पॉलीशचा बहाणा करत हातचलाखीने दागिने लंपास

जळगाव : सुरुवातीला पितळी भांड्यांना पॉलीश नंतर सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करुन देण्याचा बहाणा करत सोन्या चांदीचे दागिने हातचलाखीने लंपास करणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा अज्ञात इसमांकडून फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील इश्वर कॉलनी परिसरात मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा या वयोवृद्ध 65 वर्षाच्या जेष्ठ नागरीक महिला राहतात. 4 जुलै रोजी सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान मुन्नीदेवी आणि त्यांची दिराणी अशा दोघी महिला घरात होत्या. त्यावेळी कंपनीचा सेल्समन असल्याचा बनाव करत दोन इसम त्यांच्याकडे आले. आम्ही पितळी भांड्यांना पॉलीश करण्याची पावडर विकतो असा सुरुवातीला त्या दोघांनी बनाव केला. पितळी तांब्या पॉलिश करुन झाल्यानंतर हळूच आम्ही सोन्या चांदीचे दागिने देखील पॉलिश करुन देतो असा डाव त्यांनी टाकला. मुन्नीदेवी वर्मा यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्यांच्याकडील चांदीचे दोन कमरपट्टे आणून दिले. ते चांदीचे कमरपट्टे दोघा इसमांनी पॉलिश करुन मुन्नीदेवी वर्मा यांना परत केले. त्यामुळे मुन्नीदेवी वर्मा यांच्या त्या दोघांवर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील दोन साखळ्या व कानातील रिंग अशा वस्तू पॉलिश करुन देण्यासाठी काढून दिल्या.

आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्याकडील हळद व एक लालसर रंगाची पावडर त्या सोन्याच्या दागिन्यांना लावली. हळद आणि लालसर पावडर लावलेले ते दागिने एका पाण्याच्या डब्यात टाकून गॅसवर तापवण्यास ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर ते एका कोरड्या कपड्याने पुसून घ्या असे मुन्नीदेवी वर्मा यांना सांगून दोघे इसम निघून गेले. काही वेळाने गॅसवर ठेवलेल्या डब्यातील पाणी थंड झाल्यानंतर डबा उघडून पाहिले असता त्यात दागिने नव्हते. हातचलाखी करुन दागिने घेवून पसार झालेल्या इसमांनी आपली फसवणूक झाल्याची मुन्नीदेवी वर्मा यांची खात्री झाली. या कालावधीत दोघे भामटे दागिने घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here