बंदिवानांच्या रकमेचा अपहार – लिपिकाविरुद्ध गुन्हा

धुळे : धुळे जिल्हा कारागृहातील बंदिवानांच्या खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम परस्पर लांबवणा-या लिपिकाविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन वारुळे असे कारागृहातील लिपिकाचे नाव आहे. कारागृहातील लिपिक विलास केशव पवार यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

बंदीजनांच्या नावे कारागृहात मनिऑर्डरने धनराशी येत असते. त्याची नोंद रजिस्टर क्रमांक एक मधे घेतली जात असते. या रजिस्टरची नियमित तपासणी लिपिक गजानन वारुळे आणि जमाखर्चाचा हिशेब लिपिक विलास पवार यांच्याकडे असतो. बंदी मुक्त होतांना त्यांच्या नावावरील शिल्लक रकमेचा हिशेब केल्यानंतर गजानन वारुळे हे उर्वरित रक्कम विलास पवार यांच्याकडून घेतात आणि ती मुक्त होणाऱ्या बंदिवानाला देण्यात येते.

काही दिवसांपूर्वी मुक्त होत असलेल्या 314 बंदीजनांच्या नावे असलेल्या 6 हजार 540 रुपयांच्या रकमेची वारुळे यांनी पवार यांच्याकडे मागणी केली. सदर रक्कम मुक्त होणा-या बंदींना द्यायची असल्याचे पवार यांना सांगण्यात आले. लिपिक पवार यांनी ती रक्कम वारुळे यांना दिली. दुपारी तुरुंग रक्षकांकडे अधिक चौकशी केली असता एकाही बंदीची सुटका झाली नसल्याचे पवार यांच्या लक्षात आले. गजाजन वारुळे यांनी या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर अधिक तपासणी करण्यात आली. 17 नोव्हेंबर 2021 ते 18 जानेवारी 2022 या कालवधीत वारुळे यांनी 29 हजार 842 रकमेचा अपहार केल्याचे चौकशीत दिसून आले. याप्रकरणी विलास पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here