रेशन दुकानदारास बेदम मारहाण – सहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : ढाब्यावर जेवण करत असलेल्या अमळनेर येथील रेशन दुकानदाराला सहा जणांनी बेदम मारहाण करत त्यातील एकाने त्याच्या बोटातील सोन्याची अंगठी जबरीने काढून घेतल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र शालिग्राम बोरसे रा. गुरुकृपा कॉलनी अमळनेर असे मारहाण झालेल्या रेशन दुकानदाराचे नाव आहे.

महेंद्र बोरसे हे 2 जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता अमळनेर चोपडा रस्त्यावरील बाबाजीका ढाबा येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब पाटील, नरेंद्र शिंदे, प्रविण गोसावी, गौरव महाजन असे हजर होते. त्यावेळी त्याठिकाणी महेंद्र बोरसे यांच्या परिचयाचे सुरेश अर्जुन पाटील तसेच त्यांच्यासमवेत उमाकांत सुरेश पाटील, रितेश अरुण बोरसे, जिजाबराव पाटील, न्हानु पाटील, मल्हारी पाटील आदी हजर होते. त्यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्या सोबत असलेल्या सर्वांसमक्ष महेंद्र बोरसे यांना शिवीगाळ सुरु केली. महेंद्र पाटील यांस मारा, जिवंत ठेवू नका, हा मला कायम नडत आला आहे, याचा कायमचा बंदोबस्त करा असे वक्तव्य केले.

त्यामुळे सुरेश पाटील यांचा मुलगा उमाकांत सुरेश पाटील याने हातातील फायटरने महेंद्र पाटील यांच्या उजव्या डोळ्याजवळ फायटरने ठोसा मारुन दुखापत केली. त्याचवेळी टीनु बोरसे याने लोखंडी पाईपने डोक्यावर वार केला. जिजाबराव पाटील याने लोखंडी पाईपाने महेंद्र पाटील यांच्या दोन्ही खांद्यावर मारहाण करुन दुखापत केली. दरम्यान जमीनीवर पडलेल्या महेंद्र पाटील यांच्या पाठीसह बरगड्यांवर काठीने मारहाण सुरु केली. उमाकांत सुरेश पाटील याने महेंद्र पाटील याच्या उजव्या हाताच्या बोटातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. सुरेश पाटील यांनी बिअरची रिकामी बाटली टेबलावर फोडून अर्थवट तुटलेली महेंद्र पाटील यांच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वार महेंद्र पाटील यांनी चुकवत आपला जीव वाचवला. उमाकांत पाटील याने लोखंडी रॉडने वाहनाच्या मागील बाजुचा काच फोडून नुकसान केले. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला महेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश अर्जुन पाटील, उमाकांत सुरेश पाटील, रितेश अरुण बोरसे, जिजाबराव पाटील, न्हानु पाटील, मल्हारी पाटील अशा सर्वांविरुद्ध भा.द.वि. 395, 397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अनिल भुसारे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here