याचे नाव आहे. अल्पवयीन बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
जळगांव एमआयडीसी पोलिस स्टेशन हददीत मेहरुण तलावानजीक 9 एप्रिल रोजी एका तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले होते. तपासाअंती मयत तरुण हा दिनेश भिकन पाटील (44) रा.रामेश्वर कॉलनी जळगांव असल्याचे निष्पन्न झाले होते. या हत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 249/22 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या टीमकडे सोपवला होता. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, पोना राहुल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, पोलिस नाईक इश्वर पाटील, संदीप साळवे, पोहेकॉ भारत पाटील, विजय चौधरी दर्शन ढाकणे आदींचे दोन पथक तपासकामी तयार केले होते.

जळगाव शहराच्या तांबापुरा परिसरातील एका अल्पवयीन बालकाने सदर गुन्हा केल्याची गोपनीय माहिती तपासादरम्यान पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या. टप्प्याटप्याने माहिती घेत तपास पथकाने तांबापुरा भागातून संशयीत बालकास ताब्यात घेत त्याची विचारपुस केली. हळूहळू त्याच्याकडून घटनेची हकीकत बाहेर येण्यास सुरुवात झाली.

घटनेच्या दिवशी दुपारच्या वेळी सदर बालक व त्याचा साथीदार दुलेश्वर माळी असे दोघे जण मेहरुण तलावाकाठी मद्यप्राशन करत बसले होते. त्याच ठिकाणी काही अंतरावर एका भिंतीच्या आडोशाला झाडाखाली दिनेश पाटील हा मद्यप्राशन करण्यासाठी बसला होता. आपल्यासमोर मद्यप्राशन करणारे दोघे लहान असल्याचे बघून त्याने दोघांना हटकले. तुम्ही अजून लहान असून तुमचे मद्यप्राशन करण्याचे वय आहे का? अशी मयत दिनेश पाटील याने दोघांना विचारणा केली. इथून उठा आणि निघून जा असे दिनेश याने दोघांना खडसावले. मद्यप्राशन करत असतांना हटकल्याबद्दल दोघांना दिनेशचा राग आला. त्यामुळे संतापाच्या भरात दोघांनी मिळून दिनेश यास जवळच पडलेल्या दगडाने ठेचून काढले.

अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे दुलेश्वर उर्फ आनंदा माळी याला देखील तपास पथकाने ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या आरोपींबाबत प्रथमदर्शनी कोणतीही माहिती तसेच कोणताही भौतीक पुरावा उपलब्ध नव्हत. तरी देखील पारंपारीक पध्दतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर खूनाचा गुन्हा अल्पकालावधीत उघडकीस आणला आहे. पंधरा वर्षाच्या अल्पवयीन बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मुख्य मारेकरी संशयीत आरोपी दुलेश्वर उर्फ आनंदा माळी यास 20 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे व त्यांचे गुन्हे शोध पथक करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here