दागिन्यांसाठी चौघांनी केला एकट्या महिलेचा खून; पुणे पोलिसांनी गुन्हा उलगडला एक वर्षाने कसून!!

पुणे : कमी श्रमात आणि कमी वयात अधिक पैसे मिळवून आपले जीवन आरामदायी आणि सुखकर करण्याचा कुविचार अनेकांच्या मनात घोळत असतो. त्या दृष्टीने अनेक जण गुन्हेगारी कृत्य करण्यास मागेपुढे बघत नाहीत. मात्र श्रमाला पर्याय नसतो हा साधा आणि सरळ विचार गुन्हेगार करत नसतात. त्यांना केवळ पैसा हवा असतो. त्यासाठी ते प्रसंगी एखाद्याची हत्या देखील करतात. प्रतिकार शक्ती कमी असलेल्या एकट्या दुकट्या लोकांना आपले सावज करुन वेळप्रसंगी त्यांची हत्या करुन त्यांचे सोने नाणे व पैशांवर कब्जा करणारे गुन्हेगार या जगात असतात. एक वर्षापुर्वी सोन्याचे दागिने व रोकड लुटण्यासाठी एकटी राहणा-या महिलेची चौघांकडून हत्या झाली होती. त्या गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे शाखा युनीट एकने लावला आहे.

कमल बाबुराव खाणेकर उर्फ नुरजहा अजिज कुरेशी ही महिला घरात एकटीच रहात होती. चिखली पोलिस स्टेशन हद्दीत हरगुडे वस्तीत एकटी राहणारी कमल खाणेकर ही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होती. तिच्या अंगावर बरेच दागिने रहात होते. अंगावर दागिने घालून फिरणारी व्यावसायीक महिला घरात एकटीच रहात असल्याची बाब काही तरुणांना समजली होती.

मोहंमद मोनिष इसरार अहमद शेख हा तरुण विरबाबा चौक, हिना बेकरीच्या बाजुला साईनगर देहुरोड पुणे येथे रहात होता. आर्म अ‍ॅक्टचा गुन्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहंमदचे काही साथीदार होते. वासिब खान, रा. झेंडेमळा, देहुगाव, जि.पुणे, अब्दुल मुनाफ अन्सारी, रा. रूपीनगर, तळवडे, पुणे, व रईसउद्दीन राईन, रा. अंगणवाडी रोड, मोरेवस्ती चिखली, पुणे अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. कमल बाबुराव खाणेकर या महिलेला सर्वांनी मिळून आपले सावज म्हणून हेरले होते. ती एकटी रहात असल्याचे त्यांनी माहिती करुन घेतले होते. ती जमीन खरेदी विक्रीचे काम करत असल्यामुळे तिच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने असणार असा अंदाज त्यांनी मनाशी बांधला होता. तिची हत्या करुन तिच्या घरातील दागिने व रोकड लुटण्याचे त्यांनी नियोजन केले होते. या लुटीतून आपण सर्वजण मालामाल होवून आपले जीवन सुखाचे होईल असा विचार त्यांनी केला होता.

5 ऑगस्ट 2021 रोजी संधी साधून सर्व गुन्हेगारांनी कमल खाणेकर या महिलेच्या घरात प्रवेश केला. तिचे हातपाय बांधून तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावून गळा दाबून तिचा निघृण खून करण्यात आला. या घटनेप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनला कमल खाणेकर हिच्या हत्येप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भाग 5 गु.र.न. 385/2021 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला होता. या घटनेत गुन्हेगारांनी नियोजनपुर्वक खून करुन मागे कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते. पुणे गुन्हे शाखा युनिट-1 ने हे आव्हान स्विकारत पुढील तपासाला सुरुवात केली. उत्तरप्रदेश व बिहार राज्यातुन आलेले तसेच चिखली, एमआयडीसी, भोसरी परीसरात राहणारे रेकार्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. ब-याच आरोपींना युनिट कार्यालयात आणुन त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काम सुरु होते.

तपासादरम्यान युनीट एकचा पोलिस कर्मचारी महाले याने चिखली पोलीस स्टेशनला आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात अटक झालेला आरोपी मोहंमद मोनिष इसरार अहमद शेख (रा.विरबाबा चौक, हिना बेकरीच्या बाजुला साईनगर देहुरोड पुणे) यास चौकशीकामी गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात आणले. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची माहिती त्याने वरिष्ठांना दिली. पोलिसी खाक्या दाखवत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात वासिब खान (रा. झेंडेमळा, देहुगाव, जि.पुणे), अब्दुल मुनाफ अन्सारी (रा. रुपीनगर, तळवडे, पुणे), रईसउद्दीन राईन (रा. अंगणवाडी रोड, मोरेवस्ती चिखली, पुणे) यांचा देखील सहभाग असल्याची माहिती त्याने दिली. मयत महिला कमल खाणेकर हिचे हातपाय बांधुन, तोंडास चिकटपट्टी लावून गळा दाबून तिची निघृण हत्या केल्याचे त्याने कबुल केले. तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे त्याने कबुल केले.

युनिट एकचे पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासकामी दोन पथकांची निर्मीती करण्यात आली. अटकेतील आरोपी मोहमंद मोनिष याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार वासिब उर्फ टोनू मोनू रईस खान यास देहु परीसरातून ताब्यात घेण्यात आले. तपासात प्रगती होत असतांना उर्वरीत आरोपी पालघर व बांद्रा मुंबई येथे असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली. दोघांच्या लोकेशननुसार पोलिस पथक त्यांच्या मागावर होते. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचा सुगाव लागत गेल्याने दोघे जण आपले ठिकाण तातडीने बदलत होते.

अखेर अब्दुल मुनाफ अब्दुल मलीक अन्सारी (रा. कोयना सोसायटी) यास रुपीनगर तळवडे पुणे येथून पोलिस पथकाने ताब्यात घेत अटक केली. बांद्रा मुंबई येथे गेलेल्या दुसऱ्या पोलीस पथकाने किवळेफाटा, रावेत येथून सापळा रचून रईसउद्दीन सुलतान अहमद राईन (रा. अंगणवाडी रोड, हिमारल बेकरीमध्ये, मोरेवस्ती चिखली, पुणे) यांस रावेत येथून ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला यश आले. सोन्याचे दागिने व रोख रकमेसाठी आपण कमल खाणेकर या महिलेची हत्या केल्याचे कबुल केले. अटकेतील चौघा आरोपींनी त्यांच्या इतर तिघा साथीदारांच्या मदतीने रेकी करुन मयत महिलेची सर्व माहिती मिळवली होती. त्यानुसार घटनेच्या रात्री पाळत ठेवत तिच्या घरात घुसून तिचे दोरीने हातपाय बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर लगेचच तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली. तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. ती मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या घरातील रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करुन नेल्याचे अटकेतील चौघांनी कबुल केले. तब्बल एक वर्षानंतर या किचकट गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने लावला.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पो.उप नि. राठोड, पोहेकॉ. मुल्ला, खानविलकर, महाडीक, कोकाटे, बो-हाडे, पठाण, जावळे, कमले, मोरे, पोलिस नाईक हिरळकर, सरवदे, पो.कॉ. महाले, रुपनवर, भोईर, जायभाये आदींनी तपासकामी सहभाग घेतला. पोलीस हवालदार माळी यांनी तपास पथकास विशेष सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here