टोल वसुलीचा ठेका दीर्घकाळ राहण्यासाठी आकड्यांची हेराफेरी?

जळगाव : टोल नाक्यावर बनावट पावत्यांच्या माध्यमातून जमा रकमेची हेराफेरीसह महसुल कमी येत असल्याचे दाखवून टोल वसुलीचा ठेका दिर्घकाळ मिळण्यासह पुढील टेंडर कमी रकमेत मिळवण्यासाठी टोलचा झोल सुरु असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. आज दुपारी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना त्यांनी नशिराबाद टोल नाक्यावरील झोल संदर्भात सविस्तर माहिती दिली. टोल वसुलीच्या गैरव्यवहार प्रकरणी आपण गुन्हा दाखल करण्यास तयार असून पोलिस अधिक्षकांना तसे पत्र दिले असल्याचे देखील गुप्ता यांनी पुढे बोलतांना सांगितले.

जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील बनावट पावत्या, बनावट मशिन आणि फास्ट टॅगचा घोळ उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पोलिस पथकाच्या मदतीने हा गैरव्यवहार उघडकीस आणला. पोलिस अधिक्षकांचे वाचक सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला व त्यांच्या सहका-यांसह दीपककुमार गुप्ता यांनी टोल नाक्यावर धाड टाकली होती. दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरुन धाड टाकत पोलिसांनी पंचनामा केला. या बोगस कामाचा एवढा मोठा गैरव्यवहार उघडकीस आणून देखील संबंधीत ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा एकही पाऊल पुढे आले नाही. टोल वसुली करणा-या ठेकेदार एजन्सीला केवळ सुमारे साडेचार लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी नागपूर येथून न्हाईचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल जळगावला दाखल झाले होते. ज्याने तक्रार केली त्यानेच गुन्हा दाखल करावा असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार दीपककुमार गुप्ता गुन्हा दाखल करण्यास तयार आहेत. दीपककुमार गुप्ता यांना सुत्रांकडून तसेच चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार या टोल नाक्यावर दररोज लाखो रुपयांची हेराफेरी होत असते. दरमहा सुमारे पाच लाख रुपयांचा हप्ता प्रकल्प संचालक सिन्हा यांना जात असल्याची खळबळजनक माहिती देखील गुप्ता यांना त्यांच्या सुत्रांकडून तसेच चर्चेतून मिळाली असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले. याबाबत सखोल चौकशी होण्याकामी त्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार देखील केला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here